पंचवीस दर्भाची वेणी करून शेवटी गाठ दिलेला व लांब अग्रे असलेला असा विष्टर करावा. कन्येचे दान करणारा भिन्नशाखीय असला तथापि वराच्या शाखेच्या गृह्यसूत्रामध्ये जसा विधि सांगितला असेल त्याप्रमाणे मधुपर्क तयार करावा. मधुपर्क म्हणजे दही व मध यांचे मिश्रण. दही न मिळेल तर दूध अथवा जल घ्यावे. मध न मिळेल तर घृत अथवा गूळ प्रतिनिधि घ्यावा.
"गृहागतं स्नातकं वरं मधुपर्केणार्हयिष्ये"
असा मधुपर्काचा संकल्प करावा. वराचा दुसरा विवाह असेल तर ’स्नातक’ पदाचा लोप करावा. त्यानंतर जसे गृह्यसूत्र असेल त्याप्रमाणे मधुपर्काचा प्रयोग जाणावा. याप्रमाणे गुरु, श्रेष्ठ ब्राह्मण, राजा हे गृही आले असता त्यांची अथवा यज्ञामध्ये पसंत केलेले ऋत्विज यांची मधुपर्काने पूजा करावी. ऋत्विज इत्यादिकांची पूजा करण्याचे वेळी ज्यांची पूजा करावयाची त्यांच्या शाखेमध्ये सांगितलेल्या विधीने मधुपर्क करावा. पूजा करणाराचे शाखेप्रमाणे करू नये. ’सर्वत्र यजमानाचे शाखेप्रमाणे मधुपर्क करावा.’ असे जयन्त ग्रंथकार म्हणतो. या मधुपर्कपूजेमध्ये गंध, पुष्प, धूप, दीप वगैरे पूजा झाल्यानंतर उडदाच्या डाळीचा तयार केलेला लाडू इत्यादिक उपहार वराला भोजनार्थ द्यावा. याप्रमाणे मधुपर्क केल्यानंतर भोजन केलेला अथवा त्याचे पूर्वी भोजन केलेला अशा वराला उपोषित असा कन्येचा पिता इत्यादिक याने कन्या द्यावी.