एका पक्षामध्ये दोन तिथींचा क्षय होऊन जो तेरा दिवसांचा पक्ष होतो त्याला क्षयपक्ष म्हणतात. क्षयपक्षमध्ये बहुत प्रजेचा संहार अथवा राजांचा संहार होतो. क्षयपक्षामध्ये चल, उपनयन, विवाह, वास्तुकर्म वगैरे शुभ कार्य करू नये. क्षयमास, अधिक मास, गुरुशुक्राचे अस्त इत्यादिकांमध्ये विवाहाचा निषेध प्रथम परिच्छेदामध्येच सांगितला आहे तो पहावा. याप्रमाणे सिंहस्थ गुरु असतानाही सांगितलेला निषेध प्रथम परिच्छेदात आहे तो पहावा. याप्रमाणे क्षय संवत्सर देखील निषिद्ध आहे. शीघ्रगतीने पूर्व राशीचा शेष उल्लंघून दुसर्या राशीचे ठिकाणी संचार करणे याचे नाव अतिचार. त्या अतिचाराप्रत जाऊन जर गुरु पुन्हा वक्र गतीने पूर्व राशीला आला नाही तर तो क्षय संवत्सर होतो. हा क्षय संवत्सर सर्व कर्मात वर्ज्य जाणावा. त्यामध्ये मेष, वृषभ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशीचे गुरुचा दोष नाही. गोदावरेचे दक्षिण प्रदेशी गुरूचा अतिचार वगैरे कोणताही दोष नाही असे कोणी ग्रंथकार म्हणतात. याप्रमाणे क्षयपक्षादिसंबंधाने निर्णय सांगितला.