विवाहाचे चातुर्थदिवशी ऐरिणीदान करावे. ते वधूच्या उपोषित मातापित्यांनी वराच्या उपोषित आईला द्यावे. वराची माता रजस्वला असेल, आणि ती शुद्ध होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा असंभव असेल अर मनाने उद्देश धरून ज्याप्रमाणे दान देतात त्याप्रमाणे वराच्या मातेच्या उद्देशाने ऐरिणीदान द्यावे. वधू व वर यांच्या माता विवाहानंतर देवकोत्थापनाच्या पूर्वी रजस्वला होतील तर पूर्वी सांगितलेली शांति करून शुद्धि झाल्यावर देवकोत्थापन करावे. संकट असेल तर शांति करून, शुद्धि होण्याच्या पूर्वीही करावे. मातुल इत्यादि अन्य कर्ता असल्यास त्याची पत्नी रजस्वला होईल तर त्यासंबंधाचा निर्णय मौजीप्रकरणामध्ये सांगितला आहे. याप्रमाणे विवाहानंतर आशौच असल्यास चतुर्थीकर्मापर्यंत प्राप्त झालेले कर्म करण्याविषयी कर्ता, वर व कन्या यांना आशौच नाही. आशौच संपल्यावर देवकोत्थापन करावे. तसा असंभव असेल तर आशाचामध्येही देवकोत्थापन करून नंतर आशौच धरावे. विवाहाचे अगोदर ’आशौच’, रजोदोष इत्यादि आल्यास त्यांचा निर्णय पूर्वी सांगितला आहे. चतुर्थीकर्माचा होम कौस्तुभामध्ये सांगितला आहे.होम कित्येक ऋकशाखी करीत नाहीत. मंडपोद्वासनाच्या दिवसाचा निर्णय आणि मंडपोद्वासन होईपर्यंत कोणती कर्मे करावी व कोणती करू नयेत त्यांचा निर्णय उपनयन प्रकरणी सांगितला आहे तो पहावा.