आता यानंतर स्मृत्यर्थसार इत्यादिक ग्रंथात सांगितलेले द्विगोत्र सांगतो - १ देवरात - यांचे प्रवर - वैश्वामित्र, देवरात, औदल असे तीन आहेत. ह्या देवरातांचा विवाह सर्व जामदग्न्य व विश्वामित्र यांशी होत नाही. २ धनंजय यांचे प्रवर - विश्वामित्र, माधुच्छंदस धानंजय असे तीन आहेत. ह्या धनंजयांचा विवाह सर्व विश्वामित्र व अत्रि यांशी होत नाही. हा गण विश्वामित्रगणांमध्ये पूर्वी सांगितला आहे. ३ जातुकर्ण्य यांचे प्रवर - वासिष्ठ, आत्रेय, जातूकर्ण्य याप्रमाणे तीन प्रवर आहेत. ह्या जातुकर्ण्याचा विवाह वसिष्ठ व अत्रि यांशी होत नाही हा गण वसिष्ठगणामध्ये निर्णयसिंधूत सांगितला आहे. ४ पूर्वी अत्रीच्या गणात सांगितलेले असे अत्रीच्या कन्येचे पुत्र जे वामरथ्यादिक यांचा विवाह वसिष्ठ व अत्रि यांच्याशी होत नाही. अत्रि व विश्वामित्र यांच्याशी होत नाही असे कोणी ग्रंथकार म्हणतात. ५ पूर्वी भारद्वाज गणांतला जो ऋक्ष म्हणून अंतर्गत गण सांगितला त्यामध्ये सांगितलेले आंगिरस, बार्हस्पत्य, भारद्वाज, वांदन, मातवचस ह्या पंचप्रवरांनी युक्त कपिल त्यांचा विवाह विश्वामित्र व भरद्वाज यांच्याशी होत नाही. ६ पूर्वी विश्वामित्रगणामध्ये सांगितलेले; वैश्वामित्र, कात्य, आक्षील या तीन प्रवरांनी युक्त जे कत, त्यांचा विवाह विश्वामित्र व भरद्वाज यांच्याशी होत नाही. याच न्यायाने परगोत्रांत उत्पन्न झालेले असे विद्यमानकालीचे दत्तकादिक त्यालाही दोन गोत्रे आहेत याकरिता जनकपिता व दत्तक घेणारा पिता यांचे जे एकगोत्री त्यांच्याशी त्या दत्तकादिकांचा विवाह होत नाही असे जाणावे. याविषयी अमुक पुरुषपर्यंत विवाह होणार नाही अशी ज्यापेक्षा पुरुषसंख्या कोठे सांगितली नाही, यावरून शंभर पुरुषांनंतरही दत्तकाचे द्विगोत्रत्व दूर होत नाही. क्षत्रिय व वैश्य हे पुरोहितगोत्रप्रवरी आहेत, असा सर्व सिद्धांत जाणावा.