प्रत्युद्वाह म्हणजे आपली कन्या ज्याचे पुत्राला दिली, त्याची कन्या आपले पुत्रास करणे असा विवाह करू नये. एका वराला दोन सोदर बहिणी देऊ नयेत. तसेच दोन सोदर भ्रात्यांना दोन सोदर बहिणी देऊ नयेत. याविषयी अपवाद - सोदर भ्रात्यांना सोदर कन्या एक वर्षाच्या काळाचे अंतर टाकून अथवा महानदी इत्यादिकांचे अंतर असता द्याव्या. पूर्वी दिलेली कन्या मृत झाली असता त्याच वराला दुसरी कन्या द्यावी. दारिद्र्य इत्यादि संकट असता प्रत्युद्वाह करावा. सोदर बंधु, अथवा बहिणी अथवा बंधु व बहीण यांचा समान संस्कार एका वर्षी करणे निषिद्ध आहे. गृह बांधणे व विवाह करणे ही एका वर्षात करू नये. गृहप्रवेशाचा निषेध सांगितला नाही याकरिता गृहप्रवेश करून नंतर विवाह करावा. दोन सोदर पुत्र, सोदर कन्या व पुत्र अथवा दोन सोदर कन्या यांचे विवाह सहा सहा महिन्यांच्या आत करणे विशेष निषिद्ध आहे. "तीन पुरुष कुलामध्ये विवाहानंतर सहा महिन्याच्या आत मौजीबंधन करणे निषिद्ध आहे. सहा महिन्याच्या आत तीन शुभकार्ये करू नयेत." या ठिकाणी शुभकार्य म्हणजे मुंज व विवाह हीच होत. या वरून गर्भाधान, नामकरण इत्यादि संस्कारांना त्रिपुरुष कुलाचा निषेध नाही. अथवा गर्भाधान इत्यादिकाने चवथ्या कार्याची पूर्ति करू नये. "तीन अग्निकार्ये करू नयेत" या वचनाने एकवाक्यतालाघव होते. म्हणून असे वाटते, भिन्नोदरांची तीन अग्निकार्ये करण्यास हरकत नाही, असे कोणी ग्रंथकार म्हणतात. तीन मंगलकार्ये करू नयेत" या वाक्याचा भिन्न अर्थ करून त्रिपुरुष कुलामध्ये कोणतीही तीन शुभकार्ये करू नयेत असे दुसरे ग्रंथकार म्हणतात.
१. पुत्राचा विवाह केल्यापासून सहा महिन्याच्या आत कन्येचा विवाह करू नये.
२. ज्येष्ठमंगल केल्यानंतर लघुमंगल करू नये. बाहेर मंडपामध्ये करण्यास सांगितलेले ते ज्येष्ठ मंगल; त्याहून भिन्न ते लघुमंगल. ज्यांचा काल प्राप्त झाला आहे अशी जी गर्भाधानादिक, त्यांचा निषेध नाही. या प्रमाणे ज्यांचा काल प्राप्त झाला आहे अशी जी शांति इत्यादि नैमित्तिक कर्मे त्यांचा देखील निषेध नाही.
३. ज्यांचा काळ टळून गेला असेल त्यांना मात्र निषेध आहे.
४. याप्रमाणे व्रतांचे उद्यापन, वास्तुप्रवेश इत्यादि मंगलकार्ये लघु आहेत. याकरिता ती विवाहानंतर करण्याचा निषेध आहे. हे चार निषेध त्रिपुरुष कुलामध्ये सहा महिन्यांच्या आत जाणावे. याप्रमाणे दोन मुंडन कर्मे आणि व्रतबंध झाल्यावर चौलकर्म यांचा निषेध आहे असे कोणी ग्रंथकार सांगतात.