परिवेत्तृत्वाचे पापाने मृतभार्यात्व दोष होतो. याकरिता त्या पापाचे परिहारास्तव तीन प्राजापत्ये व तीन चांद्रायणे करावी. वारंवार भार्या मरण पावत असतील तर वरील दोन्ही प्रायश्चिते तितके वेळा (जितक्या भार्या मृत झाल्या असतील तितके वेळा) करून
"मृतभार्या त्वनिरासद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ अयुतसंख्यचर्वाज्यहोमं करिष्ये"
असा संकल्प करून अग्निस्थापनापर्यंत कर्म केल्यावर
"दुर्गाग्निविष्णूनअष्टाधिकयुतसंख्याभिश्चर्वाज्याहुतिभिः" शेषेन स्विष्टकृतमित्यादि
याप्रमाणे अन्वाधान करावे. प्रत्येक देवतेला मंत्रविरहित निर्वाप करून म्हणजे चरु शिजविण्याकरिता स्थालीत तांदूळ घेऊन ते धुवावे. नंतर त्याग करण्याचे वेळी
"अष्टोत्तरायुतसंख्या हुतिपर्याहं चर्वाज्यद्रव्यं यथामंत्रलिंग दुर्गायै अग्नये विष्णवेच नमन"
याप्रमाणे त्याग करावा. नंतर
"जातवेदसे इत्यनुवाकस्य उपनिषद ऋषयः दुर्गाग्नि विष्णवो देवताः त्रिष्टुप छन्दः चर्वाज्यहोमे विनियोगः"
असा होम करावा. पुनः तोच तोच अनुवाक म्हणून प्रत्येक ऋचेने होम करावा. त्यामध्ये प्रथम ५००४ चरु होम करून नंतर ५००४ आज्यहोम करावा. याप्रमाणे अयुत (दहा सहस्त्र) होम करावा. होमशेष समाप्त झाल्यावर दहा ब्राह्मणांना भोजन घालावे. अथवा एका ब्राह्मणाचा विवाह करावा.