सोदर भ्राते अथवा कन्या यांचे समान संस्कार व विवाह, संकट असेल तर वर्षभेदाने करावे अथवा चार दिवसांच्या अंतराने निदान एक दिवसाच्या अंतराने करावे. अत्यंत संकट असेल तर कर्त्याच्या भेदाने अथवा मंडपाच्या भेदाने करावे. दोन कर्ते असतील तर एकाच गृही एकाच लग्नावर भिन्नोदरांचा विवाह करण्यास हरकत नाही. याप्रमाणे वर सांगितलेल्या चार निषेधांविषयी वर्षभेद असेल तर दोष नाही. एका काळी अथवा एका मंडपामध्ये जुळ्यांचे समान संस्कार करण्यास दोष नाही. तसेच माता निराळ्या असतील तर सहा महिन्यांच्या आत समान संस्कार करण्यास हरकत नाही. माता निराळ्या असतील तर एका पित्याच्या दोन कन्यांचे विवाह एका दिवशी व एका मंडपामध्ये निराळी वेदी करून करण्यास हरकत नाही, असे कोणी ग्रंथकार म्हणतात. तीन पुरुष कुलांमध्ये मंगल कार्यानंतर सहा महिन्यांच्या आत मुंडनयुक्त कर्म करु नये. या सर्वासंबंधाने तीन पुरुषांच्या गणनेचा प्रकार प्रतिकूलाच्या विचाराचे समयी स्पष्ट सांगितला जाईल. चौल, नागसंस्कार, (नागबलि) इत्यादि, आधान इत्यादि, अभ्युदय होण्यासाठी ऐच्छिक असे सर्व प्रायश्चित्त इत्यादिक, क्षौराला कारणीभूत तीर्थयात्रा वगैरे सर्व मुंडनकर्मे होत. कात्यायनाचे मते व्रतबंध हा मंगलरूप आहे. म्हणून विवाहानंतर करावा. इतरांचे मते तो मुंडनरूप असल्यामुळे विवाहानंतर करू नये. पितरांच्या अंत्यक्रियेमुळे पाप्त असे मुंडन, आकस्मिक प्राप्त असे प्रायश्चित्तसंबंधी मुंडन, आसन्नमरण अवस्थेमध्ये असताना केलेले सर्व प्रायश्चित्तसंबंधी मुंडन ही अवश्य करावी. दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य इत्यादिकांसंबंधी मुंडन नित्य असल्यामुळे ते करण्यास दोष नाही. "चौल मुंडन होय व व्रतबंध आणि विवाह हे मंगल होत." या वचनावरून मंडन व मुंडन ही निराळी दाखविली. याकरिता आधान इत्यादि करण्यास दोष नाही असे म्हणू नये. कारण वरील वचन उदाहरण दाखविण्याकरिता सांगितले आहे. असे न मानल्यास 'व्रतबंध व विवाह झाल्यानंतर चौल करू नये' असे सांगण्याऐवजी 'मंगलानंतर मुंडन करू नये' असा जो सामान्य नियम सांगितला, तो व्यर्थ सांगितला असे होईल. म्हणून गर्भाधान इत्यादि लघु मंगल व विवाह इत्यादि ज्येष्ठ मंगल यानंतर आधानादिक मुंडनही वर्ज्य करावे असे वाटते. असे झाले असता कुळामध्ये बहुत कर्मे बंद रहात असतील तर विवाह, व्रतबंध, चौल यानंतर मंगल कार्ये झाल्यास पिंडदानादिकांसंबंधी जसा एक महिना इत्यादि अल्पकाळ प्रतिबंध आणि माता व पिता यावाचून अन्य मृत झाल्यास अल्पकाळपर्यंत प्रतिकूल होते म्हणून जसा निर्णय सांगितला त्याप्रमाणे लघुमंगल झाल्यानंतर एक मास इत्यादि अल्पकाळपर्यंत मुंडनाचा निषेध करावा; असी कल्पना युक्तिबलाने योग्य दिसते. यासंबंधाने प्राचीन ग्रंथामध्ये विशेष निर्णय आढळत नाही. तथापि मी हा निर्णय धार्ष्ट्याने सांगितला आहे. तो योग्य वाटल्यास ग्रहण करावे. याप्रमाणे मुंडन मुंडनांचा निर्णय सांगितला.