आता यानंतर कश्यपगण सांगतो - ते कश्यप तीन आहेत. १ निध्रुव, २ रेभ, ३ शंडिल याप्रमाणे तीन. त्यामध्ये १ निध्रुव, कश्यप, अष्टांगिरस इत्यादिक चाळिसांपेक्षा अधिक शंभरापर्यंत निध्रुव आहेत. यांचे प्रवर काश्यप, अवत्सार, नैध्रुव याप्रमाणे तीन आहेत. निर्णयसिंधूमध्ये तर निध्रुवगणानंतर कश्यपगण सांगून कश्यपांचे 'काश्यप' अवत्सार, असित' असे तीन प्रवर सांगितले आहेत व याविषयी शिष्टाचारही आढळतो. २ रेभ यांचे प्रवर - काश्यप, अवत्सार, रैभ्य याप्रमाणे तीन आहेत. ३ शंडिल, कोहल, उदमेध इत्यादिक साठांपर्यंत शंडिल आहेत. यांचे प्रवर-काश्यप, अवत्सार शांडिल्य याप्रमाणे तीन आहेत. 'शांडिल्य' यास स्थानी 'देवल' किंवा 'असित' असा प्रवर आहे. अथवा काश्यप, असित, देवल याप्रमाणे तीन प्रवर आहेत. अथवा अंत्यांचा व्यत्यय करावा. अथवा देवल असित असे दोन अहेत. हे जे कश्यप यांचा परस्पर विवाह होत नाही. कारण; हे कश्यप एकगोत्री व एकसारखे प्रवरी आहेत.