वराने वधूसह आपल्या गृहाप्रत आल्यावर गृहप्रवेशनीय होम करावा असे सांगितले आहे. तथापि शिष्ट लोक सासर्याच्या घरीच करतात. मध्यरात्रीनंतर विवाहहोम झाला असल्यास दुसर्या दिवशी प्रातःकाळी तिथि इत्यादिकांचा उच्चार करून
’ममाग्नेर्गृह्याग्नित्वसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ गृहप्रवेशनीयाख्यं होमं करिष्ये"
याप्रमाणे संकल्प करून गृहप्रवेशनीय होम करावा. मध्यरात्रीच्या अगोदर विवाहहोम झाला असल्यास विवाहहोमानंतर लगेच पुन्हा तिथि इत्यादिकांचा उच्चार करून त्या रात्रीच संकल्पपूर्वक गृहप्रवेशनीय होम करण्यास हरकत नाही. विवाहहोम व ग्रहप्रवेशनीय होम यांचे कोणी एकतंत्राने अनुष्ठान करतात ते योग्य नाही. आश्वलायन, तैत्तिरीय, इत्यादिकांच्या गृह्याग्नीची सिद्धि विवाहाग्नीपासून व गृहप्रवेशनीय होम झाल्यानंतर होते. तैत्तिरीय, कात्यायन, इत्यादिकांच्या पुनराधानाविषयी दुसरा प्रकार आहे. जर रात्री सहा घटीमध्ये अग्नि उत्पन्न होईल तर गृहप्रवेशनीय होमाच्या अभावी व व्यतिपात इत्यादि दुष्ट वेगाचा संभव असेल तथापि त्या वेळीच औपासन होमाला आरंभ करावा. सहा घटिकानंतर अग्नि उत्पन्न होईल तर दुसर्या दिवशी सायंकाळी औपासनहोमाला आरंभ करावा. तो असा- सायंसंध्या करून विवाहाग्नि प्रज्वलित केल्यावर प्राणायाम करून देशकालादिकांचा उच्चार करावा. नंतर
"अस्मिन्विविवाहाग्नौ यथोक्त काले श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ यावज्जीवमुपासनं करिष्ये"
असा संकल्प करून पुन्हा देशाकालादिकांचा उच्चार करून
"श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ सायंप्रातमौपासूनहोमौ करिष्ये ।" तत्रेदानी सायमौपासनहोमं करिष्ये"
असा संकल्प करावा. प्रातः काळी संकल्प करणे असेल तर"
पूर्वसंकल्पितप्रातरौपासनहौमं करिष्ये"
याप्रमाणे करून नंतर होम करावा.
अथत्रिरात्रंवधूवरौबह्मचारिणावलंकुर्वाणावधःशायिनावक्षारालवणाशिनौतिष्ठेताम ॥
यानंतर त्रिरात्रपर्यंत वधूवरांनी ब्रह्मचारी, अलंकारयुक्त राहून भूमीवर शयन करावे, आणि क्षार व लवण यांनी विरहित असे भोजन करावे.