कन्येचा पिता, नंतर पितामह, नंतर भ्राता, नंतर पित्याच्या कुलातील चुलता, नंतर मातृकुलातील मातामह, नंतर मातुल आणि इतक्या सर्वांच्या अभावी कन्येची माता यांनी कन्येचे दान करावे. पहिला नसेल तर दुसरा असा याविषयी क्रम समजावा. भ्राता वगैरे उपनयन झालेला असेल तरच दान करण्याला अधिकार आहे. उपनयन न झालेला भ्राता आणि माता असतील तर मातेलाच दान करण्याचा अधिकार आहे; उपनयन न झालेल्या भ्रात्याला नाही. या सर्वांच्या अभावी कन्येने स्वतः पति करावा, कन्या स्वतः वरणारी असेल अथवा माता दान करणारी असेल तेव्हा त्यांनीच नांदीश्राद्ध करावे. त्यामध्ये माता अथवा कन्या यांनी स्वतः मुख्य संकल्प मात्र करून बाकीचे नान्दीश्राद्धाचे कृत्य ब्राह्मणाकडून करवावे. वराला संस्कार झालेला भ्राता वगैरे नसल्यास त्याने स्वतःच नान्दीश्राद्ध करावे, त्याचे मातेने करू नये; कारण उपनयन झाल्याकारणाने त्याला कर्माविषयी अधिकार प्राप्त झालेला असतो. दुसरा इत्यादि विवाहामध्ये वराने स्वतः नान्दीश्राद्ध करावे दुसर्याच्या कन्येचे दान करण्याविषयी विशेष 'दुसर्याची कन्या परगोत्रातली असली तरी सुवर्णदानाने आपली करून घेऊन नंतर तिचे धर्मविधीने दान करणे युक्त आहे.' याप्रमाणे कन्यादानकर्त्यांचा निर्णय सांगताना वर व वधु यांच्या नान्दीश्राद्धकर्तृत्वाचा निर्णय सांगितला.