नंतर कन्या देणाराने वराचे गृहाप्रत जाऊन
"करिष्यमाण कन्या विवाहाङ्गत्वेन वरस्य सीमान्तपूजा करिष्ये"
असा संकल्प करावा. गणपति व वरुण यांची पूजा करून वराचे पाय धुऊन वस्त्र, गंध, पुष्प, नीरांजन यांनी त्याची पूजा करावी, व जसा आचार असेल त्याप्रमाणे दूध वगैरे प्राशन करवावे. यानंतर वराने वाहनारूढ होऊन मंगल वाद्यांच्या घोषासहवर्तमान वधूच्या गृहाप्रत गमन करावे. वराचे पित्याने जसा आचार असेल त्याप्रमाणे वधूची वस्त्रादिकांनी पूजा करावी. विवाहाचे दिवशी कन्येचा पिता अथवा कन्या यांनी, परस्परांनी आलिंगन दिलेली अशी गौरी व हर यांची सुवर्ण अथवा रौप्य यांनी निर्मित अशी प्रतिमा, कात्यायनी, महालक्ष्मी, शची, इत्यादि देवतांसह पूजावी. चार कोनांचे ठिकाणी स्थापलेल्या चार कलशांच्या पंक्तीच्या मध्यभागी, पाटावरवंटा अथवा वस्त्र यावर तांदुळाच्या राशीवर मांडलेल्या गौरीहरांची पूजा करावी. पूजेच्या प्रसंगी
’सिंहासनस्थां देवेशी सर्वालंकार संयुताम ।
पीतांबरधरं देवं चन्द्रार्धकृतशेखरम ॥
करेणाधः सुधापूर्ण कलशं दक्षिणेव तु ।
वरदं चाभयं वामेनाश्लिप्य च तनुप्रियाम ॥
या मंत्रांनी ध्यान करावे.
"गौरीहर महेशान सर्वमंगलदायक ।
पूजा गृहाण देवेश सर्वदा मंगल कुरु ॥"
या मंत्राने पूजा करावी. कन्येच्या उंचीचे प्रमाणाने सत्तावीस सुतांच्या केलेल्या वातीचा दीप लावून सुवासिन, ब्राह्मण यांना भोजन घालावे. याप्रमाणे गौरीहरांची पूजा सांगितली.