दत्तक कन्येचा विवाह, दत्तक घेणारा पिता करणारा असेल तर त्याने आपल्या पितरांच्या उद्देशानेच पार्वणे करून नान्दीश्राद्ध करावे. दत्तक पुत्राला जर आपल्या जनक पित्याचे धन, जनक पित्याला दुसरा कोणी अधिकारी नसल्यामुळे मिळाले असेल तर जनक पिता व दत्तक घेणारा पिता या दोघांच्याही पितरांचा उच्चार दत्तकाने करावा.
पितरौ पितामहौ प्रपितामहौच नान्दीमुखाः"
याप्रमाणे द्विवचनान्त प्रयोगच सांगितला आहे. जेव्हा जनक पित्याचे धन घेणारा दुसरा अधिकारी असल्याने ते दत्तक पुत्राला मिळाले नसेल तेव्हा दत्तकाने दोन पितरांच्या उद्देशाने नान्दीश्राद्ध न करिता दत्तक घेणार्या पित्याच्याच उद्देशाने करावे. या ठिकाणी क्वचित मातृपार्वण, पितृपार्वण, यांच्या अनुक्रमाचे वैपरीत्य संभ्रमामुळे आले असेल तरी तो अनुक्रम घेऊ नये. सर्वत्र, नान्दीश्राद्धामध्ये अगोदर मातृपार्वण, नंतर पितृपार्वणे आणि त्यानंतर मातामहपार्वण हा क्रम निश्चयेकरून जाणावा. ऋग्वेदी व कात्यायन यांनी
"मातृपितामहीप्रपितामह्यः" असा अनुलोमाने तीनही पार्वणांचे वेळी उच्चार करावा. तैत्तिरीयांनी "प्रपितामह पितामहपितरः" असा उलट क्रमाने उच्चार करावा. एक संस्कार्य असून त्याचे अनेक संस्कार एकाच वेळी करणे असतील तरी नान्दीश्राद्ध एकदाच करावे. याप्रमाणे जुळे पुत्र अथवा जुळ्या कन्या यांचे उपनयन, विवाह वगैरे संस्कार एकाच वेळी करणे असतील तरीही नान्दीश्राद्ध एकदाच करावे. जुळ्या मुलांचे संस्कार एकाच काळी, एकाच मंडपात व एकाच कर्त्याने करण्यात दोष नाही असे सांगितले आहे. नान्दीश्राद्धामध्ये अन्न नसेल तर आमान्न द्यावे. आमान्न नसेल तर हिरण्य द्यावे. हिरण्य नसेल तर
"युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्तान्ननिष्क्रयीभूतं यथाशक्ति किंचिद्रव्यं स्वाहा न मम"
असा उच्चार करून दोन ब्राह्मणांच्या भोजनास पुरेल इतक्या अन्नाचे मूल्य यथाशक्ति द्रव्य द्यावे. बाकीचा सर्व विशेष निर्णय गर्भाधानप्रकरणामध्ये विस्ताराने सांगितला आहे तो पहावा. याप्रमाणे नान्दीश्राद्धाचा निर्णय सांगितला. त्यानंतर मंडपदेवतांची स्थापना, ग्रहयज्ञ ही पुण्याहवाचनाच्या पूर्वी अथवा नान्दीश्राद्धानंतर करावी.