दुष्ट लग्नी उक्त ग्रह, नक्षत्र ही नसता; इतर दुष्ट योगादि अशुभ काली, कूष्मांड मंत्रांनी घृताचा होम यथोक्त विधीने केल्यावाचून सूतक इत्यादिक अशौच असता, विवाह झाला असेल तर त्याच वधूवरांचा सुमुहूर्तावर पुन्हा विवाह करावा. मद्यपि, व्याधिग्रस्त, धूर्त, वंध्या, संपत्तीचा नाश करणारी, अप्रिय भाषण करणारी, कन्या प्रसवणारी, पतीचा द्वेष करणारी अशी स्त्री असेल तर दुसरी स्त्री वंध्या स्त्रीचा दहाव्या वर्षी त्याग करावा. कन्या प्रसवणारी बाराव्या वर्षी त्यागावी, मृतवंध्या पंधराव्या वर्शी त्यागावी, आणि अप्रियवादिनीचा त्याग तत्काळ करावा. या ठिकाणी अप्रियवादिनी म्हणजे व्यभिचार करणारी असा अर्थ समजावा. कारण कलियुगामध्ये प्रतिकूल भाषण बहुधा सार्वत्रिक आहे. आज्ञा पालन करणारी, गृहकृत्याविषयी दक्ष, वीरपुत्र प्रसवणारी आणि प्रियवादिनी अशा पत्नीचा त्याग करून उपभोगाकरिता दुसर्या स्त्रीशी विवाह केला तर पहिल्या भार्येला आपल्या धनाचा तिसरा हिस्सा द्यावा. निर्धन असेल तर तिचे पालनपोषण करावे. "दुसर्या स्त्रीशी विवाह केल्यावर पहिली क्रोधाने घरातून जाईल तर तिला बंदोबस्ताने ठेवावी अथवा आपल्या कुळातील थोर पुरुषांच्या ताब्यात द्यावी." असे मनूचे वचन आहे. अग्निसेवा इत्यादि धर्माचरण ज्येष्ठ भार्येसहवर्तमान करावे. कनिष्ठ भार्येसह करू नये. हे ज्येष्ठ भार्या आज्ञापालक असेल तर जाणावे. जर ती क्रोधी असल्यामुळे वर सांगितलेल्या मनूच्या वचनाप्रमाणे घरात बंदोबस्ताने ठेवण्याला अथवा कुलातील थोर पुरुषांच्या ताब्यात देण्याला लायक असेल तर कनिष्ठ भार्येसह धर्माचरण करावे असे न केले तर धर्मभ्रंश होण्याची भीति आहे. शिवाय "वीरपुत्र प्रसवणारी व आज्ञाधारक, गृहकृत्यामध्ये दक्ष, प्रियवादिनी, पवित्र अशी भार्या धर्मकृत्यासंबंधाने योजावी" अशी माधवग्रंथातील स्मृति आहे. दुसर्या विवाहाचा होम पहिल्या विवाहातील गृह्याग्नीवरच करावा. तो गृह्याग्नि नसेल तर लौकिकाग्नीवर करावा. लौकिकाग्नीवर करावयाचा पक्ष असल्यास दुसर्या विवाहसमयीच्या होमाने सिद्ध केलेला अग्नि गृह्याग्निच होय. याकरिता दोन गृह्याग्नींचा संसर्ग करावा.