भारद्वाज (भरद्वाजकुलोत्पन्न जो शुंग त्यापासून वैश्वामित्र जो शैशिरी त्याच्या क्षेत्राचे (स्त्रियेचे) ठायी झालेला शौंगशैशिरीनामक ऋषि तो गोत्राच्या लक्षणाने युक्त असल्यामुळे त्याला गोत्रत्व आहे. त्याच्या गोत्रांचे प्रवर - आंगिरस, बार्हस्पत्य, भारद्वाज, शौंग, शैशिर असे पाच आहेत. अथवा आंगिरस, बार्हस्पत्य, भारद्वाज, कात्य, आक्षील असे पाच प्रवर किंवा आंगिरस, कात्य, आक्षील असे तीन आहेत. अथवा भारद्वाज, कात्य, आक्षील असे तीन प्रवर आहेत. ह्यांचा विवाह सर्व भरद्वाज व सर्व विश्वामित्र यांशी होत नाही. संकृति, पूतिमाष, तंडि इत्यादिक अठ्ठावीस पर्यंत संकृति आहेत. यांचे प्रवर आंगिरस, गौरिवीति, सांकृत्य असे तीन आहेत. अथवा शाक्त्य, गौरिवीति, सांकृत्य असे तीन आहेत. अथवा अंत्यांचा व्यत्यय करावा. यांचा विवाह आपल्या गणांतील जे पूतिमाषादिक ते, सर्व वसिष्ठगण आणि अहर्वसिष्ठसंज्ञक असे पुढे सांगावयाचे आहेत जे लौगाक्षि ते या सर्वांशी होत नाही. केवल जे अंगिरोगण त्यांच्याशी तर यांचा विवाह होतोच; कारण, ते जरी आंगिरस आहेत तथापि एकगोत्री नसून त्यांचे दोन तीन प्रवरहि एकसारखे नाहीत. कोणी ग्रंथकार, भारद्वाजांस आंगिरसत्व स्वीकारून भारद्वाज जे शौंगशैशिरि यांसहवर्तमान यांचा विवाह होत नाही, असे म्हणतात, परंतु ते योग्य नाही. कारण याला भारद्वाजत्व आहे याविषयी प्रबल प्रमाण नाही. प्रयोगपारिजात ग्रंथांत काश्यपांसहवर्तमान यांचा विवाह होत नाही असे सांगितले आहे, परंतु त्याविषयींचे कारण योग्य नाही असे कौस्तुभांत आहे. लौगाक्षि दार्भायण इत्यादिक अडतिसांपेक्षा अधिक लौगाक्षि आहेत. यांचे प्रवर -काश्यप, अवत्सार, वसिष्ठ असे तीन आहेत. अथवा काश्यप, अवत्सार, असित असे तीन आहेत. त्यांना अहर्सविष्ठ व नक्तंकाश्यप असे म्हणतात, म्हणजे दिवसाचे कर्माचे ठिकाणी वासिष्ठत्वप्रयुक्त जे कार्य ते करणारे आणि रात्रिकर्माचे ठिकाणी काश्यपत्वप्रयुक्त कार्य करणारे असा अर्थ होतो. ह्यांचा विवाह सर्व काश्यप, सर्व वसिष्ठ व संकृति यांच्याशी होत नाही.