विवाहहोमाचा प्रयोग
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
वरानें वेदीवर पूर्वेस तोंड करून पीठादिआसनवार बसावें. आपल्या दक्षिण बाजूस मौन धरलेल्या पत्नीस आसनावर बसवून दोन वेळां आचमन करून प्राणायाम करावा. देश आणि काल ह्यांचे स्मरण करून प्रतिग्रहरूपानें स्वीकार केलेल्या ह्या वधूस भार्यात्व सिद्ध होण्याकरितां आणि गृह्याग्नि सिद्ध करण्याकरितां विवाहहोम करीन त्यांचे अंगभूत स्थंडिलोल्लेपन इत्यादि योजक नामक अग्निस्थापनापर्यंत कर्म करावें. म्हणजे स्थालीपाक तंत्र पृष्ठ ३३ प्यारा५ पर्यंत करावा. अग्नींच्या पश्चिमेस लहानमोठा असें दोन दगड ( पाटा वरवंटा ) ठेवावे. ईशान्यदिशेस तांदुळाच्या राशीवर पाण्यानें भरलेला कुंभ ठेवून त्यावर आंब्याच्या पल्लवाचें आच्छादन करून त्याला गंध, पुष्पांनीं अलंकृत करावा. अग्नीच्या उत्तर बाजूस पूर्वपश्चिम अशा तांदुळाच्या सात राशी कराव्या. नंतर वरानें दोन समिधा घेऊन “ क्रियमाणे० ” येथून “ परिग्रहार्थ ” येथपर्यंत म्हटल्यावर स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ६ “ अन्वाधानं० ” येथून आज्येन० ” येथपर्यंत म्हणावें. नंतर प्रधानदेवता, तीन वेळ अग्निपवमानं, एक वेळ अग्नि, व प्रजापति ह्या देवतांसाठीं आज्यानें; व आर्यमाग्नि, वरुणाग्नि, पूषाग्नि आणि प्रजापति ह्या देवतांसाठी लाह्यांनीं असा उच्चार करून स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेनस्विष्टकृतं० ” येथून पृष्ठ ३९ प्यारा १० “ आसादनम् ” ह्यां सहा पात्रें ठेवण्यापर्यंत करून पात्रें ठेवितांना पात्राचे पश्चिमेस लाह्यांचे सूप ठेवावें. नंतर पृष्ठ ३९ प्यारा ११ “ तत:प्रोक्षणी० ” येथून स्थालीपाक सुरू करून पृष्ठ ४१ प्यारा १२ “ आच्छादयेत् ” येथपर्यंत करावा. पुढें पृष्ठ ४३ प्यारा १६ “ ततस्तेपवित्रे० ” येथून ओळ ४ दर्भोंल्मुकेन ” येथपर्यंत केल्यावर लाजसहित आज्याला तीन वेळ पर्यग्निकरण ( सभोंवती फ़िरविणें ) करून, ओळ ५ “ सहाज्यं० ” येथून पृष्ठ ४३ प्यारा १७ पर्यंत स्थालीपाक केल्यावर तीन वेळ लाह्यांस प्रोक्षण करावें. वधूनें वराच्या उजव्या हातास आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करावा. नंतर वरानें स्थालीपाक पृष्ठ ४४ प्यारा १८ येथून पृष्ठ ४६ प्यारा २२ “ हुत्वात्यक्त्वाच ” येथपर्यंत करावा. नंतर प्रधान होम करावा त्याचे मंत्र “ अग्नआयूंषि० (२५) अग्निरृषि० (२६) अग्नेपवस्व० (२७) त्वमर्यमा० (२८) प्रजापतेनत्व० (२९) या पांच मंत्रांनी तुपाच्या आहुति द्याव्यात.
पाणिग्रहण -- वराने पाङमुख बसलेल्या पत्नीच्या पुढें पश्चिमाभिमुख उभें राहून “ गृभ्णामि० ” (३०) ह्या मंत्रानें पांच अंगुलींसहित उताणा उजवा वधूचा हात आपल्या उताण्या उजव्या हातानें धरावा.
लाजाहोम, प्रदक्षिणा व अश्मारोहण -- नंतर पूर्वस्थानीं येऊन वधूला उठवून तिचें हात धुववून तिची ओंजळ करवून तिच्या ओंजळीस तूप चोपडून तिच्या उभ्या असलेल्या भावाकडून अथवा चुलत भावाकडून वा दुसर्या कोणाकडून सुपांतल्या लाह्या मुठीनें दोन वेळां लोंजळींत टाकवाव्यात. आपण पंचप्रवरी असेल तर तीन वेळां लाह्या घालवाव्यात. सुपांतील व अंजलीतील लाह्यांवर तुपाचा एकवार अभिघार करावा. “ अर्यमंणं० ” (३१) हा मंत्र म्हणून वरानें उभें राहून आपल्या दोन्हीं हातांनीं उभी राहिलेल्या वधूची ओंजळ धरून ती न सुटतां वधूच्या ओंजळीच्या शेवटाकडून किंवा बाजूनें आंतील सर्व लाह्या होमांत घालाव्या. वरानें अर्यमाचें हें हवि माझें नाहीं असें म्हणावें. नंतर वरानें पाटावरव्ण्ट्यावांचून उदककुंभ आणि होमपात्रें ह्यांसह अग्नीस प्रदक्षिणा करवींत वधूचा हात धरून आपण स्वत: पुढें चालावें व वधूनें मागून जावें. प्रदक्षिणा करीत असतां “ अमोहमस्मि० ” (३२) हा मंत्र वरानें म्हणावा. नंतर वधूस दोन्ही पाय पाट्यावर ठेऊन पूर्वेंस तोंड करून उभें रहावयास सांगावें. वरानें “ इममश्मान० ” (३३) हा मंत्र म्हणावा. पुन: पहिल्याप्रमाणें ओंजळीला तूप लावनें इत्यादि करून वधूच्या अंजलींतील लाह्या वरूणंनु० ” (३४) ह्या मंत्रानें होमांत घालून हें हवि वरुणाग्नीचे आहे माझें नाहीं असें म्हणावें. पुन: “ अमोहं० ” (३२) ह्या मंत्रानें अग्नीस प्रदक्षिणा करावी. वधूस पाट्यावर उभी करून “ इममश्मान० ” (३३) हा मंत्र म्हणावा. पुन: पूर्वीप्रमाणें ओंजळीस तूप लावणें इत्यादि सर्व करून लाह्या “ पूषणंनु० ” (३५) ह्या मंत्रानें होमांत घालाव्या. पहिल्याप्रमाणें “ अमोह० ” (३२) या मंत्रानें प्रदक्षिणा करावी. वधूस पाट्यावर उभी करून “ इममश्मान० ” (३३) हा मंत्र म्हणावा. नंतर पूर्वस्थानीं बसून वरानें बाकी उरलेल्या लाह्यांचे सूप आपल्याकडे सुपाचे तोंड होईल असें करून कोनानें “ प्रजापतयेस्वाहा ” म्हणून सर्व लाह्या होमांत घालाव्या. ह्यावेळेस प्रदक्षिणा व अश्मारोहण ( पाट्यावर उभे राहणें ) ही करावयाची नाहींत.
सप्तपदी - नंतर अग्नीच्या उत्तरेस घातलेल्या तांदुळांच्या सातही राशीवरून वरानें वधूस चालवाई. वधूनें प्रत्येक राशीवर आपला उजवा पाय ठेवतेवेळी वरानें प्रत्येक राशीवर एक मंत्र असें सात राशीवर पुढील सात मंत्र म्हणावें. “ इषए० (३६) ऊर्जेद्वि० (३७) रायस्पो० (३८) मायोभ० (३९) प्रजाभ्य:० (४०) ऋतुभ्य:० (४१) सखासप्त० (४२). इत्यादि यावरून पहिल्या मंत्राप्रमाणें “ साममनुव्रत ” येथून संपूर्ण मंत्र प्रत्येक वेळी म्हणावा.
अभिषेक व धुव सप्तर्षि दर्शन - नंतर पूर्वी ईशान्यदिशेस ठेविलेला कलश कोणाकडून आणवून तेथेंच वरानें आपल्या मस्तकानें वधूचे मस्तकास स्पर्श करून कलशांतील पाणी घेऊन प्रथम आपले मस्तकावर नंतर वधूचें मस्तकावर पृष्ठ १२ ओळ १६ “ शांतिरस्तु ” येथून इष्टसंपदस्तु पर्यंत १५ मंत्रांनीं अभिषेक करावा. मग आपल्या आसनावर बसून तुपानें स्विष्टकृत् होम समाप्त करावा म्हणजे स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ येथून पृष्ठ ५३ प्यारा ३२ पर्यंत करावा. पूर्वी बांधलेल्या उभयतांच्य वस्त्रांची गांठ न बोलता सोडावी. नंतर वरानें ध्रुव, अरुंधती, सप्तर्षि, इत्यादिकांस वधूसह पाहून “ जीवनपत्नीप्रजांविंदेय ” (४३) असें वधूकडून बोलवावें, नंतर वधूनें धरलेलें मौन सोडावें. दिवसां विवाह झाला असेल तर सायंकाळची संध्या करून ध्रुवदर्शन करावें. रात्रींस विवाह झाला असेल तर सायंसंध्या करण्यापूर्वी ध्रुव इत्यादिकांचें दर्शन करावें. ह्या दिवसापासून विवाहाग्री ( गृहाग्नि ) स्थापन केला पाहिजे. असा हा विवाहहोम संपला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP