रोगापासून रक्षण होऊन अलंकार धारण करणे याकरितां आणि बालकाची पुष्टि, आयुष्य व श्री यांची वृद्धि व्हावी एतदर्थ हा संस्कार सांगितला आहे. ६ व्या, ७ व्या, ८ व्या महिन्यांत, शुभवारी जया ( ३ - ८ - १३ ) तिथि तसेंच पूर्णा ( ५ - १० -१५ ) तिथि, पुनर्वसु, धनिष्ठा, मृग, पुष्य, अश्विनी, हस्त, श्रवण, तिन्ही उत्तरा या नक्षत्री शुक्लपक्षी कर्णवेध करावा. जन्ममास, भद्रा, चातुर्मास हे वर्ज्य आहेत. जन्मदिवसापासून दहाव बारावा किंवा सोळावा ह्या दिवशीं बालकाचे कान टोंचावे ज्योति:शास्त्रांत सांगितलेल्या शुभ दिवशीं विष्णु, रुद्र, ब्रह्मा, सूर्य, चंद्र दिक्पाल अश्विनीकुमार, सरस्वती, गाय, ब्राह्मण, गुरु यांची पूजा करून आळत्याच्या रसानें अंकित असा कान पुरुषाचा पूर्वीं उजवा टोंचून नंतर डाव टोंचावा. स्त्रिय़ांचा डावा पूर्वीं टोंचावा बालकाच्या आठ अंगुलें लांबीची सूची ( सुई ) असावी, ती अशी - राजपुत्राच्या कर्णवेधा विषयीं सुवर्णाची, ब्राह्मण व वैश्य यांना रुप्याची, शूद्राला लोखंडाची याप्रमाणें सुई करावी. कानाला छिद्र ( भोंक ) करणें तें सूर्याचें किरण आंत शिरेल इतकें मोठें करावें. कर्णवेधावांचून बालकाला पाहिलें असतां पूवेपुण्याचा नाश होतो.