मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
गर्भाधानसंस्कार निर्णय

गर्भाधानसंस्कार निर्णय

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


त्यामधे गर्भांधानाला उपयोगी असल्यामुळे प्रथम रजोदर्शनाचे ठिकाणी वाईट असे जे मास इत्यादिक त्यांचा निर्णय सांगतों - चैत्र ज्येष्ठ आषाढ, भाद्रपद, कार्तिक, पौष हे मास दुष्ट होत. प्रतिपदा, रिक्ता ( चतुर्थी, नवमी, चतुर्दशी तिथि ), अष्टमी, षष्ठी, द्वादशी, पौर्णिमा ह्या तिथींचे ठिकाणीं प्रथमरजोदर्शन निंद्य होय. तसेंच रविवार, मंगळवार, शनिवार, हे वार निंद्य होत. भरणी, कृतिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा, ज्येष्ठा, विष्कंभ, गंड, अतिगंड, शूल, व्याघात, वज्र, परिघाचे पूर्वार्ध, व्यतीपात, वैधृति, भद्रा, ग्रहण, रात्रि, संधिकाल, अपराण्हकाल, निद्रावस्था, जीर्ण वस्त्र, तांबडे वस्त्र, निळे वस्त्र, तर्‍हेतर्‍हेच्या रंगाचे वस्त्र, नग्नपणा, दुरर्‍याचे गृह, परग्राम यांचे ठिकाणी प्रथमरजोदर्शन निंद्य होय. तें रजोदर्शन अल्प, अधिक व रंगानें निले इत्यादिक असेल तर दुष्टफ़ल होय. केरसुणी, काष्ठे, तृण, अग्नि आणि सूप हे पदार्थ हातांत घेतले असून त्यावेळीं पहिल्यानें रजोदर्शन होईल तर ती स्त्री जारिणी होते. वस्त्राचें ठिकाणीं रुधिरबिंदु विषम ( १, ३, ५, ७ इत्यादि, असतील तर ते पुत्रफ़ल देणारे होतात, सम ( २, ४, ६, ८ इत्यादि ) असल्यास कन्याफ़ल देणारे होतात.
आता पहिल्यानें रजोदर्शन झाल्यानंतरचा विधि --  तांदुळाचें आसन करून त्या आसनावर त्या स्त्रियेला बसवून पति व पुत्र यांनी युक्त अशा स्त्रियांनीं हळद, कुंकू,गंध, पुष्पांची वेणी, तांबूल इत्यादिक उपचार त्या स्त्रियेला देऊन दिवे ओवाळून, दिवे, आरसे इत्यादिकांनीं सुशोभित केलेल्या अशा गृहांत ( मखरांत ) त्या स्त्रियेला बसवावे आणि सुवासिनींना गंध, हळद, कुंकू इत्यादि व लवण, मूग इत्यादिक द्यावीं.
सार्वकालिक रजोदर्शनाचे साधारण नियम -- तीन रात्रीपर्यंत कोणाला स्पर्श करूं नये. तैलाभ्यंग, डोळ्यांत काजळ घालणें, स्नान, दिवसा निद्रा, अग्निस्पर्श, दांत घासणें, सूर्य इत्यादिकांचें दर्शन, भूमीचे ठिकाणीं रेषा काढणें ही वर्ज्य करावी. भूमीवर निद्रा करावी. ओंजळीने तांब्यांच्या किंवा लोखंडाच्या पात्रानें उदक प्राशन करूं नये. जी स्त्री अल्पपात्रानें उदक प्राशन करिते तिला पुत्र खुजा होतो. नखें छेदून टांकिली असता कुनखी पुत्र होतो. पानानें उदकादिक प्राशन केलें असतां पुत्र उन्मत्त होतो. दुसरा, तिसरा, इत्यादिक ऋतु प्राप्त झालें असता त्या रजोदर्शनावस्थेमध्ये प्रवास; गंध, पुष्पांच्या वेण्या, इत्यादिकांचे धारण; तांबूल, गोरस यांचे भक्षण, पाट, चवरंग इत्यादि कांवर बसणे हीं वर्ज्य करावी. मातीच्या किंवा लोखंडाच्या: पात्रांत भूमीवर बसून भोजन करावे. ग्रहण इत्यादि निमित्तानें स्नान अवश्य प्राप्त होईल तर उदकांत बुडी मारून स्नान करू नयें, तर दुसर्‍या पात्रांत उदक घेऊन त्या उदकानें स्नान करावे. वस्त्र पिळूं नये व दुसरें वस्त्रहि नेसूं नये, याप्रमाणें सुतक इत्यादि निमित्तानें स्नान प्राप्त झालें असतांहिं असाच निर्णय जाणावा.
याप्रमाणें तीन दिवस विटाळ धरून चवथ्या दिवशीं शुद्धि झाल्यानंतर शुभ दिवशीं दुष्टरजोदर्शनप्रमुक्त अशी शौनकानें सांगितलेली भुवनेश्वरी शांति करून गर्भाधान करावें त्यामध्यें पहिल्या ऋतुचें ठिकाणी गमन करणें तें गृग्याग्नीवर गर्भाधानसंबंधीं होम करून करावें. अग्नीचा नाश झाल्यास प्रायश्चित करून नंतर पुन: संधानविधीनें अग्नि उत्पन्न करून त्या अग्नीवर गर्भाधानहोम करावा.
गर्भाधानसंस्कारांच्यासंबंधानें होमादिक न करितां स्त्री गर्भिणी झाली तर त्यास प्रायश्चित आश्वलायनानें सांगितलें आहे कीं, गर्भाधानसंस्कार न करितां संतति जन्मेल तर ती संतति दोषयुक्त होते. याकरितां एक गोप्रदान करावें. आणि झालेल्या गर्भाचा पुंसवन संस्कार पतीनें करावा.
गर्भाधानसंस्कार हा ऋतुकालचेठायी करावा. ऋतुकाल म्हणजे रजोदर्शन झाल्यापासून प्रथम ज्या सोळा रात्री तो होय. याविषयी मनूचे वचन असें आहे कीं, स्त्रियांस रजोदर्शन झाल्यापासून ज्या सोळा रात्री तोच ऋतुकाल होय. त्यांतील पहिल्या चार व एकादश व त्रयोदश ह्या रात्रीं वर्ज्य कराव्या व बाकी शेष राहिलेल्या ज्या दहा रात्रीं त्या त्या संस्कारास प्रशस्त. यांत मनूनें चवथा दिवस वर्ज्य सांगितला, परंतु कित्येकांनीं चवथा दिवसही घेतला आहे. याविषयीं महाभारतांतील वचन असें आहे कीं, चवथ्या दिवशी न्हाल्यावर रात्रौ स्त्रीशीं गमन करावे. मदनरत्नांतही तसेंच देवलाचे वचन सांपडतें अत्रि संहिताही याप्रमाणेंच आहे. ऋतुमतीस्त्री तीन दिवस चांडाळीण आहे ती वर्ज्य करावी. ऋतुस्नात स्त्री तीन देवसपर्यंत अनुक्रमें चांडाळी, ब्रह्मघातकी आणि रजकी असल्यामुळें वर्ज्य करावी. चतुर्थ दिवशीं पतिसेवेविषयीं शुद्ध होते. निषिद्धरात्री टाकून बाकीमध्यें मुलगा होऊं इच्छिणारानें या ऋतुकालाच्या सम दिवशी व कन्येच्छूनें विषम दिवशीं ४,  ६, ८, १०, १२, १४, १६, विषमरात्रीं म्हणजे ५, ७, ९, ११, १३, १५ ह्या जाणाव्यात. ह्यांचेठांयी स्त्रीसंभोग झाला असतां अनुक्रमें पुत्र व कन्या प्रसवतात.
शिवरहस्यांतील वचन असें आहे कीं, दोन्ही लोकीं सुख इच्छिणार्‍या मनुष्यानें दिवसा, जन्मदिवशीं, श्राद्ध केल्यादिवशीं, श्राद्धी जेवलें असतां पर्वदिवस, पौर्णिमा, आमावस्या व्यतिपात, व उपोषण असेल त्या दिवशीं; तसेच अष्टमी, चतुर्दशी, जन्मनक्षत्रीं संध्याकाळचे वेळीं स्त्रीगमन वर्ज्य करावें. द्वेषादि कारणामुळे ऋतुकाली स्त्रीशी गमन न केलें असतां दोष सांगितला आहे. त्याविषयीं पराशर स्मृतींतील वचन असें आहे कीं, ऋतुमती भार्या समीप असून तिच्याशीं गमन न केलें असतां भ्रूण हत्येचे महापातक लागतें. ऋतुकालीं निषिद्ध दिवस आला असतां उत्तररात्रीं गमन करावें. स्त्री रोगी प्रवासी अथवा दुराचरणीं असल्यामुळें ऋतुकालीं गमन न केलें असतां दोष नाहीं. मिताक्षरेमध्यें असें सांगितलें आहे कीं, ऋतुकालाचे ठायीं श्राद्धदिवशींही स्त्रीगमनास दोष नाहीं. परंतु त्यांचें तें सांगणे सोळा दिवसांमध्यें श्राद्धदिवसांवाचून अन्यदिवशीं स्त्रीगमन करण्याचा संभव नसेल तरच आहे. ऋतु प्राप्त होण्याच्यापूर्वी स्त्रीशी गमन करूं नये केलें असतां दोष सांगितला आहे याप्रमाणेम ऋतुकालीं गमनागमनाचा विचार जाणावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP