गृहस्थश्रमी प्रापंचिक लोकांस प्रपंचामध्यें पुढें विघ्नें उत्पन्न होण्याचा संभव आहे हें कशावरून समजावे. तीं कारणें - खोल पाण्याच्या प्रवाहांत वाहून जाणे किंवा डोहांत बुडणें, क्षौर केलेलीं, भगवी, तांबडी, काळीं अशीं वस्त्रें धारण केलेलीं माणसें दृष्टीस पडणें, मांस खाणारे गीध वगैरे दुष्ट पक्षी, व्याघ्रादि पशु यांच्यावर बसणें, चांडाल, गाढव, उंट यांनीं आपणास वेढा घालणें, आपण वाटेनें गमन करीत असतां पाठीमागून शत्रूनीं धांवत येऊन आपल्यास मार देणें, इतक्या स्वप्नंपैकीं कोणतेंही एकादे स्वप्न पडेल तर खचित समजावें कीं, पुढें लवकरच कांहीं तरी विघ्न उपस्थित होणार आहे. म्हणून अगोदर त्यांनीं विनायकशांति केलीं म्हणजे सर्व विघ्नें निवारण होतात.
आतां प्रत्यक्ष दुष्ट शकुन कसे असतात ते सांगतात -- चित्तभ्रमिष्ठ होऊन कांहीं सुचेनासें होणें, लाभासाठीं एखादा धंदा उद्योग करण्यास आरंभ केला तर त्यांत कांहीं लाभ होऊ नये, उलट नुकसानी व्हावी. विनाकारण मनाला उदास वाटावें. याप्रमाणें जर प्रत्यक्ष दु:शकुन होतील तर विघ्न उत्पन्न होण्याचा संभव असल्यामुळें विनायकशांति करावी, म्हणजे विघ्नें दूर होतात.
आतां व्यक्तिपरत्वें दु:शकुन सांगतात -- राजा शौर्यधैर्यादि राजकीय गुणांनीं संपन्न असूनही त्यास राज्यप्राप्त न होईल तर, कुमारी ( कन्या ) रूपादि सुलक्ष्णादि गुणवती असूनही विवाह न होईल तर, गर्भिणीस्त्रीचें लेंकरूं वांचत नसेल तर, ऋतुमतीस्त्रीस गर्भधारण होत नसेल तर, ब्राह्मण वेदशास्त्र पढलेला आचारशील असूनही त्यास आचार्यत्व न मिळेल तर, शिष्यास अध्ययन व श्रवण ध्यानांत रहात नसेल तर, व्यापार्यास व्यापारांत नफ़ा न होईल तर, शेतकर्याचें चांगला पाऊस पडूनही शेतांत पीक न पिकेल तर, याप्रमाणेम उपनयन व विवाह यांमध्यें विघ्न उत्पन्न होईल तर तें दु:शकुन समजावेत. असें दु:शकुन ज्यास होतील त्यानें सर्व कामें एकीकडे ठेऊन अगोदर विनायकशांति करावी, म्हणजे सर्व विघ्नें निवारण होऊन इच्छिलेली कार्ये सिद्धीस जातात.