कर्त्यानें पत्नीसह कुमारासह मंगलस्नान करून नित्यकर्म केल्यावर वस्त्रानें आच्छादित केलेल्या पीठावर पत्नींसह पूर्वेस तोंड करुन बसावें. कुमारास आपल्या उजवे बाजूस बसवावें. आचमन करून पवित्रकें धारण करून प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करावा. माझ्या मुलास गुरुजवळ विद्या प्राप्त होण्याकरितां आज अक्षरस्वीकार संस्कार करितों असा संकल्प करून, त्याच्या अंगभूत गणपतिपूजन व स्वस्तिवाचन करीन असा संकल्प करून त्याप्रमाणें ती करावीत.
नंतर गोमयानें सारविलेल्या गोचर्म मात्र शुद्ध जाग्यावर वाळूं घालून त्यावर पळसाच्या शाखेनें खणलेल्या मृत्तिकेची वेदी करून त्या वेदीवर तांदुळांचे ढीग करून त्यावर दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा क्रमानें सरस्वती, लक्ष्मी देवी, गणपति, विष्णु आणि आपले सूत्रकार यांच्या सुवर्णप्रतिमा अग्न्युत्तारण प्राणप्रतिष्ठापूर्वक ठेवाव्या, अथवा मध्यें सरस्वती, दक्षिणेस विष्णु, उत्तरेस लक्ष्मी, पश्चिमेस गणपति आणि पूर्वेस दक्षिणेकडून उत्तरेकडे असे क्रमानें आपले विद्यासूत्रकार व विद्येची नामदेवता यांची स्थापना करावी. नंतर “ पावकान: सरस्वती० ” या मंत्रानें सरस्वतीचें आवाहन करावें. “ इदंविष्णु ” या मंत्रानें विष्णूचें, “ सक्तुभिव० ” या मंत्रानें लक्ष्मीचें, “ देवींवाच० ” या मंत्रानें वाग्देवीचें, ” गणानांत्वा० ” या मंत्रानें गणपतीचें. “ यइमा० ” या मंत्रानें विश्वकर्म्याचें, “ मयोभू० ” या मंत्रानें मयमुनीचें आवाहन करावें. त्याचप्रमाणें नाममंत्रानें ऋग्वेद, अश्वलायन, शिल्पशास्त्र यांचें आवाहन करावें. “ तदस्तु० ” हा मंत्र म्हणून प्रतिष्ठा करावीं. नंतर ॐ सरस्वत्याद्यावाहितदेवताभ्योनम: ” या मंत्रानें पाद्य, अर्ध्य, आचमनीय, गंध, पुष्प, अक्षत, धूप दीप पायस ( क्षीर ) व गूळभात यांचा नैवेद्य उपचारांनीं पूजा करून नमस्कार करावा.
नंतर “ अद्यपूर्वो० ” अक्षरस्वीकार होम करण्याकरितां स्थंडिलादि कर्म करितों असा संकल्प करून, स्थालीपाक पृष्ठ ३३ पासून पृष्ठ ३७ प्यारा ६ “ आज्येन ” येथपर्यंत करावा पुढें “ अत्रप्रधानं० ” येथून “ आज्येन ” येथपर्यंत ह्मणावें. नंतर स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेण० ’’ येथून पृष्ठ ४१ प्यारा १२ “ आच्छादयेत् ” येथपर्यंत, पुढें पृष्ठ ४३ प्यारा १६ “ ततस्तेपवित्रे० ” येथून पृष्ठ ४६ प्यारा २३ “ समप्रदेशेहुत्वा ” येथपर्यंत स्थालीपाक करावा. नंतर सरस्वती, विष्णु, लक्ष्मी, देवी, गणप्ति, विश्वकर्मा, मय, ऋवेद, आश्वलायन, शिल्पशास्त्र ह्या देवतेला आवाहनांत सांगितलेल्या मंत्रांनीं तुपाच्या आहुति द्याव्यात. नंतर स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ येथून पृष्ठ ५३ पर्यंत करावा.
आचार्यानें अग्नीच्या उत्तरेस पूर्वेंस तोंड करून बसावें, कुमारानें आचार्यगुरूची गंध वस्तादिकांनीं पूजा करावी. कुलदेवता, दाई, राम, गुरु, ब्राह्मण, माता, पिता, यांना नमस्कार कारावा. सरस्वती, गणपति, आचार्य यांना तीन प्रदक्षिणा करून आचार्याकडे पश्चिमेस मुख करून बसावें. आचार्यानें सुमुहूर्तावर ॐकारपूर्वक अक्षरांस आरंभ करवावा. नंतर गुरूनें दाखविलेल्या क्रमानें “ ॐ नम:सिद्धं ” हे आवाहन क्रमानें विसर्जन करावें. ब्राह्मणांची पूजा करावी. पित्यानें या कुमारास विद्यावृद्धि व्हावी असें बोलण्याविषयी ब्राह्मणांस प्रार्थना करावी, ब्राह्मणांनीं विद्यावृद्धि होवो असें बोलावें. ब्राह्मणांस भूयसे दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यावेत. असा अक्षरस्वीकार संस्कार संपला.