वधूवरांचे परस्पर निरीक्षण
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
*सुमुहूर्त जवळ आला म्हणजे ब्राह्मणांनीं अलंकृत केलेल्या घराचे आंत एक हाताच्या अंतरानें पूर्व पश्चिम प्रत्येकीं एक शेरभर पांढर्या तांदुळाच्या दोन राशि कराव्यात आणि शेल्याच्या मध्यभागीं कुंकुंम इत्यादिकांना दोन्ही बाजूस स्वस्तिक काढून उत्तरेस दशा करून तो अंत:पट दोघांनीं धरावा नंतर पूर्व राशीवर पश्चिमेस तोंड करून वराला उभें करावें आणि पश्चिम राशीअर पूर्वेस तोंड करून कन्येला उभें करावें. दोघांच्या हातांत तांदूळ, गूळ, जिरे हें एकत्र करून दिलेले असावें. ह्या वेळीं ब्राह्मणांनीं “ +सत्येनोत्तभिता० ” हें सूक्त पठण करावें. सुवासिनींनीं मंगलकारक गीत गात असावें. वधू आणि वर ह्या उभयतांनीं मनानें आपल्या कुलस्वामींचें स्मरण करीत अंत:पटावरील स्वस्तिकाकडे एकाग्रमनानें पहात उभें रहावें.
नंतर ज्योतिषानें x मंगलष्टकांचा पाठ करावा आणि आपण सांगितलेल्या लग्नावर “ तदेवलग्नम्० ” इत्यादि पठण करून सुमुहूर्त असो, असें बोलावें. ॐ प्रतिष्ठा असें म्हटल्यावर तत्काळ अंत:पट दूर करून, कन्या आणि वर ह्यांनीं एकमेकांच्या मस्तकांवर आपआपल्या ओंजळीतील तांदूळ, गूळ व जिरें टाकावें आणि एकमेकांनीं एकमेकांस पहावें.
त्या वेळेस वरानें “ ॐ अभ्रातृघ्नीं० ” (१७) हा मंत्र म्हणत कन्येला पहावें; आणि कन्या पहात असतां “ अघोरचक्षु० ” हा मंत्र म्हणावा. नंतर दर्भाच्या अग्रानें कन्येच्या भुवयांच्या मध्यभागाला “ ॐ भूर्भुव:स्व: ” असें म्हणून स्पर्श करून तो दर्भ फ़ेंकून द्यावा आणि पाण्यानें हात धुवावा. नंतर वरास पूर्वाभिमुख आणि वधूस पश्चिमाभिमुख अशी एकमेकांसमोर आसनावर बसवावी. ब्राह्मणांनीं* “ ऋक्चवा इदमग्रे० ” इत्यादि ब्राह्मणांतील खंडे म्हणवीत. उपाध्यायानें उभयतांच्या हातीं अक्षता द्याव्या आणि ऋक्चवा इत्यादि खंडाच्या वाक्याचे शेवटी प्रथम वधूकडून नंतर वराकडून एकमेकांच्या मस्तकांवर अक्षता घालाव्यात. असें पुन: पुन: तीन वेळ किंवा पांच वेळ करवावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP