मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
उपनयनाचा प्रयोग

उपनयनाचा प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


नंतर दुसरे दिवशीं आपल्या रोजच्या नित्यनियमाच्या क्रिया आटोपल्यावर ज्यानें मंगलस्नान केलें आहे, अलंकार धारण केले आहेत, अशा बालकाला आईंच्या मांडीवर बसवून जेवण झाल्यावर उपनयन करणारानें देश आणि काल ह्यांचें संकीर्तंन करून, ह्या बालकाला उपनयन करण्याकरितां त्यांचे पूर्वीचें अंगरूप वपन इत्यादि करीन असा संकल्प करून वपन झालेल्या, स्नान केलेल्या शेंडी बांधलेल्या अशा बालकास मंगलकारक तिलक करावा. ह्या वेळीं ज्योतिषी याची पूजा करून, त्यानें सांगितलेल्या मुहूर्तावर आचार्यानें वेदीवर पूर्वेस तोंड करून बसावें, आणि त्या बालकाला मंगलकारक पद्यांचा म्हणजे श्लोकांचा पाठ करीत आपल्या जवळ आणून त्याचें तोंड न्याहाळून पहावें. त्या बालकानें आचार्याला नमस्कार करावा, नंतर त्याला आपाल्या मांडीवर बसवावें.
नंतर आचारानुसार “ येयज्ञेन० ” ह्या सूक्तानें “ बृहसप्ते० ” ह्यानें “ तदस्तु० ” ह्या मंत्रांनीं ब्राह्मणांनीं दोघांच्या मस्तकांवर हरिद्रादिमिश्रित अक्षता टाकाव्या.
नंतर त्याला आपल्या उजवीकडेस बसवून आचमन प्राणायाम करून स्थंडिलाचे लेपनापासून तो अग्निस्थापनाप्र्यंत म्हणजे स्थालीपाक तंत्र पृष्ठ ३३ प्यारा १ पृष्ट ३७ प्यारा ५ पर्यंत करावें. पाणी सोडावें. नंतर दोन समिधा घेऊन पृष्ट ३७ प्यारा ६ “ अस्मिन्नत्वा० ” येथून “ आघारदेवतेआज्येन ” येथपर्यंत म्हणून “ त्रिरग्निं० आज्येन ” येथपर्यंत म्हणावें. नंतर स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेण० ” येथून पृष्ठ ४१ प्यारा १२ पृष्ठ ४३ प्यारा१६ - १७ पर्यंत करावा.
नंतर आचार्यानें अग्नीच्या पश्चिमेस बसावे व बटूस प्राङमुख बसवून कौपीनाकरितां म्हणजे ल्म्गुटीकरितां त्रिगुनित असें कापसाचें सूत्र कंबरेस बांधून लंगोटी नेसवावी. “ युववंस्त्रा० ” (१) हा मंत्र म्हणू दुसर्‍या जन्माच्या गर्भाच्या पिशवीबद्दल मोठे असें शुभवस्त्र धारण करावें आणि दुसर्‍यानें नवें पिवळें वस्त्राचें पांघरूण त्याच मंत्रानें घालावें. “ मित्रस्यचक्षु: ” (२) ह्यानें हरणाचे चर्म धारण करवावें.
यज्ञोपवीत धारण :- त्यानंतर गायत्रीच्या दहा मंत्रांनीं प्रोक्षण केलेल्या पाण्यानें उपवीतावर प्रोक्षण करून तें उपवीत धारण करावें. त्यावेळी “ यज्ञोपवीत० ” (३) हा मंत्र कुमाराकडून म्हणवून त्याचा उजवा हात वरती करून यज्ञोपवीत धारण करवावें. बालकाला आपण अग्नि ह्यांच्यामधून यज्ञपात्राच्या उत्तरभागेस नेववून तेथें * यथाविधिप्रमाणें आचमन करावें.
प्रधान होम :- पुन: तसेंच परत आणून आपल्या दक्षिनेस बसवून बर्हिरास्त रणापासून तों आघारापर्यंतचा होम कराआ, म्हणजे स्थालीपाक पृष्ठ ४४ प्यारा १८ पासून पृष्ठ ४६ प्यारा २२ “ हुत्वात्यक्त्वाच ” येथपर्यंत करावा.
नंतर “ अग्नयायूंषि० ” ४ “ अग्निरृषि:० ” ५ “ अग्नेपवस्व० ” ६ हे तीन मंत्र म्हणून तुपाच्या तीन आहुति अग्नींत द्याव्या, हे हवि अग्नि व पवमान हयांचे आहेत माझें नाहींत असें म्हणावें. “ प्रजापते० ” (७) हा मंत्र म्हणून अग्नींत तूप घालावें आणि हें हवि प्रजापतीचें आहे माझें नव्हे असें बोलावें.
सूर्याकडे पहाणे इत्यादिक्रिया - नंतर अग्नीच्या उत्तरेस आचार्यानें पूर्वेस तोंड करून उभे रहावें. आणि कुमारानें अग्नि व आचार्य यांच्या मधून जाऊन आचार्याकडे तोंड करून उभे राहावे. त्यानंतर आचार्यानें बालकाला पवित्रपणा येण्याकरितां आणि सवितृ म्हणजे सूर्यदेवतेची तृप्ति होण्याकरितां ओंजळीचें क्षालन करीन असें बोलून, शुद्ध पाण्यानें शिष्याची म्हणजे त्या कुमाराची ओंजळ भरून आणि आपली ओंजळही दुसर्‍याकडून भरवावी, आणि “ तत्सवितु:० ” (८) हा मंत्र बोलून आपल्या ओंजळींतलें पाणी शिष्याच्या ओंजळींत घालावें आणि ते पाणी शिष्याच्या ओंजळींनेच खाली सोडावें. त्यानंतर कुमाराला शिष्यत्व सिद्ध करण्याकरितां त्या आपल्या उजव्या हातानें कुमार बटूच्या अंगुष्ठासह उजवा हात धरावा. हात धरण्याचा मंत्र असा. कीं, “ देवस्य० ” (९) ह्या मंत्रानें हात धरल्यावर, हे अमुक नांवाच्या बटो असें बोलावें. आणि पुन: पहिल्याप्रमाणें ओंजळ पाण्यानें भरण्याचा प्रकार करून, “ अग्निरा० ” (११) हा मंत्र बोलावा आणि हे अमुक नांवाच्या बटो असें तिसर्‍यांदा बोलावें.
नंतर आचार्यानें “ ब्रह्मचार्यासह निघून “ देवसवित ” (१२) हा मंत्र म्हणून बटूचें संरक्षण करण्याकरितां ह्या बटूला व्रताचा मालक जो सूर्य त्याला देतो, असें मनानें स्मरण करून, ब्रह्मचार्याकडे आणि सूर्याकडे पहावें.
नंतर एकमेकांनीं पूर्वीप्रमानें अग्नीच्या उत्तरेस एकमेकांच्या समोर उभें रहावें. नंतर आचार्यानें “ कस्य० ” (१३) हा मंत्र जपीत प्रजापतीला कुमाराचें समर्पण मनानें करावें. “ युवासुवासा० ” (१४) हा मंत्र बोलून बटूकडून प्रदक्षिण आवर्तन करून पूर्वेस तोंड करून त्याला बसवावें. त्या बालकाच्या खांद्यावर आपले दोन हात ठेवून “ तंधीरास:० ” (१५) हा मंत्र बोलून बटूच्या हृदयास स्पर्श करावा. त्या नंतर आपल्या आणि अग्नीच्या मधून बटूला न्यावें आणि अग्नीच्या पश्चिमेस स्वत: बसून आपल्या दक्षिणेस त्या बटूला पूर्वेस तोंड करून बसवावें.
*ब्रह्मचार्‍याचे अग्निकार्य :- नंतर बटूनें अग्नीस परिसमूहन आणि पर्युक्षण करावें. “ अग्नये० ” (१६) हा मंत्र बोलून अग्नींत समिधा घालाव्या, हें अग्नीचें आहे माझें नाहीं असे म्हणावें. उजवा हात धुवून अग्नीवर तापवून “ ॐ तेजसा० ” (१७) ह्या मंत्रानें तोंडास स्पर्श करून हात धुवावा. असें पुन: दोन वेळां करावें. नंतर उभें राहून नमस्काराची मुद्रा करावी. “ मयिमेधां० ” (१८) ह्या सहा मंत्रांनीं अग्नीची स्तुति केल्यावर “ मानस्तोके ” (१९) हा मंत्र बोलून भस्म घ्यावें. जसा आचार असेल तसें “ त्र्यायुषंजमदग्ने ’ ह्यानें कपाळावर भस्म लावावें, “ कलशपस्य० ” ह्यानें कंठावर, “ अग्स्त्यस्य० ” ह्यानें बेंबीवर, “ यद्देवानां० ” ह्यानें उजव्या खांद्यावर, “ तन्मे० ” ह्यानें डाव्या खांद्यावर “ सर्वमस्तु० ” (२०) ह्यानें मस्तकावर भस्म धारण करावें.
पुन: परिसमूहन आणि पर्युक्षण करावें. हात जोडून उभें राहून “ ॐ चमे० ” (२१) हा मंत्र बोलून अग्नीला नमस्कार करावा. ॐ स्वस्ति. (२२) हा मंत्र बोलून अग्नीची प्रार्थना करावी *
सावित्र्युपदेश - नंतर बटूनें अग्नीच्या उत्तरेस जाऊन, पश्चिमेस तोंड करून, आचार्यांच्या समोर होऊन, उजवा गुडघा जमिनीवर ठेवून, दोन हातांनीं क्रमानें डाव्या आणि उजव्या कानाला स्पर्श करून, उलटे हात करून, आचार्याच्या उजव्या पायाला आपल्या उजव्या हातानें आणि आचार्याच्या डाव्या पायाला डाव्या हातानें गुडघ्यापर्यंत स्पर्श करून, अमुक गोत्राचा, अमुक नांवाचा मी नमस्कार करीत आहे असें म्हणू नमस्कार करावा. नंतर आचार्यानें हे देवदत्ता, तूं दीर्घायुषी हो असा आशीर्वाद द्यावा. नंतर बटूनें आपल्याला सावित्रीच्या उपदेशाची इच्छा धरून शिष्टाचारा प्रमाणें सावित्रीपूजन व गोप्रदान करून भो आचार्य महाराज, मला आपण सावित्री मंत्राचा उपदेश करावा. असें आचार्यांस सांगून आपला डावा हात उताणा करून त्यावर उजवा हात पालथा झांकण करून दोन्ही हात जोडून आणि अंगुलींना अंगुली बळकट लावावी याला ब्रह्मांजली म्हणतात. ही ब्रह्मांजली करून उजव्या मांडीवर ठेवून आचार्यांजवळ बसावे. नंतर आचार्यानें त्याचा अंजलि त्याच्या अंगावरच्या वस्त्रानें झांकून आपल्या दोन हातानें त्याचा अंजली घेऊन, “ प्रणव० ” आणि “ व्याहृति० ” (२३) पूर्वक गायत्रीचा एकैक पाद अथवा अर्धा पाद किंवा सर्व गायत्री, शक्ति नसेल तर शक्तिप्रमाणें अथवा तीन वेळां स्वत: बोलून बालकाकडून बोलवावी. नंतर “ ममव्रत० ” (२४) हा मंत्र बोलून, आपला वर अंगुलि पसरलेला हात बटूच्या हृदयावर ठेवावा.
त्याच्या रक्षणाकरितां आणि शुद्धीकरितां मेखलेचें बंधन करावें. “ इयंदुरु० ” (२५) असे हे दोन मंत्र बटूकडून बोलवून मेखलेचे तीन वेढे घेऊन नाभिप्रदेशावर तिच्या तीन गांठी द्याव्या. त्यावेळेस बटूनें रहस्यें आणि अंगें ह्यांसहित तीन वेदांनीं वेष्टित मी झालों आहे असें मानावें. नंतर आचार्यानें त्याच्या धर्माचा योगक्षेम चालावा व अधर्म होऊ नये म्हणून केशाइतका उंच असणारा दंड द्यावा “ स्वस्तिन० ” हा मंत्र बोलून बटूला दंड द्यावा. नंतर बटूकडून दंड ग्रहण करतांना “ अदांतं० ” (२६) हा मंत्र बोलवावा. त्याचा अर्थ असा कीं, ह्या माझ्या हातांतील दंडानें इंद्रिय ताब्यांत न राखणार्‍या मला ताडन करून सन्मार्गाकडे माझी योजना करावी; हा दंड माझ्या हातांत आहे म्हणून जेथें भय आहे त्यापासून माझें रक्षण कर, असें बटूकडून बोलवावें.
ब्रह्मचर्यव्रतोपदेश - नंतर आचार्यानें कुमारास आचाराचा उपदेश करावा. तो असा कीं. १. तूं ब्रह्मचारी आहेस, १. आपोशन म्हणजे मूत्र, शौच, भोजन वगैर नंतर हातपाय धूत जा ३. संध्याउपासना वगैरे कर्म करीत जा, ४. दिवसा निजूं नकोस, ५. आचार्याच्या ताब्यांत राहून वेद शिकत जा, सायंकाळीं व सकाळी भिक्षा मागत जा, संध्याकाळीं व सकाळी समिधेचा होम अग्नींत करीत जा, ६. बारा वर्षे अथवा वेद शिकेपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन कर. *
* पुढील प्रमाणें ब्रह्मचार्‍य़ास अर्थयुक्त बोध करावा. ७. आचार्याधीन रहा परंतु आचार्य अधर्मकरील किंवा सांगेल तर तो करूं किंवा ऐकूं नकोस. ८. क्रोध व मिथ्या भाषण सोडून दे. ९. मैथुन अर्थात् विषय वर्ज कर. १०. गुरूहून उंच आसन किंवा शय्या वर्ज कर ११ नृत्य, गीत, वाद्य, सुगंधिक पदार्थ हे वर्ज कर. १२ अतिस्नान, अतिभोजन, अतिनिद्रा, अति जागरण, निंदा, लोभ, मोह, भय, शोक वर्ज कर, १३ रात्रीच्या चौथ्या प्रहराच्या आरंभी उठून आवश्यक शौचादि करून दंतधावन, स्नान, संध्योपासना, गायत्रीजप व प्राणायाम ह्यांचे नित्य नियमाने आचरण कर. १४ क्षौर अर्थात् वपन करूं नको १५ मद्य मांस कधीच भक्षण करूं नको. १६ बैल, घोडा, हती व उंट वगैरे वाहनावर बसूं नको. १७ गावांत पादुका व पायपोस वापरूं नको. १८ तैलाभ्यंग मर्दन, अति आंबट, तिखट, तुरट, खारट, रेचक वगैरे द्रव्यांचे सेवन करूं नकोस. १९ नित्य युक्त आहार विहार करून विद्या ग्रहण करण्यांत यत्नशील हो. २० सुशील मितभाषी व सभ्य म्हणजे सभेंत बसण्यास योग्य असा हो. २१ मेखला, व दंडधारण, भिक्षाचरण, अग्निकार्य, करीत जा मातापिता आचार्य, अतिथी यांच्यापुढे अभिवादनशील हो. येणेप्रमाणे कार्यकर्त्याने ( पित्याने ) ब्रह्मचार्‍यास सार्थ उपदेश करावा व ब्रह्मचार्‍याने प्रत्येक बोधाच्या अंती “ ॐ बाढं ” ( होय ) असें प्रतिउत्तर द्यावे.
नंतर स्विष्टकृत् इत्यादि होमाचा शेष समाप्त करावा, म्हणजे स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ येथून पृष्ठ ५३ प्यारा ३३ पर्यंत करावा. तो अग्नि मेधाजननापर्यंत रक्षण करावा. त्याच अग्नीवर सकाळ आणि संध्याकाळचें अग्निकार्य करावें नंतर अन्य्प्रवचनीय होम आणि ब्राह्मण भोजन ह्याला पुरेल इतकी तांदुळांची भिक्षा मागावी. त्याचा क्रम असा कीं, भिक्षेचें पात्र घेऊन अगोदर आईजवळ जाऊन तूं भिक्षा दे अथवा आपण भिक्षा द्यावी अशा रीतीन भिक्षा मागावी. नंतर बापाजवळ जाऊन आपण भिक्षा द्या अथवा भिक्षा आपण द्या असें म्हणून भिक्षा मागावीं. अशा रीतीनें मावशीजवळ, आपल्या बहिणीजवळ आणि नाहीं न म्हणणार्‍या बांधवांजवळ, अथवा नाही न म्हणणार्‍या स्त्रीजवळ भिक्षा मागून ती आचार्याला द्यावी. ह्या कर्मांत शंभर ब्राह्मणां भोजन द्यावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP