ग्रहपूजेपासून लक्ष्मी प्राप्त होऊन दरिद्रादि सर्व दु:खें निवारण होतात. शेतकर्याचें शेत पिकतें, यथोक्त काळीं वेळच्या वेळीं पाऊस पडतो. याप्रमानें लक्ष्मी, धान्यवृद्धि, मेघवृष्टि, आयुष्य वाढावें, शरीर पुष्ट व्हावें, शत्रूचा परिहार व्हावा इत्यादि कामना ज्यांना असतील त्यांनीं सूर्यादि नवग्रहांची पूजा म्हणजे ग्रहयज्ञ करावा. ज्यांच्या जन्मराशीपासून किंवा जन्मलग्नापासून अष्टमादि दुष्टस्थानींच्या ग्रहाची किंवा अष्टोत्तरीय विंशोत्तरी दशाक्रमानें ज्या दुष्टग्रहाची दशा प्राप्त झाली असेल, त्या त्या ग्रहाची जपहोमादिद्वारा पूजा अवश्य करावी म्हणजे ते ग्रह पीडा करीत नाहींत. कारण ब्रह्मदेवानें पूर्वीं या नवग्रहास वर दिला आहे कीं, जे लोक तुमची जप होमादिद्वारा पूजा करतील त्या लोकांचीं तुम्ही सर्व विघ्नें विवारण करून त्यास इच्छा असेल ते मनकामना पूर्ण करावी. यावरून स्पष्ट दिसून येतें कीं. ब्राह्मणादि सर्व मनुष्यांना नवग्रह पूज्य आहेत. पट्टाधिकारी राजानें तर नवग्रहांची पूजा फ़ारच अगत्यानें पूज्य आहेत. तसेंच इतर लोकांसही पूज्य आहेत कारण सर्व प्राणिमात्रांची वृद्धि करणें आणि क्षय करणें नवग्रहांच्या स्वाधीन आहे. चराचर जगाची उत्पत्ति आणि संगार हे ग्रहांच्या स्वाधीन आहे. जर ग्रहांची पूजा केली तर उत्पत्ति आणि संहार हे ज्याकाळी व्हावेत त्याच काळीं होतात. म्हणजे अकालीं मृत्यु वगैरे होत नाहीं. अर्थात् सर्व प्रजेचें पालन करणे हें जर राजाचें कर्तव्यकर्म आहे तर राजानें आपल्या सर्व प्रजेच्या संरक्षणासाठीं ( कल्याणासाठीं ) नवग्रहांची पूजा यथोक्तकाळीं नेहमीं अवश्य केली पाहिजे आणि सर्व जनानींही केली पाहिजे. नवग्रहांचीं नांवें -- सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पति, शुक्र, शनैश्वर, राहु आणि केतु याप्रमाणें आहेत. नवग्रहांच्या प्रतिमा -- सूर्याची मूर्ति ताम्रधातूची करावी, चंद्रमूर्ति स्फ़डिकाची, मंगळाची प्रतिमा रक्तचंदनाच्या काष्ठाची, बुध आणि बृहस्पति या दोन ग्रहांच्या प्रतिमा सुवर्णाच्या कराव्या. शुक्राची प्रतिमा रुप्याची, शनीची प्रतिमा लोहाची, राहुची प्रतिमा शिशाची आणि केतूची प्रतिमा कांशाची करावी याप्रमाणे ग्रहांच्या मूर्ति करण्याचीं द्रव्यें सांगितलीं. तांबें स्फ़टिकादि ग्रहमूर्ति करण्याची जी धातू वगैरे द्रव्यें आहेत ती जर न मिळतील तर ज्या ज्या ग्रहाचा जो जो वर्ण असेल त्या त्या वर्णाच्या अक्षरांनीं एक वेळ धुतलेल्या शुभ्र वस्त्रावर अथवा रक्तचंदनादि त्या त्या ग्रहवर्णाच्या गंधानें वर्तुलादि नवग्रहांचीं जीं नऊ मंडलें आहेत ती मंडलें करून त्या मंडलावर मूर्ति काढाव्या. ताम्रसुवर्णादि धातूंच्या वगैरे अथवा गंधाक्षतांनीं लिहून ज्या ग्रहमूर्ति करावयाच्या त्यांची स्वरूपें आकार कसे करावयाचे ते मत्स्यपुराणाच्या आधारें सांगतात. सूर्याची प्रतिमा -- तांबड्या कमलाचे आसनावर बसलेला, हातांत कमलपुष्प धारण केलेला, एक वरदहस्त याप्रमाणें दोन भुजा, कमलपुष्पाच्या आंतील कोमल गाभ्याच्या वर्णाप्रमाणें अंगकांति कोमल व आरक्त आहे. सात घोडे जुंपलेल्या रथावर बसलेला अशी सूर्याची प्रतिमा करावी. चंद्राची प्रतिमा -- सर्व अंग श्वेतवर्ण, श्वेतवस्त्र धारण केलेला, दहा घोडे जुंपलेल्या रथावर बसलेला, श्वेतवर्ण रत्नांचे ( मोत्यांचे ) अलंकार धारण केलेला, एका हातात गदा ( आयुध ) आणि दुसरा वरदहस्त असे दोन हस्त आहेत याप्रमानें चंद्राची प्रतिमा करावी. मंगळाची प्रतिमा -- चार हात, मेषावर बसलेला, शक्ति, शूल, गदा, वरदहस्त, तांबड्या पुष्पांचे हार आणि तांबडें वस्त्र धारण करणारा. कमलपुष्पाच्या आंतील रक्तवर्ण कोंवळ्या गांभ्याप्रमाणें अंगाची कांती आहे अशी मंगळाची प्रतिमा करावी. बुधाची प्रतिमा -- पिंवळ्या फ़ुलांचें हार आणी पीतांबर धारण करणारा, पीतवर्ण कोमल कमलपुष्पाप्रमाणें अंगकांति पिवळी आहे. चार हातांनीं खड्ग ( तलवार ), चर्म ( ढाल ), गदा हीं तीन आयुधें धारण करून एक वरदहस्त आहे आणि सिंहावर बसलेला आहे. गुरुची आणि शुक्राची प्रतिमा --गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांच्या अंगकातींत मात्र भिन्नता आहे. म्हणजे गुरूचा वर्ण पिंवळा आणि शुक्राचा वर्ण शुभ्र आहे. बाकी दोघांची धारणा सारखीच आहे. गुरु आणि शुक्र या दोघांसही चार चार भुज आहेत, अक्षमाला, कमंडलू, दंड हातांत असून एक वरद हात आहे. याप्रमाणें गुरूची आणी शुक्राची प्रतिमा करावी. शनीची प्रतिमा -- नीलमण्याप्रमाणें अंगकांति, त्रिशूळ, बाण, धनुष्य आणि वरद असे चार हात आहेत गीधपक्षी जुंपलेल्या रथावर बसलेला असा शनि करावा. राहूची प्रतिमा -- राहूचें मुख अक्राळविक्राळ ( दांत बाहेर आलेलें भयंकर ) आहे त्यास हात चार आहेत, ढाल, तलवार, त्रिशूळ हीं आयुधें हातांत असून एक वरदहस्त आहे. सर्व अंग नीलवर्ण, सिंहासनावर बसलेला असा राहू आहे. केतूची प्रतिमा -- केतूची अंगकांति धूम्रवर्ण आहे, दोन बाहू, तोंड भयंकर; गीधपक्ष्यावर बसलेला याप्रमाणें केतूची प्रतिमा करावी. याप्रमाणें सर्व लोकांचें कल्याण करणारे सूर्यादि नवग्रह मुकुट कुंडलादि कांनीं अलंकृत करावेत. आपुले अंगुलाइतक्या उंच प्रतिमा कराव्या. नवग्रह स्थापण्याच्या दिशा -- मध्यभागीं सूर्य, आग्नेयेस चंद्र, दक्षिणेस मंगळ, ईशान्येस बुध, उत्तरेस गुरु, पूर्वेस शुक्र, प्रश्चिमेस शनि नैऋत्येस राहू आणि वायव्येस केतू याप्रमाणें नवग्रह स्थापन करण्याच्या दिशा जाणाव्यात. ग्रहाचे वर्ण -- सूर्य व मंगळ यांचा वर्ण तांबडा, चंद्र व शुक्र यांचा पांढरा, बुध व गुरु यांचा पिवळा, शनि व राहु यांचा काळा आणि केतूचा धूरकट असे वर्ण आहेत. ज्या ग्रहाचा जो वर्ण असेल त्या वर्णाचें वस्त्र, गंध आणि पुष्पें त्या त्या ग्रहास वाहावींत. सर्व नवग्रहांस धूप एक गुग्गुळाचाच दाखवावा. सर्व ग्रहांस वळि एक चरूचाच द्यावा. वर लिहिल्याप्रमाणें गंध, पुष्प बलि वगैरे नवग्रहांदि प्रत्येक देवतास वेगळे वेगळे द्यावेत.
नवग्रहांचे नैवेद्यासाठी -- सूर्यग्रहाप्रीत्यर्थ गूळ मिसळलेला भात, चंद्रग्रहाप्रीत्यर्थ दूधपाक, मंगळग्रहांप्रीत्यर्थ हविष्यान्न, बुधग्रहाप्रीत्यर्थ दूधमिश्रित आंबेमोहराच्या तांदुळांचा भात, बृहस्पतिप्रीत्यर्थ दहिभात, शुक्रग्रहाप्रीत्यर्थ तूपभात, शनिग्रहाप्रीत्यर्थ तिळांचें पीठ मिसळलेला भात, राहुग्रहाप्रीत्यर्थ देवसाळीच्या तांदुळांची खीर ( पायस ) आणि केतूप्रीत्यर्थ खिचडी. याप्रमाणें सूर्यादि नवग्रहांच्या उद्देशानें नैवेद्याचे व ब्राह्मण भोजनाचे पदार्थ सांगितले. या पदार्थाचा अभाव असता वेळेला जे भात वगैरे असतील ते पदार्थ निवेदन करावे. आतां नवग्रहांप्रीत्यर्थ अमुकच ब्राह्मणभोजन करावें अशी संख्या नसल्यामुळें यथाशक्ति ब्राह्मणभोजन करावें. मात्र जे ब्राह्मणभोजन करावयाचें ते त्या ब्राह्मणाचें पादप्रक्षालन ( पाय धुणें ) करून संन्मानानें ब्राह्मणांस जेऊं घालून भोजनदक्षिणा द्यावी. मंत्राक्षता घेऊन नंतर विडे द्यावेत.