गर्भिणी स्त्रीनें हत्ती, घोडा इत्यादिकांवर बसूं नये. पर्वत व मजल्याचें घर यांच्यावर चढूं नये. व्यायाम करणें, त्वरित चालणें, गाडींत बसणें हीं वर्ज करावी. राखाडी इत्यादिक स्थळीं मुसळ उखळ इत्यादिकांवर बसूं नये. उदकांत बुडी मारून स्नान करणें, शून्य गृह, वृक्षाच्या स्थळीं बसणें इत्यादिक वर्ज्य करावी. कलह करणें, अंग पिळणें, तिखट पदार्थ भक्षण, अति उष्ण पदार्थ ही वर्ज्य करावी. संध्याकाळीं अति थंद व अति आंबट असे पदार्थ, जडानाचा आहार करणें ही वर्ज्य करावी. मैथुन, शोक, रक्त काढणें, दिवसा निद्रा, रात्रीं जागरण ही वर्ज्य करावीं राखाडी, कोळसे, नखें यांहीं करून भूमीवर रेषा काढणें, सार्वकाल निद्रा ही वर्ज्य करावीं. अमंगळ शब्द बोलूं नये. फ़ार हसूं नये. चांगलें मंत्र लिहिणे, सुगंध पुष्पांच्या माळा, गंधाची उटी घेणें, स्वच्छ घरांत राहणें, दानें करणें, सासू सासरे यांची पूजा करणें इत्यादिकांनीं गर्भाचें संरक्षण नित्य करावें, हळद, कुंकू, शेंदूर, काजळ, न्हाणें, वेणीफ़णीं करणें, तांबूल भक्षण, सौभाग्याचें अलंकार घालणें हीं शुभकारक होत. सहाव्या मासानंतर तर विशेषेंकरून नित्य प्रयाण वर्ज्य करावें.