जन्म झाल्यापासून तिसर्या महिन्यांत जन्मदिवशीं अथवा जन्मनक्षत्रीं इष्टदेवतांचें पूजनपूर्वक अलंकार केलेल्या मुलास सूर्याचे दर्शन करवावें. चवथ्या महिन्यांत चांगल्या काळीं अग्नि, चंद्र, गाय ह्यांचें दर्शन करवावें. “ स्वास्तिनो० ” ह्या मंत्रानें पिता इत्यादिकांनीं बालकाला मांडीवर घ्यावें. “ आशु:शिशानो०” “ असौंयासेना० ” ह्या पंधरा मंत्रांचे सूक्ताचा विनियोग बालकाच्या आयुष्याच्या अभिवृद्धिकडे आहे. “ तच्चक्षुर्देव० ” हा मंत्र म्हणून बालकास सूर्याचें दर्शन करवावें. असा हा सूर्यावलोकन संस्कार संपला. ह्यापुढील निष्क्रमण म्हणजे बाहेर निघणें हा संस्कार ह्याबरोबरच तंत्रानें करितात.
निष्क्रमण संस्कार -- ( सूर्यावलोकनाबरोबरच तंत्रानें करावयाचा. ) चवथ्या महिन्यांत अथवा सहाव्या महिन्यांत शुक्लपक्षीं शुभ तिथि इत्यादिक असतां पित्यानें आपल्या पत्नीसह आणि बालकासह अभ्यंगस्नान करावें.
माझ्या बालकाचें आयुष्य आणि श्री म्हणजे लक्ष्मीची वृद्धि, बीजगर्भापासून झालेल्या दोषाचा नाश करण्याच्याद्वारानें श्री परमेश्वराच्या प्रीतिकरितां निष्क्रमण म्हणजे बाहेर निघणें हें कर्म करीन, असा संकल्प करून त्याच्या अंगत्वानें स्वस्तिवाचन, आभ्युदयिक ग्रहयज्ञ वगैरे अक्रावा, पूर्व इत्यादि दिशांमध्यें असणारे इंद्र, अग्नि, यम, निरृति, वरुण, वायु, कुबेर, ईशान आठ लोकपालांची, चंद्र, सूर्य, वासुदेव, गगन ह्या सर्वांची यथाक्रमेकरून तांदुळांचें राशीवर पूजा करावी. ब्राह्मणांना भोजन द्यावें. त्यांच्याकडून स्वस्तिअयन बोलवावें.
सायंसंध्या इत्यादिक करावें. बालकाला सोन्याच्या अथवा कृत्रिम अलंकारांनीं यथाशक्ति सुशोभित करावें. पूर्वीं केलें नसेल तर आतां बालकाकडून अग्नि, चंद्र, आणि धेनू ह्यांचें दर्शन करवावें. घोडा इत्यादि वाहनावर बसवून त्या बालकाला मामानें अथवा दाईनें फ़िरवून आणावें. त्या फ़िरण्याचें वेळेस भार्या, पुत्र, विद्वान् ब्राह्मण, ज्ञातिबांधव सुवासिनी समुदाय, आरसा, पूर्णकलश, फ़ुले, हळद, अक्षता, दीपाची माळा, ध्वज, लाह्या, ह्यांनीं युक्त कन्यागण, मंगल वाद्ये, ह्यांचा घोष करीत फ़िरवावें. “ कनिक्रद० ” “ प्रदक्षिणि० ” “ आवदं० ” इत्यादि शकुंतादि सूक्ताचा पाठ करीत करीत घराचे बाहेर जाऊन “ चंद्रार्क ” ह्या मंत्रांनीं बालकाचे रक्षणाकरितां देवांची प्रार्थना करून श्रीविष्णु किंवा श्रीशिव ह्या दोघांपैकीं एकाचे देवळांत अथवा बंधूच्या घरीं जाऊन तेथे देवाचें सुमंगल वाद्यघोषपूर्वक पूजन करावें.
शेणानें सारविलेल्या चतुष्कोणाकृति जागेवर धान्य इत्यादि ठेवून त्यावर बालकाला बसवून “ त्र्यंबक० पृ. ६५ ” ह्या मंत्राचा जप करून भस्मानें अथवा अक्षतांनीं बालकाचे मस्तकावर, कपाळावर रक्षण करून अपूप म्हणजे अनारसे इत्यादिकांनीं भूतेशान, गणेश ह्यांची पूजा करावी. बालकाला भक्ष्य इत्यादिकांनीं संतुष्ट करून बालकाला ब्राह्मणांकडून आशीर्वाद देववून देवतेला नमस्कार आणि प्रदक्षिणा बालकाकडून करवाव्यात, आणि मामा इत्यादिकांच्या अथवा जवळ असलेल्या बंधूंच्या घरीं पूर्वींप्रमाणें नेऊन तेथें दान, भेट इत्यादिकांनीं बालकाला संतुष्ट करवून आपल्या घरीं परत जाऊन ब्राह्मणांकडून आशीर्वाद बोलवून त्या ब्राह्मणांना आणि सुवासिनींना यथाशक्ति दक्षिणा देऊन बंधूसह भोजन करावें.
कुमारीचेंही सर्वं ह्याप्रमाणें समजावें. येथें होम करावा अथवा न करावा. होमपक्षी बालकाला अलंकार घातल्यानंतर लौकिक अग्नीची प्रतिष्ठा करावी. तेथें जातकर्माप्रमाणेंच सांगितलेल्या देवतांना आहुति देऊन अग्नि, चंद्र, ह्यांचे दर्शन इत्यादि आपल्या घरी येण्यापर्यंत सर्व करून स्विष्टकृत् इत्यादि होम समाप्त करून ब्राह्मणांचा आशीर्वाद इत्यादि सर्व करवावें असा क्रम आहे. असा हा निष्क्रमण संस्कार संपला.