मनुस्मृतिमध्यें सांगितले आहे कीं, पुत्राच्या नालच्छेदनापूर्वी जातकर्म नामक संस्कार करावा. जर कदाचित् कांहीं अडचनीनें कालातिक्रम होईल तर शुभतिथि व शुभवार पाहून मृग, चित्रा, रेवती, अनुराधा, श्रवण, स्वाती, शततारका, धनिष्ठा, रोहिणी, तिभी उत्तरा, अश्विनी, हस्त, पुष्य यांतील नक्षत्रीं, तसेंच चंद्रबल पाहून हा संस्कार करावा.
या संस्काराचा मुख्यत्वें उद्देश हा आहे कीं, गर्भाशयामध्यें असतांना तेथील उदकाचे वगैरे पान करावें लागल्यामुळें, जो दोष उद्भवलेला असतो त्याचें निरसन होऊन जन्मलेल्या बालकाची शारिरिक व मानसिक उन्नति होऊन आयुष्यवृद्धि व्हावी; म्हणून सोने, मध ३ रत्ती व तूप १ रत्ती या प्रमाणें ही एकत्र करून मंत्र म्हणून हे पवित्र (विषनाशक ) रासायनिक औषध रुप्याचे पात्रानें ( चमच्यानें ) प्राशन करवावें.
तसेंच बालकाचे हृदयांत आस्तिक्य बुद्धीचे बीजारोपण व्हावें म्हणून त्याचे उजवे व डावे कर्णरंघ्रांत मंत्र श्रवण करवितात. आणि आयुष्य वृद्धिकारक हवनविधिही सांगितला आहे. पुत्र जन्मतांच पित्याचें पुत्राचें मुख पाहिले असतां ऋणत्रयापासून पिता मुक्त होतो. पुत्र उत्पन्न होतांच पित्यानें पुत्राचें मुख पाहून नदी इत्यादिक ठिकाणें उत्तरेस मुख करून स्नान करावें. नदी इत्यादिक नसेल तर घरीं आणलेलें जें शीतोदक त्यांत सुवर्ण घालून त्या उदकानें स्नान करावें. हें स्नान रात्रीचे ठिकाणीही नदी इत्यादिक स्थलीं करावें. अशक्त असेल तर रात्रीं अग्नीच्याजवळ सुवर्णयुक्त शीतोदकानें स्नान करावें. संबंधीं पंचम, षष्ठ, आणि दशम या दिवशीं पुत्रजन्माचेठायीं दानप्रतिग्रहादि कृत्यास जननाशीच मानूं नये, जन्मकाळीं कुयोग असेल तर जातकर्म नामकरणाचे वेळीं करावें.