जन्मकाळीं भद्रा, वैधृति, व्यतिपात, चंद्रसूर्यग्रहण, संक्रांति, आमावास्येचा पहिला प्रहर व शेवटचे दोन प्रहर दर्श, श्राद्धदिवस, वृद्धिदिवस, दिनक्षय, यमघंटयोग, दग्धयोग, मृत्युयोग, विष्कंभ व वज्र यांच्या पहिल्या ३।३ घटिका, गंड व अतिगंड यांच्या ६।६ घटिका, परिघाचे अर्ध, शूलाच्या ५ घटिका, व्याघाताच्या ९ घटिका, चतुर्थीच्या ८, पष्ठीच्या ९, अष्टमीच्या १४, द्वादशीच्या १० चरुर्दशीच्या ५ घटिका, पिता व भ्राता यांचा जन्ममास नक्षत्र व तिथि यांवर जम झाला असतां, अश्विनी मघा ह्यांच्या पहिल्या २।२ घटिका, रेवतीच्या शेवटच्या २ घटिका, चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध, पुष्य नक्षत्राचे मधले दोन पाद, पूर्वाषाढा नक्षत्राचा तिसरा पाद, उत्तराचा पहिला पाद, विशाखाचा चवथा चरण, ज्येष्ठा, आश्लेषा, मूळ, कृष्णचतुर्दशी, तिथि गंडांत ( पंचमी, षष्ठी, दशमी, एकादशी, पौर्णिमा किंवा आमावस्या, प्रतिपदा ह्या तिथींचें संधीच्या २ घटिका ) लग्न गंडात ( कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन, मेष ह्या लग्नांच्या संधीच्या २ घटिका ), विशघटि, यमल ( जुळें ) जनन, तीन पुत्र होऊन चवथी कन्या, तीन कन्या होऊन चवथा पुत्र, दंतासहित जन्म, विपरीत उत्पत्ति; याप्रमाणे जन्म झाला असतां त्या त्या दिवशीं शांति करून पुत्राचें अथवा कन्येचे मुख पहावें. शांति केल्याखेरीज मुख पाहूं नये. सर्व जननशांतिची माहिती धर्मसिंधूत मराठी भाषांतरासहित दिली आहे.