मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
चौलकर्म संस्कार प्रयोग

चौलकर्म संस्कार प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


यजमानानें मंगलस्नान केलेल्या बालकाल अलंकृत करून त्याला आपल्या उजवीकडेस बसलेल्या मातेच्या मांडीवर बसवून देश आणि काल ह्यांचें स्मरण करून ह्या बालकाचे बीज आणि गर्भ ह्यांपासून उत्पन्न झालेल्या पातकांचा नाश होऊन बल, आयुष्य आणि ओज ह्यांची वृद्धि व्हावी म्हणून श्रीपरमेश्वराच्या प्रीतीकरितां चौल नांवाचा संस्कार करीन; त्याचे अंगभूत श्रीगणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करीन असा संकल्प करून त्या प्रमाणें ती सर्व करावीत.
नंतर चौलहोम करण्याकरितां स्थंडिल इत्यादि करीन असा संकल्प करून, स्थालीपाक पृष्ठ ३३ प्यारा २ पृष्ठ ३६ प्यारा ५ पर्यंत करून, सभ्य नांवाच्या अग्नीची स्थापना करून, अन्वाधान करीन असा संकल्प करून, दोन समिधा घेऊन “ अस्मि न्नन्वा० ” येथून “ आज्येन ” येथपर्यंत म्हटल्यावर स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेण० ” येथून पृष्ठ ४१ प्यारा १२ “ आच्छादयेत् ” येथपर्यंत, पुढें पृष्ठ ४३ प्यारा १६ “ ततस्तेपवित्रे० ” येथून प्यारा १७ “ केचित् ” येथपर्यंत स्थालीपाक करावा.
नंतर अग्नीचे उत्तरेस पसरलेल्या दर्भांवर व्रीहि, यव, माप ( उडीद ) आणि तीळ ह्यांनीं निरनिराळे भरलेले असें नवीन मातीचे परळ चार क्रमानें एकेक पूर्वेस तोंड करून स्थापन करावेत. अग्नीच्या जवळ असलेल्या भर्त्याच्या दक्षिणेस मातेनें आपल्या मांडीवर बालकाला बसवून असावें. नंतर कर्त्यानें मातेच्या पुढें अग्नीचे पश्चिमेस क्रमानें बैलाच्या गोमयानें युक्त एक शराव ( परळ ) आणि शमीच्या पानांनीं युक्त एक शराव अशीं ठेवावींत. नंतर ब्रह्मानें एकवीस दर्भांचा एक पुंजका घेऊन मातेच्या दक्षिणेस उभे रहावें, अथवा पित्यानें त्सें उभे रहावे. ह्या वेळेस चौलकर्ता दुसराच असला पाहिजे.
नंतर कुमाराचा हस्तस्पर्श करून कर्त्यानें आघारापर्यंतचें कर्म करावें; म्हणजे स्थालीपाक पृष्ठ ४४ प्यारा १८ येथून पृष्ठ ४६ प्यारा २२ “ हुत्वात्यक्त्वाच ” येथपर्यंत करावा. नंतर “ अग्नआयूंषि:० ” (१) “ अग्निरृषि० ” (२) “ अग्नेपयस्व० ” (३) या ३ मंत्रानीं तुपाच्या ३ आहुति द्याव्यात. अग्नि व पवमान ह्यांचे हे हवि आहेत माझें नाहींत असें बोलावें. असेंच पुढेंही समजावें. अशा रीतीनें तीन ऋचांनीं होम केल्यावर मग “ प्रजापते० ” ह्या मंत्रानें अग्नींत तूप घालून हें हवि प्रजापतीचें आहे माझें नाहीं असें बोलावें.
नंतर थंड आणि ऊन असें दोन प्रकारचें पाणी क्रमानें उजव्या आणि डाव्या हातांनीं निरनिराळें घेऊन बालकाच्या पश्चिमदिशेस उभे राहून तें दोन्हीं प्रकारचें पाणी एका पात्रांत दोन हातांनीं “ उष्णेनवा० ” (४) ह्या मंत्रानें एकदम ओतून त्यांतील थोडेसें पाणी घेऊन लोण्याशी अथवा दह्याच्या साईशीं तें पाणी मिसळून बालकाच्या डाव्या कानापासून तों उजव्या कानापर्यंत “ अदिति:० ” (५) ह्या पैकीं तीन दर्भ घेऊन “ ॐ ओषधेत्रायस्वै ” (६) या मंत्रानें कुमाराचें समोर पश्चिमेस अग्र केलेले तीन दर्भ त्याच्या दक्षिण बाजूच्या केशांवर ठेवावेत. “ स्वधिते० ”  (७) ह्या मंत्रानें त्या दर्भावर तांब्याचा वस्तारा ठेवावा; आणि “ येनावपत्० ” (८) ह्या मंत्रान केशांसहित तो दर्भांचा पुंजका कापावा. ते दर्भ पूर्वें अग्र असें करून मातीच्या पात्रांत असलेल्या शमीच्या पानांबरोबर मिसळून तें सर्व मातेच्या हातांत द्यावें. त्या मातेनें केशांसह तें सर्व दर्भ पाने इत्यादिक घेऊन बैलाच्या गोमयामध्ये पूर्वेस अग्रें करून टाकावें. अशाच रीतीनें दुसर्‍या वेळच्या छेदनाचेंवेळीं दर्भांचा पुंजका ठेवणें इत्यादिक सर्व मंत्र बोलून करावें. छेदन करण्याच्या मंत्रामध्यें विशेष असा कीं, “ येनधाता० ” हा मंत्र बोलून दुसर्‍या वेळीं छेदन करावें. तिसर्‍या वेळीं “ येनभूयश्चरात्र्यां ” हा मंत्र बोलून छेदन करावें. चवथ्या वेळी “ येनावपत्० ” “ येनधाता० ” “ येनद्भूयश्च० ” हे तिन्ही मंत्र बोलून छेदन करावें. अशाच रीतीनें उत्तर भागाकडेही तीन वेळां छेदन करावें; परंतु सर्व मंत्रांनीं मिळून चवथ्या वेळेस छेदन करूं नये.
नंतर “ यत्क्षुरेण० ” (९) ह्या मंत्रानें अग्र भागापासून तो मूलपर्यंत वस्तार्‍याची धारा धुवून मग नापिकास बोलवावें आणि उष्ण व थंड अशा मिश्र पाण्यानें बालकाचें मस्तक चांगल्या रीतीनें चोळून त्याला कांहीं इजा न होईल अशा रीतीनें मुंडन अर्थात् वपन कर, असें त्याला समजून सांगावें. मग त्या नापितानें पूर्वीं उरलेल्या थंड आणि ऊन अशा पाण्यानें बालकाचें मस्तक भिजवावें आणि जसा कुलाचार असेल तशी शिखा ठेवून बाकीचे सर्व केश कापून टाकावेंत. मग कुमाराला स्नान घालावें. नंतर त्याला अलंकार इत्यादिकांनीं सुशोभित करून पहिल्या प्रमाणच आईच्या मांडीवर बसवावें.
आणि स्विष्टकृत् इत्यादि होम पुरा करावा; म्हणजे स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ येथून पृष्ठ ५३ प्यारा ३२ पर्यंत करावा. व्रीहि इत्यादिकांनीं भरलेली मातीचीं पात्रें नापिताला द्यावींत. भूयसी दक्षिणा देऊन दहा ब्राह्मणांना भोजन देईन असा संकल्प करावा. कर्म संपूर्ण असो असें ब्राह्मणांकडून बोलवून “ यस्यस्मृया० ” ह्या मंत्रानें श्रीविष्णुला नमस्कार करावा. ब्राह्मणांनीं दिलेले आशीर्वाद आपण आणि बालक ह्या उभयतांनीं घ्यावेंत. हा सर्वं प्रकार कन्येसही आहे, मात्र त्यामध्यें मंत्राचें उच्चारण न करितां नुस्ती क्रिया मात्र करावयाची; परंतु होम करतांना मात्र मंत्राचा उच्चार करावा. अशा रीतीनें चूडाकर्म संस्कार प्रयोग समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP