यजमानानें आचमन करून प्राणायाम करून देशकालाचें संकीर्तन करावें. ह्या माझ्या बालकाच्या बीज आणि गर्भ ह्यापासून झालेल्या पापाचा नाश, आयुष्याची वृद्धि आणि सर्व व्यवहार सिद्ध होण्याच्या द्वारानें श्रीपरमेश्वराची प्रीति करण्याकरितां नामकरण करीन; त्याचे अंगभूत असें गणपति पूजनपूर्वक स्वस्तिपुण्याहवाचन, मातृकापूजन, आणि नांदीश्राद्ध करीन, असा संकल्प करून स्वस्तिवाचनामध्यें पुण्याह असें तीन वेळां म्हणून पुढें ठेवावयाच्या नामाची चतुर्थी ( नाम्ने ) करून त्या नामाकरितां तीन वेळां तुम्ही स्वस्ति बोला असें यजमानानें सांगितल्यावर ब्राह्मणांनीं ह्या नामाला स्वस्ति असें तीन वेळां प्रत्युत्तर केल्यावर बाकीचें स्वस्तिवाचन समाप्त करावें.
हे ब्राह्मणहो, बालकाचें हें नाम मी करतों असें तीन वेळां ब्राह्मणांची अनुज्ञा घेऊन त्यांनीं नाम ठेवा असें अनुमोदन दिल्यावर कांस्यपात्रांत तांदूळ पसरून त्यांवर सोन्याच्या सळईनें अमुक कुलदेवता भक्त असें लिहावें. नंतर जन्मकालाच्या महिन्याचे नाम म्हणजे बारा महिन्यांची बारा नावें आहेत. तीं अशीं कीं - १ कृष्ण, २ अनंत, ३ अच्युत, ४ चक्री, ५ वैकुंठ, ६ जनार्दन, ७ उपेंद्र, ८ यज्ञपुरुष, ८ वासुदेव, १० हरि, ११ योगीश, १२ पुंडरींकाक्ष हीं नामें चैत्रापासून क्रमानें समजावीत. त्याप्रमाणें जो महिना असेल तें नाम लिहावें. येथें चैत्रापासून क्रम अथवा मार्गशीर्षापासून क्रम घ्यावा. नंतर ज्या नांवाने नमस्कार करावयाचा तें नाम हळूंच मुकाट्यानें करावें तें नाम उपनयन होईपर्यंत आईबापांनींच जाणावें. उपनयनाचे वेळी मुलाला सांगावें कीं, ह्या नांवानें तूं नमस्कार कर. नंतर तीन पुरुषांचे वाचक अथवा एखाद्या देवाचें वाचक किंवा आपल्या मर्जीस वाटेल तें नाम, प्रतिष्ठेची इच्छा असल्यास दोन अक्षराचें नांव ठेवावें; ब्राह्मणादि क्रमानें म्हणजे ब्राह्मणांस शर्म, क्षत्रियांस वर्म, वैश्यांस गुप्त आणि शूद्रांस दास हें पद नांवाचे शेवटीं लावावें. नंतर ज्योति:शास्त्रातेल - अवकहडाचक्रानुसार जन्मनक्षत्राचें पादावरून नाम ठेवावें. नंतर व्यवहार करण्याकरितां आपल्या मनाप्रमाणे, अशा रीतीनें चार नामें लिहावींत.
नामदेवताभ्योनम: ॥ या मंत्रानें पूजा करून अमुक नांवाचा तूं अमुक आहेस असें आपल्या उजवीकडे बसलेल्या मातेच्या मांडीवर असलेल्या बालकाच्या उजव्या कानांत सांगून “ तदस्तुमित्रा० ” हा मंत्र आणि “ गृगावैप्रतिष्ठा० ” इत्यादि मंत्र बोलल्यावर ब्राह्मणांनी नाम सुप्रतिष्ठित असो असें बोलावें, तसें बोलल्यावर अमुक नांवानें अमुक नांवांचा हा तुम्हाला नमस्कार करीत आहे, असें बोलून ब्राह्मणांना नमस्कार करवावा. त्या ब्राह्मणांनी अमुक शर्मा तूं आयुष्यमान् हो असें बोलावें. नंतर कर्त्या यजमानानें ब्राह्मणांदिकांना, पिता इत्यादिकांना नमस्कार करून आपल्या सामर्थ्यानुरूप ब्राह्मणांना भोजन द्यावें आणि दक्षिणा द्यावी.
कुमारीचे नामकरण वैदिक मंत्राशिवाय करावें. तें नाम विषमाक्षराचे म्हणजे ३ - ५ - ७ इतक्या अक्षरांचें असावे.
होम करावा ह्यापक्षईं जातकर्माप्रमाणेच प्रधान आहुतीचे हवन करून सांगितल्याप्रमाणे नाम करून स्विष्टकृत् इत्यादि बाकीच्या होमाचे तंत्र करावे. अशा रीतीने नामकरणाचा संस्कार संपला.