चार व्रतांच्या संस्काराचा निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
ती व्रतें महानाम्नीव्रत, महाव्रत, उपनिषदूव्रत आणि गोदानव्रत अशा नांवांची चार प्रकारची आहेत. ती चार व्रतें क्रमें करून जन्मापासून तेराव्या इत्यादिक वर्षांचें ठिकाणीं उत्तरायणांत चौलसंस्काराला उक्त जी तिथि, नक्षत्रें, वार यांचें ठायीं करावीं. उपनयन झाल्यानंतर ब्रह्मचर्यांत बरेच नियम पाळून विद्या संपादन करावयाची असतें. सांग वेदाध्ययन केलें पाहिजे. निदान शाखाध्ययन तरी केले पाहिजे. संहिता, ब्राह्मण व आरण्यके मिळून ग्रंथास शाखा असें म्हणतात. शाखेचे तरी अध्ययन करावयास पाहिजे. त्यांत आरण्यके म्हणतेवेळीं चवथ्या आरण्यकाचा आरंभ ‘ विदामघवन्विदा ’ येथपासून आहे. तेवढ्या एका खंडास महानाम्नी अशी संज्ञा आहे. तसेंच प्रथमारण्यकाच्या आरंभीं ‘ अथात:संहिताया उपनिषत् ’ अशी प्रतीकें ( मूळ ग्रंथांतील शब्द ) आहेत. म्हणून तीं तीं आरण्यके म्हणण्याचा अधिकार उत्पन्न होण्यासाठीं अगोदर जो विधि केला जातो त्या विधीस ‘ महानाम्नीव्रत, महाव्रत, उपनिषदूव्रत. ’ असे म्हणतात याप्रमाणें तीन वर्षांत अध्ययन संपलें म्हणजे गुरूला त्या आरण्यकाच्या अध्ययनाबद्दल एक गाय व एक बैल दक्षिणा द्यावयाची असते. गाय देण्याच्या या विधीला ‘ गोदानव्रत ’ असे म्हणतात. अध्ययनाचे टप्पे म्हणून असलेले हे संस्कार प्रयश्चित्तावर येऊन बसल्यामुळे प्रत्येक व्रताबद्दल (१) एक एक कृच्छ्र अथवा गायत्रीच्या शंभर आहुति द्याव्यांत किंवा (२) तीन पासून बाराकृच्छ्रे इच्छेनुसार प्रायश्चित्त करावें. त्यांपैकीं दुसर्या प्रकारचे प्रायश्चित्त समावर्तनापूर्वी करतात. ह्या व्रतांचें विस्तृत प्रयोग संस्कारकौस्तुभ इत्यादि ग्रंथांमध्यें व आपआपल्या गृह्यसूत्रांत पहावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP