जन्मलेल्या बालकाला व्यक्तिदर्शक सुंदर, गंभीर व सोपें नांव देणें; आणि त्या नांवाप्रमाणें बालकाच्या अंगी बुद्धि व शरीरबल यांची वृद्धि होऊन त्यला विद्यादि सद्गुण प्राप्त व्हावेंत, एतदर्थ परमात्म्याची उपासना करून यथाविधी योजना करणें याचें नांव नामकरण.
बालकास नांव द्यावयाचें तें खालील नियमांस अनुसरून असावें -- नामाचें आद्य अक्षर - घोष ( मृदुवर्ण ) अर्थात् ककागदि पंच वर्गांचे पहिले दोन वर्णखेरीज. करून बाकी - ग घ ङ, ज झ ञ, ड ढ ण; द ध न, ब भ म आणि य र ल व ह या वीस वर्णापैकीं असावें. नामाचें मध्य अक्षर - य र ल व या वर्णांपैकीं असावें व अंत्य अक्षर दीर्घ किंवा विसर्गयुक्त असावें; अशा प्रकारचे पुरुषाचे नांव दोन किंवा चार अक्षरांचे असावें स्त्रियांच्या नामास हेच नियम असून भेद इतकाच कीं, अयुग्म अक्षराचे ( तीन किंवा पांच अक्षरीचे ) पण आद्य अक्षर द्वित्व असूं नये, व अंत्य अक्षर दीर्घ असावे, जड पदार्थवाचक किंवा पशुपक्षीवाचक स्त्रियांचे नांव ठेवूं नये. याकरितांच विवाहाचे वेळीं पुरोहित स्त्रियांचे नांव बदलतात. पुरुषांच्या नांवास प्रारंभी किंवा अन्यत्र कोठेंतरी द्वित्व अक्षर असल्यास चालेल.
नाम = नांवासंबंधीं, करण = क्रिया अर्थात् विधि. जन्मापासून ११ व्या, १२ व्या दिवशीं जर कांहीं अडचण आली तर १०१ व्या दिवशीं किंवा २ र्या वर्षाच्या आरंभी जन्म तिथीस, नेमलेल्या दिवशीं नामकरण करावें. त्या दिवशीं जर भद्रा, वैघृति, व्यतीपात, ग्रहण, संक्रांति, आमावास्या, श्राद्धदिवस असेल तर नामकरण करूं नये; परंतु मलमास, गुरु शुक्राचे अस्त इत्यादिकांचा दोष नाहीं. मुख्य काल टळून गेला असतां ज्योतिषशास्त्रां सांगितल्याप्रमाणें शुभ, तिथि, शुभ नक्षत्र इत्यादिक अवश्य पहावें. नामकरण संस्कार प्रात:काली करावा पुष्य, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मृग, ज्येष्ठा, तिन्ही उत्तरा हीं नक्षत्रे तसेंच वृषभ, सिंह, कुंभ, वृश्चिक ही लग्नें आणि रवि, बुध, गुरु, शुक्र, हें वार नांव ठेवण्यास उक्त आहेत. रिक्ता तिथ्यादि व दुष्टयोगादि वर्ज करावे.