षष्ठीदेवीची पूजा
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
बाळंत झाल्यापासून पांचव्या अथव्या सहाव्या दिवशीं किंवा सहाव्याच दिवशीं रात्रीच्या प्रहरी पिता इत्यादिकांनीं आचमन करून देश आणि काल ह्यांचें स्मरण करून ह्या मातेसह बालकाचें आयुष्य आणि आरोग्य ह्यांच्या प्राप्तिद्वारा सकल अरिष्टांचा नाश होण्याकरितां श्रीपरमेश्वर प्रीतीसाठीं विघ्नेश गणपतीचें, जन्म देणार्या षष्ठीदेवीचें, जीवंतिकेचें आणि शस्त्रगर्भाचें पूजन यथा शक्ति मिळविलेल्या उपचारांनीं मी करीन. असा संकल्प करावा. तसेंच शांतिसूक्ताचा जप करण्याचें कामी आचार्यांचे वरण, निर्विघ्नतेसाठीं गणपति पूजन करीन. असा संकल्प केल्यावर तशीं तीं सर्व करावी.
अक्षतांचे ढीगांवर विघ्नेश, जन्म देणारी षष्ठीदेवी आणि जीवंतिका हयांचें आवाहन करून विघ्नेशायनम: जन्मदाभ्योनम: षष्ठीदेव्यौनम: जीवंतिकायै नम: हया नाम मंत्रांनी षोडश उपचारांनीं पृथक् अथवा तंत्रानें पूजन करावें.
“ आयाहि० ” हें म्हणून षष्ठीदेवीचें आवाहन करावें. “ शक्तिस्त्वं० ” हें म्हणून उपचार अर्पण करावें. कित्येक हया ठिकाणी शिवा, संभूति, प्रीति, संतति अनुसूया आणि क्षमा हयांचें पूजन करितात. आचार्यानें आणि दुसर्यांनी शांतिसूक्तचा पाठ करावा. “ लंबोदर० नम: ” म्हणून प्रार्थना करावी. नंतर ब्राह्मणांना तांबूल, खाद्यपदार्थ पेढे वगैरे आणि दक्षिणा इत्यादि द्यावें.
जननशौचामध्यें म्हणजे सोयरामध्यें पहिला, पांचवा, सहावा आणी दहावा इतक्या दिवसांमध्यें दान आणि प्रतिग्रह करण्यास म्हणजे देणें व घेणें करण्यास दोष नाहीं; परंतु अन्न खाण्याचा मात्र निषेध आहे. हया रात्रीस सर्वांनी जागरण करावे. अशा रीतीनें षष्ठीपूजा समाप्त झाली.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP