मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
स्थालीपाक तंत्र

स्थालीपाक तंत्र

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


१ यजमानानें आचमन प्राणायाम केल्यावर " ममोतात्त० " म्हणून " ( ज्या कर्माकरितां होम करणे असेल त्या कर्माचा उच्चार करून ) स्थंडिलादि करितो, असा संकल्प करावा.
२ नंतर गाईचें शेण इत्यादिकांनीं सारवलेल्या शुद्ध स्थानीं शुद्ध मातीचें ईशानदिशेस आरंभून उत्तरदिशेकडून प्रदक्षिण असें चार अंगुळें उंच अथवा एक अंगुळ उंच आणि चारही दिशेस मिळून बहात्तर अंगुळें क्षेत्रफ़ळाचें, अर्थात् अठरा अंगुळें औरस चौरस असें, किंवा होमाच्या मानानें त्यापेक्षां अधिक परंतु न्यून नसावें. असें मध्यभागीं उंचवट स्थंडिल करावें. तें स्थंडिल गाईच्या शेणानें उजवीकडून सारवावें.
३ दक्षिणेस आठ, उत्तरेस दोन, पश्चिमेस चार. पूर्वेस अर्धे इतकी अंगुळें सोडून, दक्षिणेस आरंभ करून, उत्तरेकडे जाणारी अशी एक आपल्या टीचेएवढी लांब रेखा काढावी. आणि त्या रेखेच्या दक्षिणोत्तर बाजूस पूर्वेकडे जाणार्‍या लांबट अशा दोन रेखा काढाव्या. मात्र त्या दोन रेखा पहिल्या रेखेला लागलेल्या नसाव्यात. आणि त्या रेखा टीचभरच काढाव्यात. त्या दोन रेखांमध्यें एकमेकांना न लागलेल्या, उत्तरेस तोंड असलेल्या, पूर्वेकडेस लांबट टीचभर तीन रेखा काढाव्यात. अशा रीतीने सहा रेखा यज्ञाकरितां असलेल्या समिधेच्या मूलभागानें उजव्या हातानें काढाव्यात. त्या सहा रेखांवर ती समिधा उत्तरेस अग्र करून ठेवावी. स्थंडिलावर मुठीनें पाणी शिंपडावें आणि ती समिधा मोडून आग्नेयीदिशेस टाकावी. हात धुवावा. मौन धरावे.
४ मग तैजस पात्रानें म्हणजे सोन्याच्या, रुप्याच्या, तांब्यांच्या किंवा तें न मिळाल्यास मातीच्या दोन पात्रांनीं संपुट करून म्हणजे एकावरएक पात्र झांकून सुवासिनीकडून श्रोत्रियाचे ( वेदवेत्त्याचे ) घरांतून अथवा आपल्या घरातून प्रज्वलित आणि धूर नसलेला अग्नि आणवावा व तो अग्नि स्थंडिलाचे आग्नेयदिशेस ठेवावा. नंतर " जुष्टोदम्ना) पासून तों " सौमनसायदेवान् " येथपर्यंत मंत्र म्हणून अक्षतांनीं अग्नीचें आवाहन करावें आणी त्यावरचें झांकण काढावें. " समस्त० " येथून ॐ भूर्भव:स्व: येथपर्यंत म्हणून आपल्या समोर आपल्या हातांनीं त्यापूर्वी काढलेल्या सहा रेखांवर अमुक नांवाच्या अग्नीचें स्थापन करितों असें म्हणून कुंडाच्या अथवा स्थंडिलाच्या मध्यभागीं अग्नि स्थापन करावा. व अग्नि आणलेल्या पात्रांत अक्षतोदक टाकून दोन्ही पात्रे एक करावीत. प्रोक्षण काष्ठें त्या अग्नीवर ठेवावीत व कळकाच्या फ़ुंकणीनें फ़ुंकून अग्नि प्रज्वलित करावा.
५ " चत्वारिशृंगा० " ह्या मंत्रानें व " अथार्ग्निमूर्ति " इत्यादि श्लोकांनीं अग्नीच्या मूर्तीचें ध्यान करावें.
६ नंतर उजवे पायाचे गुडघ्यावर डावा हात उताणा करून त्यावर उजव्या हातानें दोन समिधा उभ्या धरून " तत्रदेवता० येथपासून चक्षुषी आज्येन " येथपर्यंत म्हणून नंतर त्या त्या कर्मांगभूत होमाच्या प्रधान देवतेचा व त्याच्या हवनद्रव्याचा व आहुतिसंख्येचा उच्चार करावा.
७ नंतर " शेषेण० " येथून " ॐ भूर्भव:स्व:स्वाहा प्रजापतयइदंनमम " येथपर्यंत म्हणून त्या समिधा अग्नींत टाकाव्यात.  इध्मा व बर्हि बांधण्याची दर्भाची दोरी तयार करून त्यानी इध्मा व बर्हि बांधून ठेवावी.
८ स्थंडिलापासून आठ आंगुळां इतक्या लांबीवर ईशान्यदिशेस आरंभून उजवीकडून चोहोंकडे हातांत पाणी घेऊन उताण्या हातानें तीन वेळां फ़िरवावें. दहा अंगुळ लांबीवर पूर्व इत्यादि दिशेकडे पूर्वी ठेवलेल्या दर्भांनीं वेष्ठन करावें. त्यामध्यें पूर्वेस आणि पश्चिमेस जे दर्भ ठेवावयाचे त्यांचीं अग्रे ( शेंडे ) उत्तरे कडे असावींत. दक्षिणेस आणि उत्तरेस जे दर्भ ठेवावयाचे त्यांचीं अग्रे पूर्वेस असावीं. पूर्व आणि पश्चिम ह्यां परिस्तरणांचे मूळांवर ( दर्भांचे बुडक्यावर ) दक्षिण परिस्तरण असावें आणि उत्तरे परिस्तरण त्या अग्रांच्या खालीं असावें ते दर्भ अमुकच अशीं संख्या नाहीं, तथापि एकेक दिशेस चार चार अशा रीतीनें सोळा दर्भ असावेत. त्यानंतर अग्नीचे दक्षिण दिशेस ब्रह्माचे आसनाकरितां आणि उत्तरेस पात्रांना ठेवण्याकरितां पूर्वेस अग्र केलेले कांहीं दर्भ पसरावेत म्हणजे अंथरावेत. अग्नीचे ईशान्यदिशपासून तीन वेळां पालथ्या हातानें पाणी फ़िरवावें.
९ उत्तरेकडे पसरलेल्या दर्भांवर उजव्या आणि डाव्या हातांनीं अनुक्रमानेच चरुस्थाली आणि प्रोक्षणी, दर्वी आणि स्रुवा, प्रणीता आणि आज्यपात्र, इध्म आणि बर्हिष्, शूर्प आणि कृष्णाजिन, उलोखल आणि मुसळ हे दोन दोन पदार्थ उदकसंस्थ असून पूर्वेकडे अशा क्रमानें पालथे ठेवावेत.
१० ज्या वेळेस नुसत्या तुपाचाच होम असेल त्या वेळेस प्रोक्षणी आणि स्रुवा प्रणीता आणि आज्यपात्र, इध्म आणि बर्हिष् इतकेंच ठेवावेत.
११ नंतर प्रोक्षणीपात्र उताणें करावें. त्यामध्यें गर्भ नसलेले अग्रासह सारखे व जाड असे टीचभर लांब दोन दर्भरूपी पवित्रे ठेवावींत आणि शुद्ध पाण्यानें पात्र भरावें. त्यांत गंध, फ़ूल इत्यादि टाकावें. दोन हातांच्या उताण्या अशा अंगुष्ठ आणी उपकनिष्ठिका ह्यांनी आपल्या दोन हातांनीं उत्तरेस अग्र असलेली दोन पवित्रें निरनिराळीं धारण करून त्या पाण्याला तीन वेळां हलवून सर्व पात्रें उताणीं करावींत, इध्मा सोडावी, आणि त्या सर्व पात्रांवर तीन वेळां पाणी प्रोक्षण करावें. तें पाणी कमंडलूमध्यें ( तांब्यांत ) टाकावें असें कित्येकांचें मत आहे.
१२ नंतर ब्रह्म्यानें अग्नीस प्रदक्षीणा करून दक्षिण दिशेच्या आसनावर उत्तरमुख बसून आसनाच्या दर्भातील दक्षिण बाजूचा एक दर्भ अंगुष्ठ अनामिकेनें घेऊन " निरस्त:परावसु: " असें म्हणून नैऋत्येस टाकून हात धुवावा. " इदमह० " म्हणून उत्तरमुख असता डाव्यामांडीवर उजवा पाय ठेवून बसावें. यजमानाने गंधाक्षतादिकांनीं पूजा केल्यावर ब्रह्मांजलि करून " ॐ बृहस्पति० " हा मंत्र जपावा. नंतर यजमानानें प्रणीतापात्र अग्नीचे पश्चिमेस ठेवून त्यामध्यें पूर्वेस अग्र असलेली दोन पवित्रें ठेवावींत आणी पूर्वीं हालविलेल्या पाण्यानें तें पणीतापात्र भरावें. त्यांत गंध, पुष्प, अक्षता घालाव्या आणी हे ब्रह्मन् हें पाणी मी घेऊं कां असें विचारावें. त्यावर ब्रह्म्याने हलके स्वरांत " भूर्भव:० " हा मंत्र म्हणून मोठ्यांदा पाणी घे अशी ब्रह्माने आज्ञा द्यावी. त्यानंतर यजमानानें तें पूर्णपात्र आपल्या तोंडाइतकें उंच करावें आणी अग्नीच्या उत्तरेस दर्भांवर तें पात्र ठेवावें व त्या पात्रावर तीं पवित्रें ठेवून त्या पवित्रांना दुसर्‍या दर्भानीं झांकावें.
१३ नंतर अग्नीचे पश्चिमेस दर्भांवर शूर्प ठेवावें. त्यामध्यें पूर्वेस अग्र केलेले दोन दर्भ ठेवावेत. " [ अग्नये ] त्वाजुष्टंनिर्वपामि " ह्या मंत्राने त्या सुपांत तांदुळाच्या चार मुठी चार वेळां मंत्र म्हणून टाकाव्यात. " [ अग्नीशोमाभ्यां ] त्वाजुष्टंनिर्वपामि " हा मंत्र म्हणून त्याप्रमाणेच तांदुळाच्या मुठी घालाव्यात व ती पवित्रें तांदुळांवर ठेवून त्या पूर्वी हालविलेल्या पाण्यानें " [ आग्नये ] त्वाजुष्टंप्रोक्षामि " ह्या मंत्रानें जेवढे निर्वाप ( तांदुळाच्या मुठी घातल्या ) असतील तितके वेळां प्रोक्षण करावें अशाच रीतीनें  " [ अग्नीषोमाभ्यां ] त्वाजुष्टंप्रोक्षामि " असें म्हणून तसेंच प्रोक्षण करावें ( दर्शाचा गोम असेल म्हणजे आमावास्येचा होम असेल तर अग्नीषोमाचेबद्दल [ इंद्राग्निभ्यांत्वा असा निर्वाप आणि प्रोक्षण ह्यांमध्यें विशेष करावा. )
१४ अशा रीतीनें वरच्या (  ) अशा कंसांत लिहिलेल्या देवतेच्या ठिकाणीं नामात्मक मंत्राच्या होमामध्यें निर्वाप आणि प्रोक्षणहीं ज्या ज्या कर्माची जी प्रधान ( मुख्य ) देवता असेल त्या त्या प्रधान देवतेचे नाम घेऊन करावींत. समंत्रक होम असेल तर श्रवणाकर्मादिकांमध्यें मुकाट्यानें चार चार मुठींचा निर्वाप करावा व प्रोक्षण करावें.
१५ नंतर पात्रांच्या उत्तरेस पूर्वेस ग्रीवा ( कंठ ) करून आंथरलेल्या वर केंस असलेल्या कृष्णाजिनावर ठेवलेल्या उखळांमध्यें मुसळानें पत्नीकडून तांदूळ कांडून शूर्पानें ( सुपानें ) कोंडा इत्यादिकांचे शोधन करून ( पांखडून ) तीन वेळां स्वच्छ धुवावेत. त्यांचा निरनिराळ्या पात्रांत अथवा एका पात्रांत चांगल्या रीतीनें न करपेल असा फ़ार पातळ नाहीं आणी मोकळा मऊ असा भात तयार करावा.
१६ नंतर तीं पूर्वीचीं पवित्रें तुपाच्या पात्रांत ठेवून तें पात्र पुढें ठेवावें व त्यांत तूप घालावें. अग्नीचे उत्तरेस असलेल्या निखार्‍यांवर तुपाचें पात्र ठेऊन परिस्तरणाचे बाहेर काढून त्या काढलेल्या निखार्‍यांवर तुपाचें पात्र ठेऊन पेटलेल्या दर्भाने त्या तुपाला पोळवून अंगुष्ठाच्या पेर्‍या येवढे दर्भाचें दोन शेंडें धुऊन तुपांत टाकावेत. पुन: पेटलेल्या त्याच दर्भाच्या कोलीतानें चरु म्हणजे भातास तुपासह सभोंवतीं तीन वेळां फ़िरवून तें कोलीत टाकून द्यावें. पाण्याला स्पर्श करावा. तुपाचें पात्र निखार्‍यावरून जमिनीवर उत्तरेस उतरून घ्यावें. ते निखारे दूर करावें. पाण्याला स्पर्श करावा.
१७ तुपाचे पात्र तेथेंच असतां " सवितुष्ट्वा " हा मंत्र एक वेळ उच्चारून दोन वेळां मुकाट्यानें उताण्या दोन्हीं हातांच्या अंगुष्ट आणि उपकनिष्ठिका ह्या दोहोंनीं एकमेकांस स्पर्श केल्याशिवाय घेतलेल्या उत्तरेस अग्र असलेल्या दोन पवित्रांनीं पूर्वी हालवून तीं पवित्रें पाण्यानें शिंपडून अग्नींत टाकावीत, अथवा मुकाट्यानें " स्कंदायस्वाहा " असें म्हणून अग्नींत टाकावीत असें कित्येकांचे मत आहे.
१८ नंतर अग्नीचे पश्चिमदिशेस परिस्तरणाचे बाहेर आपल्या पुढील भूमीवर प्रोक्षण करून तेथें बर्ही बांधलेली दर्भाची दोरी उत्तरेस अग्र केलेली अशी पसरावी. त्या दोरीवर बर्हि ( दर्भमुष्टि ) पूर्वेस अग्र केलेली उत्तरेस मूळ केलेली दाट पसरावी. त्यावर तुपाचें पात्र ठेवावें.
१९ स्रुवादिकांवर मार्जन करावें तें असें कीं, उजव्या हातानें स्रुक् आणि स्रुवा घ्याव्यात. डाव्या हातानें कांहीं दर्भ घ्यावेत आणि ते सर्व बरोबरच अग्निवर तापवावे. स्रुच ठेवून डाव्या हातानें घेऊन उजव्या हातानें स्रुवाचें तोंड दर्भांचे अग्रांनीं उजव्या बाजूनें पूर्वेपासून पूर्वेपर्यंत तीन वेळां संमार्जन करावे. खालच्या बाजूस दर्भाच्या अग्रांनींच आंतल्या बाजूस आणि तोंडाचा वरचा भागही तीनवेळां संमार्जन करावा. नंतर दर्भांच्या मुळांनीं स्रुवाचे दंडाच्या खालच्या बाजूस बिलाचे पृष्ठभागापासून तों जेथपर्यंत वर बिल आहे तेथपर्यत तीनवेळा संमार्जन करावी. पाणी शिंपडावें स्रुवेला तापवावी तुपाचे स्थालीचे उत्तरेस स्रुचेला न लागती अशी ती स्रुवा ठेवावी. पाण्याला स्पर्श करावा. त्याच दर्भांनीं जुहूचेंही (स्रुचेचें ) अशाच रीतीनें संमार्जन करावे. ती जुहू स्रुवाचे उत्तरेस ठेवावी. आणि दर्भ पाण्यानें धुवून नंतर अग्नींत टाकावेत.
२० नंतर शिजलेल्या चरुवर स्रुवानें घेतलेल्या तुपाचा अभिघार करावा. तो अग्नींच्या उत्तरेस उतरून तो चरु, अग्नि आणि तूप ह्यांच्या मधून न्यावा. तुपाच्या दक्षिणेस बर्हीवर किंचित् अंतरावर ठेवावा व त्यावर पुन: तुपाचा अभिधार करावा अथवा करूं नये. हविला निराळे करण्याकरितां ( चरु घेण्याकरितां ) दुसरें एक पात्र चरु आणि अग्नि ह्या दोहोंमध्यें ठेवावें.
२१ स्थंडिलापासून अकरा अंगुळांच्या लांबीवर गंध, अक्षत आणि पुष्प ह्यांनीं अग्नीचें " विश्वानिनो " इत्यादि पुढील आठ मंत्रांनीं स्थंडिलासभोंवती पूर्वदिशेपासून आठ दिशेस पूजन करावें. " यस्मैत्वं० " या मंत्रानें उपस्थान करावे.
२२ आपल्या कपाळी गंधाक्षत लावावी. हात धुवावा. इध्मेची बांधलेली दोरी त्याच स्थानीं ठेवावी. हातानें इध्मा घेऊन त्या इध्मेच्या  मूळ, मध्य, आणि अग्र ह्या तीन ठिकाणीं स्रुवानें तुपाचा अभिधार करावा. मूळ आणि मध्य ह्यांच्या मध्यभागीं धरून " ॐ अयंते " येथपासून " अग्नयइदंनमम " येथपर्यंत बोलून इध्मा टाकावी. नंतर स्रुवानें तूप घेऊन स्थंडिलांत अग्नीचे स्थानाच्या वायव्यकोणापासून तों अग्नेयकोणापर्यंत " प्रजापतये " असें मनानें स्मरून स्वाहा असें बोलून सतत एकसारखी तुपाची धार अग्नीमध्यें इध्मेच्या काष्ठावर टाकावी. पुन: तूप घेऊन अग्नीचे स्थानाच्या नैरृतकोणापासून तों ईशान्यकोणापर्यंत तसेंच " प्रजापतये "  म्हणून हवन करून टाकावें.
२३ स्रुवेनें तूप घेऊन " अग्नयेस्वाहा " असें बोलून अग्नीचे उत्तर बाजूस पूर्वभागीं हवन करून पुन: तूप घेऊन " सोमायस्वाहा " असें बोलून अग्नीचे दक्षिणबाजूस तेवढ्याच सारख्या प्रदेशीं हवन करावें.
२४ पूर्वी ठेवलेल्या पात्रांतील चरु बाहेर काढावा. तो निराळा करावा. हा ( अग्नीकरितां ) व हा ( अग्नीषोमाकरिता ) अशा रीतीचे दोन भाग दक्षिणोत्तर संस्थ असें करून त्याला स्पर्श करून अवदानधर्माच्या रीतीनें हवन करावें. अशा रीतीनें नामात्मक मंत्रानें होम करावयाचा असेल तेथें जितक्या देवता असतील तितके चरुचे विभाग करून त्यांना स्पर्श करावा. मंत्रांनीं होम असेल तर चरुचा xx     नाहीं व स्पर्शही नाहीं.
२५ अवदान धर्म असा कीं, स्रुवानें स्रुचीमधें तूप चोपडावें. अगोदर प्रधानदेवतेचा जो चरुभाग असेल त्याच्या मध्यांतून अंगुष्ठाचे कांडापर्यंत वांकड्या केलेल्या, उत्तरेकडे अग्र असलेल्या अंगुष्ठ, मध्यमा, अनामिकांनीं ( मृगीमुद्रेनें ) नखांचा स्पर्श न करतां चरु घेऊन तो पळींत ओतावा. नंतर चरुच्या भागांतून पूर्व भाग पूर्वेस अग्र असलेल्या त्या अंगुष्ठ, मध्यमा, अनामिकांनीं तसाच घ्यावा आणि दर्वीमध्यें घालावा. त्यावर पात्रांतील हवीवर ( चरुवर ) तुपाचा अभिघार करावा. तसाच दर्वीतल्या चरुवरही अभिधार करावा आणि मग तो चरु धूर नसलेल्या प्रज्वलित अग्नीमध्यें.
२६ [ ॐ अग्नयेस्वाहा ] असें बोलून अग्नीच्या मध्यभागीं अथवा त्याच्या पश्चिमभागीं झांकल्याप्रमाणेंच कीं काय असें करून दर्वीच्या पार्श्वभागेने हवन करून हे दिलेले हवि अग्नीचे आहे माझे नाहीं असें बोलून टाकावें. पुन: पूर्वीप्रमाणें पुढच्या हविच्या ( चरुच्या ) भागांतून कांहीं भाग घेऊन [ " ॐ अग्नीषोमाभ्यांस्वाहा " ] असें बोलून पूर्वीं घातलेल्या आहुतीच्या पूर्वभागेस हवन करून हे हवि अग्नीषोमांना दिलेले आहे. हे माझे नाहीं असें बोलून टाकावे. [ दर्शाचे दिवसाचा होम असेल तर अग्नीषोमाचेबद्दल " इंद्राग्निभ्यांस्वाहा " असें बोलून हे इंद्राग्नीचे आहेत. माझे नाहींत. असा विशेष आहे. ]
२७ पुन: दर्वीला रूप लावून तीमध्यें प्रथम हविभागाच्या उत्तरभागांतून पूर्वी घेतलेल्या अवदानापेक्षां अधिक वाकविलेल्याच अंगुलींनीं चरु घेऊन दर्वीत घालावा. दुसर्‍या हविभागाचेंही तसेंच अवदान घेऊन पात्रांतील चरुवर अभिधार न करतां काढून घेतलेल्यावर दोन वेळां करावा.
२८ " यदस्य " येथपासून " स्वाहा " येथपर्यंत म्हणून अग्नीच्या ईशान्यकोणामध्यें हवन करावें. आणि हे हवि स्विष्टकृत् अग्नीचे आहेत माझे नाहींत असें बोलावें. पाण्याला स्पर्श करावा. अग्नीच्या उत्तरेस असलेली इध्मा बांधलेली रज्जु ( दर्भाची दोरी ) सोडून तिची " रूद्राय० " या मंत्रानें आहुति द्यावी.
२९ नंतर पुढें सांगितलेल्या " अयाश्चाग्ने १, अतो देवा० २, इदंविष्णु०३ आणि व्याहृतींच्या ४ " मिळून ७ तुपाच्या प्रयश्चित्ताहुति स्रुवानें अग्नींत द्याव्यात. ब्रह्मानें कर्त्याला प्रदक्षिणा करून त्याच्या जवळच अग्नीचें वायव्यदिशेस उभे राहून ह्याच सात आहुति अग्नीमध्यें टाकाव्यात. त्याग यजमानानें म्हणावा. नंतर तेथें असलेल्या ब्रह्मानेंच मंत्रामध्यें विपर्यास वगैरे दोष झालें असतील त्याबद्दल पुढें सांगितलेले " अनाज्ञातं०, पुरुषसंमि०, यत्पाकत्रा०, यद्वोदेवा०, " ह्या चार मंत्रांनीं चार तुपाच्या आहुति टाकाव्यात आणि " विश्वेभ्यो० " म्हणून एक आहुति द्यावी.
३० नंतर तांदुळाचे कण, समिधा आणि दर्भाचें तुकडे हें सर्व पाण्यानें प्रोक्षण करून अग्नींत टाकावें. नंतर अवभृथ स्ननाचेबद्दल पूर्णपात्रांतील जलानें मार्जन करावें. तें असें कीं, पूर्वी संपाद्सन केलेलें पूर्णपात्र पसरलेल्या बर्हीवर उजव्या हातानें ठेवून त्यामध्यें गंगा इत्यादि पुण्यकारक नद्या आहेत असें स्मरण करून उजव्या हातानें स्पर्श करून " पूर्णमसि० " ह्या मंत्राचा जप करित दर्भांच्या अग्रांनीं पूर्व इत्यादि पांच दिशेमध्यें जलाचें सिंचन मंत्रांनीं यथालिंगांनीं म्हणजे चिन्हांनीं करावें. " प्राच्यां० " म्हणून पूर्वेस, " दक्षिणस्यां० " म्हणून दक्षिणेस प्रोक्षण करावें. नंतर पाण्यास स्पर्श करून " प्रतींच्यां० " म्हणून पश्चिमेकडे " उदीच्यां० " म्हणून उत्तरेकडे आणि " ऊर्ध्वायां० " म्हणून ऊर्ध्वा दिशेस प्रोक्षण करावें. " आपोअस्मा० " येथपासून " संतु " येथपर्यंत मंत्र म्हणून दर्भाग्रानीं मार्जन करून " दुर्मित्र्या० " हें म्हणून नैऋतदिशेस दर्भांग्रांनीं पाणी सिंचन करावें.
३१ ब्रह्मानें यजमानाच्या डाव्या बाजूस बसलेल्या त्याच्या पत्नीच्या ओंजळींत पूर्णपात्रांतील जल देऊन " माहं०" हा मंत्र पत्नीकडून अथवा आपण स्वत:च म्हणून पश्चिममुख होऊन तें पूर्णपात्रांतलें जल शिंपडावें व ओंजळींतील जलानें पापाचा नाश करण्याकरितां आपल्यावर, यजमानावर आणि पत्नीवर प्रोक्षण करावें. पत्नीनें ते जल बर्हीवर शिंपडावें. अथवा यजमानानेंच आपल्या उताण्या डाव्या हातावर बर्ही ठेवून तेथें उजव्या हातानें पूर्णपात्र घेऊन " माहंप्रजा० " ह्यानें तें जल पश्चिमेस तोंड करून शिंपडून ते जल समुद्रामध्यें जावों असें ध्यान करावें. हातांतील जलांनीं आपल्यावर व पत्नीवर प्रोक्षण करावें.
३२ नंतर कर्त्यानें अग्नीचे वायव्य दिशेस उभे राहून संस्थाजपाने स्तुति करावी, ती अशी कीं, " अग्नेत्वंनो० " इत्यादि चार मंत्र म्हणून उपस्थान करावें आणि " चमेस्वर० " येथून " हव्यवाहन० " येथपर्यंत म्हणून स्तुति करावी. " मानस्तोके० " हा मंत्र म्हणून स्रुवेच्या तोंडाच्या पाठीकडून ईशान्यदिशेकडची विभूति घ्यावी. " ॐ त्र्यायुष " ह्यानें कपाळावर. " कश्यपस्य " ह्यानें कंठावर, " अगस्त्यस्य " ह्यानें नाभीवर, " यद्देवानां " ह्यानें उजव्या खांद्यावर, " तन्मेअस्तु " ह्यानें डाव्या खांद्यावर, " सर्वमस्तु " ह्यानें मस्तकावर विभूति धारण करावी. कित्येक उपस्थान करण्याचे पूर्वी विभूति ग्रहण करावी असें म्हणतात.
३३ त्यानंतर उत्तरदिशेस परिस्तरणाचें विसर्जन करावें. अग्नीला परिसमूहन करून सिंचन करावें. " विश्वानिन० " ह्या मंत्रानें अष्टदिशास गंधाक्षत इत्यादिकांनीं अग्नीस अलंकृत करावें " अग्नयेनम: " या मंत्रानें अग्नीचें पूजन करावें व नैवेद्य आणि तांबूल निवेदन करावा. नमस्कार करावा.
३४ ब्रह्माला सांगितल्याप्रमाणें दक्षिणा द्यावी. दक्षिणा नसेल तर होम करून राहिलेलें घृत इत्यादि हिरण्यासह सर्व द्यावें. ब्रह्मा नसेल तर दुसर्‍या कोणा ब्राह्माणाला देऊन पात्रें धुवून पूर्वीच्या क्रमानें दोन दोन पात्रें टाकून " यस्यस्मृत्या० " ह्या मंत्रानें श्रीविष्णुला नमस्कार करून केलेलें सर्व कर्म ईश्वरास अर्पण करून आचमन करावें. धारण केलेल्या पवित्राची गांठ सोडून शुद्ध जाग्यावर टाकावे हे स्थालीपाकाचे तंत्र संपले.   

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP