आचमन करून पवित्र धारण करून प्राणायाम करावा. “ ममास्य० ” हा संकल्प करून गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, ग्रहयज्ञ करावा.
नंतर संस्कारांची याज्ञिक सामग्री उदगपवर्ग ( दक्षिणेकडून उत्तरेकडे मांडीत जावी ) ती अशी - पुंसवनाकरितां दर्भ, गोमय, गाईचें दही, सातूचा दाणा १, उडीद २, दूर्वांचा कल्क करून त्याची शुभ्र वस्त्रानें पोतांडी, तूप, चरु ( भात ), हिरव्या उंबराच्या दोन दोड्याचें घड २, तांबडे बनातीचें आसन, तीन ठिकाणीं पांढरा असलेला साळईचा कांटा. उंबराच्या फ़ळांची माळ, ( इध्मा, बर्हिषी, शूर्प, कृष्णाजिनें, उलूखल मुसलें वगैरे स्थालीपाकाची पात्रें ) याप्रमाणें पुंसवन, अनवलोभन, सीमांतोन्नयन या तीन संस्कारांचें साहित्य स्थंडिलाचे पूर्वेकडे दक्षिणबाजूस ठेवावें त्याच्या उत्तरेस म्हणजे अग्नीच्या दक्षिणेसच विष्णुबलीसाठीं वेदीवर किंवा पाटावर गंधानें अष्टदलपद्म किंवा स्वस्तिक काढून त्यावर विष्णुची सुवर्णप्रतिमा अग्न्युत्तारणपूर्वक ठेवावी. त्या प्रतिमेच्या उत्तरेस बत्तीस अंगुलें हमचौरस वेदी ( स्थंडिल ) म्हणजे ओटा करून गोमयानें सारवून साफ़ करून त्यावर पांढर्या रांगोळीनें चार चार अंगुलें एक एक चौकोनी घर पडेल अशीं चतुष्कोण पदें ६४ काढावींत. त्याचे उत्तरेस जातकर्मासाठी मध कमी आणि तूप जास्ती विषममानानें मिसळून स्वच्छ शिळेवर ठेवून त्यांत एक सोन्याचा रज घालून सोन्याच्या अगर रुप्याच्या वांटींत किंवा गोकर्णांत ठेवणें. त्याचे उत्तरेस नामकरण संस्कारार्थ कांस्यपात्र तंदुल पूर्ण करून त्यावर सुवर्ण शलाकेनें बालकाची चार नामें ( कुलदेवताभक्त, मासनाम, नाक्षत्रनाम आणि ब्यावहारिकनाम ) लिहून ठेवावींत. त्याच्या उत्तरेस निष्क्रमण संस्कारार्थ वस्त्राच्छादित एका पाटावर इंद्रादि अष्ट दिक्पाळ, चंद्र, सूर्य, वासुदेव आणि गगन या देवता उदक्संस्थ क्रमानें मांडाव्या. ( बालकास दाखविण्यासाठीं अग्निमूर्ति, चंद्रमूर्ति, व धेनुदर्शन आणि बसण्यासाठीं घोडा बाहेर आणून ठेवणें. ) मुलाचे रक्षणार्थ विभूति आणि मंत्राक्षता, त्याचें उत्तरेस सप्तधान्य राशीवर कलश दोन स्थापून त्यावर भूतेश ( शंकराची प्रतिमा ) आणि गणेश प्रतिमा अग्न्युत्तारणपूर्वक ठेवून त्याच्यापुढें आनारशांची बलिपात्रें दोन व पूजासामग्री गंध पुष्पादि ठेवावी. त्याचे उत्तरेस अन्नप्राशन संस्कारासाठीं दहि, मध, तूप आणि भात जेव्हांचे तेव्हां एका वाटींत आणावा. पुस्तक, शस्त्र, वस्त्र इत्यादि तेथें ठेवावें. याप्रमाणें पुंसवनापासून अन्नप्राशनापर्यंतच्या संस्कारांची याज्ञिकसामग्री मांडल्यावर होमास आरंभ करावा.
नंतर “ अद्ये० ” नंतर “ अद्येत्यादि० ” येथून आज्येन ” येथपर्यंत स्थालीपाक तंत्र करून “ शेषेणस्विष्ट० ” स्थालीपाक तंत्र करून पृष्ठ ३७ प्यारा ७ येथून पृष्ठ ४७ प्यारा २५ पर्यंत करावा. पुढें गर्भाधान, पुंसव, अनवलोभन, सीमंतोन्नयन, विष्णुबलि, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण; उपवेशन, सूर्यावलोकन, अन्नप्राशन या संस्कारांच्या प्रयोगांतील क्रमानेंच त्या त्या प्रयोगांतील प्रधान देवतेच्या आहुति व त्या त्या प्रयोगांत सांगितलेलीं त्यांची अंगभूत कर्मे करावींत. नंतर स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ पासून पृष्ठ ५३ पर्यंतचें सर्व कर्म संपवावें. असा नवसंस्कार सहतंत्र प्रयोग संपला.