उपनयन करणारानें पत्नीसहित मंगलस्नान करून कुंकुमतिलक लावून नित्यकर्म आटोपल्यावर दोन वेळां आचमन करावें, नंतर प्राणायाम करावा आणि आपल्या इष्टदेवतेला व गुरु इत्यादि वडील मंडळींना नमस्कार करून, देश आणि काल ह्यांचें संकीर्तन केल्यावर मला उपनयन देण्याचा अधिकार येण्यासाठीं तीन कृच्छ्र प्रायश्चित अथवा बारा हजार गायत्रीजप करीन. बालकानेही माझ्या हातून मर्जीप्रमाणें वागणें, मर्जीप्रमाणें बोलणें, मर्जींप्रमानें खाणें, पिणें इत्यादि दोष झाले आहेत त्यांचा नाश करण्याकरितां तीन कृच्छ्र प्रायश्चित अथवा प्रत्येक कृच्छ्राबद्दल गाईचे निष्क्रयभूत निष्काच्या पादाचा अर्धभाग म्हणजे रजत द्रव्याचा अर्थात् रुपयाच्या अर्ध भागानें किंवा प्रत्येक कृच्छ्राचेबद्दल गाईचे निष्क्रयभूत कार्षांपणा इतके तांब्याचे मूल्य द्रव्य म्हणजे व्यवहारांत चालणार्या पैशाच्या दानानें मी करीन, उपनयन संस्काराचे पूर्वीचे संस्कार झालें नसतील तर ह्या कुमाराचें गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, विष्णुबलि, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चौलकर्म ह्या नऊ संस्कारांचे कालाचें अतिक्रमण झाल्याबद्दल झालेल्या पापाचें परिहाराच्या द्वारानें श्रीपरमेश्वराची प्रीति होण्याकरितां प्रत्येक संस्काराला “ ॐ भूर्भुव:स्वाहा ” असे म्हणून एक एक तुपाची आहुति आणि प्रत्येक संस्काराबद्दल पादकृच्छ्र आणि चौलाबद्दल अर्ध कृच्छ्र अथवा प्रतिपादकृच्छ्र आणि अर्ध कृच्छ्र ह्यांचे प्रत्याम्नायरूपीं द्रव्य देईन असा संकल्प करून त्याप्रमानें ती सर्व करावींत.
ह्या कुमारास द्विजत्व नसते तें द्विजत्व उपनयन संस्कारानें येतें यास्तव आणि ह्या कुमाराला वेदाचा अधिकार म्हणजे वेद शिकण्याचा अधिकार यावा ह्या करितां उद्यां किंवा आतां उपनयन करीन; त्याचे अंगभूत श्रीगणपति पूजन पूर्वक स्वस्तिवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, मंडपप्रतिष्ठा, आणि कुलदेवता स्थापन त्यांचें पूजन करीन; उपनयनाबरोवरच चौल करणें असेल तर त्याचाही संकल्पांत उच्चार करून चौलसंस्काराचा विधि करावा. ह्या ठिकाणीं जर कुलाचार *असेल तर तैल आणि हळद ह्यांवर अधिष्ठान करणार्या महालक्ष्मीचें पूजन “ सक्तुमिव० ” ह्या मंत्रानें करावें आणि तंत्रानें श्रीगणपतीचें पूजन, स्वस्तिवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, मंडपदेवतेची प्रतिष्ठा आणि ग्रहयज्ञ इत्यादिकरावे. अथवा ग्रहयज्ञ नंतर करावा.