मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
विवाहसंस्कार निर्णय

विवाहसंस्कार निर्णय

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


विवाहाचा उद्देश :- ऋग्वेदांत सांगितले आहे - हे वधू तूं वीर पुत्रांना प्रसवणारी हो. हे इंद्रा तूं या वधूला सुपुत्रवती व सुभाग्यवती कर ॥ हे अग्ने मी तूं दिलेल्या प्रजांनी अविच्छिन्न संततीरूप अविनाशित्वाला भोगीन. यावरून उत्तम प्रजा निर्माण करणेम हाच विवाहसंस्काराचा मुख्य उद्देश आहे. कारण वेदाने अगोदर व्यवाय ( संभोग ) याचा निषेधच दर्शविला आहे. परंतु प्राणिमात्रांची त्याकडे सहज प्रवृत्ती असल्यामुळे जर ब्यवाय करण्याची इच्छा होईल तर विवाह करून तो करावा. म्हणून श्रुतिप्रामाण्यावरून विवाहाने भार्या होते. विवाह म्हणजे दारकर्म म्हणजे पाणिग्रहण. ‘ वह् प्रापणे ’ या धातूपासून विवाह शद्ब झाला आहे.
विवाहाचे भेद :- ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व राक्षस, आणि पैशाच असे विआहाचे आठ भेद आहेत. यांत पहिल्या चारांमध्ये चार तीन, दोन व एक हे एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत व पुढील चारांमध्ये पांच, सहा, सात, व आठ हे उत्तरोत्तर एकापेक्षा एक कनिष्ठ आहेत.
विवाहाची फ़लें :- ब्राह्मादि पहिलें चार विवाह यथाविधी केले असतां तेजस्वी व शिष्टमान्य असे पुत्र होतात. पुढील चार विवाहापासून घातकी, खोटे बोलणारे, धर्माचा द्वेष करणारे असे पुत्र होतात.
वधूची लक्षणें :- ज्याचे ब्रह्मचर्य अस्खलित आहे अशा पुरुषानें समावर्तन केल्यावर चांगल्या लक्षणांनी युक्त असपिंडा ( आपल्या सपिंडातील नसलेली ) पतीच्या प्रवर व गोत्राची नसलेली, अशी स्त्री वरावी. पिवळ्या रंगाची, अधिकांगी ( जसें सहा अंगुले वगैरे ) रोगिष्ठ फ़ार केस असणारी किंवा मुळीच केस नसणारी, अत्यंत वाचाळ, पिवळे डोळे असणारी अशी स्त्री वरू नये; सुंदर अंगाची, सौम्य ( चांगल्या ) नांवाची, हंस किंवा हत्तिणी प्रमाणे चालणारी, सूक्ष्म लोम, केश, दांत व कोमल अंगाची अशी स्त्री असावी.
वराची लक्षणें :- कुल, शील, शरीर, वय, विद्या, द्रव्य, आणि सामर्थ्य हे सात गुण यथायोग्य ( वधूच्या कुलशीलादि गुणानुरूप ) पहावें. तसेच दहा दोष पाहावें. ते असे - जातिभ्रष्ट, पाखंडी, सज्जनाशी विरोध करणारा, कपटी, रोगिष्ठ, सदा दुष्ट, कठोर भाषण करणारा, कोड भरलेला महाकुष्ठरोगी, ज्यास बांधव नाही, ज्याचे बापाचे नांव माहीत नाहीं. अशा दहा प्रकारच्या पुरुषांची घरें धनधान्यादि द्रव्यसंपत्तीनें मोठी समृद्ध असली तरी त्याचे घरी कन्या देऊं नये कारण अशा दोषयुक्त पुरुषाचे घरी दिलेल्या कन्या अधर्माने लवकरच नाश पावण्याचा प्राय: संभव असतो.
ज्योति:शास्त्रोक्त विचार :- उत्तम विद्वान् ज्योति:शास्त्रज्ञाकडून वधूच्या जन्मपत्रिकेवरून मंगळ वगैरे कांहीं दोष असेल तर पाहावा व तो दोष निवारणार्थ शास्त्रोक्त उपाय करावा, तसेच वराचे जन्मपत्रिकेवरून कांही दोष असल्यास शास्त्रोक्त उपाय करून विवाह करावा.
वधूवरांची विवाहयोग्यता ठरविणे, हा फ़ार बिकट व शास्त्रीय प्रश्न आहे. कारण वधूवरांनी सुखासमाधानानें आयुष्य घालवून त्यांची संततिही त्यांच्यापेक्षां सर्वदृष्ट्या सरस झाली पाहिजे. म्हणून राशिकूटादि घटित पहावे. निदान २० हून अधिक गुण उतरलेच पाहिजेत. राशिकूट, ग्रहमैत्री, गणशुद्धि आणि नाडीभेद ही अवश्य पहावी.
सूत्रोक्त वधूलक्षण परीक्षा :- वधूवरांच्या उत्तम जन्मपत्रिका नसतील तर सांगितलेल्या रीतीने वधूची परीक्षा करावी. १. दोन पिके निघणारी जमीन, २. गोठा ३. अवशिष्ट दर्भ समिधा टाकण्याची जागा, ४. आटणारा पाण्याचा डोह अथवा तलाव, ५. जुगार खेळण्याची जागा, ६. चव्हाटा, ७. अपीक खारी जमीन, ८. स्मशान ह्या आठ ठिकाणची माती आणून तिचे निरनिराळे आंब्याएवढे गोळे करून ते एका पाटावर खुणेनें मांडावे आणि “ ऋतमग्रे प्रथमं जज्ञ सत्यं प्रतिष्ठितम् ॥ यदियं कुमार्यभिजाता तदियमिह प्रतिपद्यतां यत्त्सत्यं तदूदृश्यताम् ॥ ” ह्या मंत्रानें त्यांचे अभिमंत्रण करावें. आणि वधूला सांगावे कीं, ह्या गोळ्यातून तुला वाटेल तो एक गोळा उचलून घे. जो उचलील त्याचे फ़ळ पुढील अनुक्रमाने समजावे. १. धनधान्य संपन्न. २. गाई बैल म्हशी वगैरे पशुसंपत्तीने युक्त. ३. वेदशास्त्र पारंगत, ४. सर्व प्रकारची संपत्ति, ५. जुगार. ६. व्यभिचारिणी, ७. दरिद्री, ८. पतिघ्नी, अशाप्रकारे वधूपरीक्षा करून ती शुभलक्षणी ठरेल तर तिला वरावी. ही जुनी वधूपरिक्षेची पद्धति आहे.
विरुद्ध संबंध - म्हणजे मुलीला वराच्या मातेचे साम्य किंवा वराला मुलीच्या पित्याचे साम्य असे येणें, उदाहरण - आपल्या स्त्रीच्या बहिणीची मुलगी तिला आपण पित्यासमान आहोत, तसेंच आपल्या चुलतीची बहीणही आपल्यास मातेसमान आहे. सापत्नमातुश्रीची बहीण व तिची मुलगी, चुलतीची बहीण तिची मुलगी, तसेंच वडील बंधु पित्यासमान आहे, म्हणून त्याच्या बायकोच्या बहिणीशी. आईच्या बहिणीशी नाते लागते करिता असे विरुद्ध संबंध करूं नये.
विवाहवयोमर्यादा :- वैद्यशास्त्रदृष्ट्या पुरूषाचे वय पंचविशीच्या सुमारास व स्त्रीचे वय सोळा वर्षाच्या सुमारास असावे असे आहे. सूत्रग्रंथावरून वधू तरुण झाल्यावर विवाह करावा असे दिसून येते. गोभिलगृह्यसूत्रात चतुर्थीकर्माचा उल्लेख केला आहे. स्मृतिग्रंथात कन्येच्या विवाहाची मर्यादा रजोदर्शनापूर्वी सांगितली आहे. तात्पर्य विवाहाचे वेळीं उभय वधूवर सज्ञान असली पाहिजेत. अर्थात् -समान गुण, समानशील ( स्वभाव ) समान बुद्धि, समान आचार, अशा समान लक्षणाची वधूवरे असावी.
भिन्नशाखीय विवाह :- वरील वचनांत ‘ सवर्णा ’ असे म्हटले आहे त्याचा अर्थ समान वर्णाची असावी, वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असेच आहेत. ब्राह्मणांत महाराष्ट्र, आंध्र ( तैलंग ), कर्नाटक, द्रविड, आश्वलायन, हिरण्यकेशी, कण्व इत्यादि शाखाभेद आहेत म्हणून ब्राह्मणांनी कोणत्याहि शाखेंतील कन्या करण्यास हरकत नाही.
विवाह मुहूर्त :- उत्तरायण, शुक्लपक्ष, आणि कल्याणकारक नक्षत्र, तिथी, योग, करण अशा शुभसमयी चौल, उपनयन, गोदान आणि विवाह हे संस्कार करावे. आपल्याला विवाहित स्त्रीपासून धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त व्हावे म्हणून विवाहास ज्योति:शास्त्रोक्त सुमुहूर्त वेळ अवश्य पाहावी. चांगल्या मुहूर्ताचे चांगले फ़ल प्राप्त होते.
गुरु व रवि यांचे बल :- ज्योतिर्निबंधांत गर्गाचे वचन असें आहे कीं, स्त्रियांना गुरुबळ श्रेष्ठ आणि पुरुषांना रविबळ श्रेष्ठ. स्त्रिया व पुरुष या दोघांना चंद्रबळ श्रेष्ठ आहे. विवाहकालीं गोचरीचा जन्मस्थ, तिसरा, दहावा आणि सहावा गुरु असतां पूजेनें ( बृहपतिशांति केल्याने ) शुभकारक होतो आणि चवथा, आठवा व बारावा असला म्हणजे तो मृत्युदायक आहे याखेरीज इतरस्थानीं असेल तर शुभ जाणावा.
कन्यादानाधिकारी :- पिता, आजा, बंधु, चुलता, स्वगोत्रांतील चुलतबंधु वगैरे,गुरु, मातोश्रीचा पिता, मामा, मातोश्रीचे इतर आप्त असें क्रमानें एकाचे अभावी एक अधिकारी आहेत.
ज्येष्ठविषयी विचार :- रक्तकोशाचे वचन - जन्म नक्षत्रावर, जन्मदिवशी व जन्म मासांत शुभकार्य करूं नये. ज्येष्ठ मासांत ज्येष्ठ पुत्राचे व ज्येष्ठ कन्येचे मंगल वर्ज्य करावें. ज्या विवाहांत वधू ज्येष्ठ नाही आणि वर ज्येष्ठ आहे किंवा वर ज्येष्ठ नाही आणि वधू ज्येष्ठ आहे अशा विवाहांत ज्येष्ठमास शुभदायक आहे.
प्रतिकूलाचा विचार :- वधूवरांचा पिता, पितामह, माता, पितामही, पितृव्य, वराची पूर्वपत्नी व पूर्वपुत्र, भ्राता, अविवाहित भगिनी यांपैकी कोणा एकास मरण आले असतां ते विवाहाला प्रतिकूल असें विद्वानांनीं सांगितलें आहे. संकट ( दुसरा योग्य वर न मिळणे वगैरे ) प्राप्त असेल तर सांगतों. मेधातिथि - संकटसमय प्राप्त असतां योगी याज्ञवल्क्यानें विनायकशांति सांगितली आहे ती करून नंतर मंगलकार्य करावें. मेधातिथि सांगतों - आपल्या गोत्रांत तीन पुरुषांचे आंत कोणी मरेल तर प्रतिकूल होतें तसेंच प्रवेश ( पुत्रविवाह ) झाल्यावर निगम ( कन्याविवाह ) करू नये, हा निषेध आणि मंडन ( विवाह ) केल्यावर मुंडन ( चौलादि ) करूं नये हा निषेध तीन पुरुषांपर्यंत समजावा.
एकोदराचा विचार :- ज्योतिर्निबंधांत वृद्धमनूचे वचन एका मातेपासून जन्मलेल्या अशा पुत्र व कन्या यांचे समान संस्कार एका संवत्सरात करूं नयेत. त्या दोघांच्या माता भिन्न असतील तर करावें. यावरून एका पुरुषाचे दोन विवाह एका दिवशीं निषिद्ध आहेत. कारण भिन्न माता नाहींत. नारदाचे वचन - पुत्राच्या विवाहानंतर सहा महिन्यांच्या आतं कन्येचा विवाह करूं नये. पुत्राच्या किंवा कन्येच्या विवाहानंतर सहा महिन्यांच्या आंत मौंजीबंधन करूं नये. मंडन ( विवाह ) केल्यावर सहा महिन्यांच्या आंत मुंडन ( चौदाइ ) करूं नये. हा निषेध वर्षभेद झाला नसेल तर समजावा. सारावलींत - फ़ाल्गुन मासांत पुत्राचा विवाह केल्यावर चैत्रमासांत वर्षभेद झाल्यामुळें पुत्राचें उपनयन करावें. याठिकाणीं तीन ऋतु ( सहा महिने ) टाकावे असें नाहीं. मदनरत्नांत वसिष्ठ सांगतो - एका घरांत दोन मंगलकार्यें इष्ट नाहींत. एक मंगलकार्य झाल्यावर नऊ दिवस गेल्यानंतर दूसरे मंगलकार्य करावें. आवश्यक मंगलकार्य किंवा उत्सव कर्तव्य असेल तर द्वारभेदानं किंवा आचार्यभेदानें करावें. सहा महिन्यांच्या आंत सहोदरांचीं अग्निकार्यें ( अग्निप्राणक म्हणजे मौंजी आणि विवाह ही ) तीन करूं नयेत. भिन्नोदरांची तीन अग्निकार्यें सहा महिन्यांच्या आंत करूं नयेत असें शातातप सांगतो. ज्योर्तिनिबंधांत कात्यायनाचें वचन - संकट असेल तर सोदरांचेही समान संस्कार एका वर्षात करावेत. दिवस मात्र भिन्न असावा. एका दिवशीं सोदरांचे समान संस्कार होतील तर त्यांत एकाचा विनाश होईल. तसेंच सोदरांचे समान संस्कार एका मंडपात करूं नयेत. ज्योतिर्निबंधांत नारद सांगतो - प्रत्युद्वाह ( ह्याची कन्या त्याच्या पुत्राला व त्याची कन्या ह्याच्या पुत्राला देणें ) तो करूंच नये. एका पुरुषाला दोन कन्या देऊं नयेत. सहोदर दोन भ्रात्यांना सहोदर दोन कन्या देऊं नयेत. तसेंच एकापासून जन्मलेल्या अशा दोघांचे विवाह एककाली करूं नयेत. दोघांचे मुंडन ( चोलादि ) एककाली करूं नये. एकापासून झालेल्या दोन कन्या दोन पुत्रांस देऊं नयेत. दोन कन्या एका पुरुषाला कधीही देऊं नयेत.
कन्याविक्रय दोष :- जो मनुष्य विपत्तीमुळें अथवा धनलोभानें कन्येचे पालन करून तिचा विक्रय करितो म्हणजे द्रव्य घेऊन तिचें लग्न करितो, तो कुंभीपाक नरकास जातो. त्याला नरकातील कृमी व कावळे दंश करितात. तेथें कन्येचे मूत्र आणि विष्ठा भक्षण करितो. नंतर त्याला पृथ्वीवर पुन: जन्म प्राप्त होतो. त्या जन्मी रोगग्रस्त व दु:खी असा होऊन तो सदोदित मांस विक्रय करितो.
कन्यादान प्रशंसा :- जो मनुष्य वस्त्रें अलंकार इत्यादिकांनीं भूषित अशा कन्येचे दान करितो तो स्वर्गात जातो. देवही त्यांची तेथें स्तुति करितात. सालंकृत कन्यादान करणारा, अश्वमेध यज्ञ करणारा, आणि संकट प्रसंगी प्राण रक्षण करणारा ह्या तिघांचे पुण्य सारखे आहे. त्याला नेण्याकरिता स्वर्गाहून रथ येतात. अग्रिपुराणांत सांगितले आहे कीं, कन्यादान आपल्या कुलांत केलेले श्रवण करून सर्व पितर पातकापासून मुक्त होऊन ब्रह्मलोकांस जातात.
सगोत्रादि विवाहाविषयी प्रायश्चित्त :- स्मृत्यर्थसारात असे सांगितले आहे कीं, सगोत्रसंबंधी विवाह विषय उपस्थित झाला असतां जर कोणी जाणून त्या सगोत्र कन्येशी विवाह करून तिजप्रत गमन करील तर त्याने गुरुपत्नी गमनाचे प्रायश्चित्त करावे म्हणजे तो शुद्ध होईल.
विवाहादिकांत स्त्रियांसह भोजन - हेमाद्रींत प्रायश्चित्त कांडांत गालवाचें वचन - विवाहकालीं, यात्रासमयीं आणि प्रवासात स्त्रीसह एका पात्रांत भोजन केले असता तो ब्राह्मण दोषी होत नाही. इतर वेळीं एका पात्रांत स्त्रियेसह भोजन करील तर दोषी होईल.
कन्येच्या घरी भोजन करण्याचा निषेध - कन्येला मूल झाले नसतां तिच्या घरीं कधींही भोजन करूं नये. दौहित्राचे ( कन्या पुत्राचे ) मुख पाहिल्यावर भोजन निषेध करण्याचे कारण नाही.
विवाहांत जननाशौच आले असतां विचार - ब्रह्मपुराणाचे वचन - व्रत, यज्ञ, विवाह, श्राद्ध, होम, पूजा, जप, यांचा आरंभ झाल्यावर सूतक प्राप्त झाले असले तरीं तें सूतक नाहीं. आरंभ होण्याच्यापूर्वी प्राप्त असेल तर सूतक आहे, असें विष्णुवचनही आहे. प्रारंभ कोणता तेच विष्णू सांगतो - यज्ञाचा प्रारंभ ऋत्विग्वरण, व्रत आणि सत्र यांचा प्रारंभ संकल्प होय, विवाहादिकांचा प्रारंभ, नांदीश्राद्ध आणि श्राद्धाचा प्रारंभ पाकप्रोक्षण, ऋत्विजांचे वरण म्हणजे मधुपर्क समजावा, कारण यजमानापासून ऋत्विजांनीं मधुपर्क पूजा घेतल्यावर पश्चात् अशौच प्राप्त असतां तें अशौच त्या ऋत्विजांना नाहीं असा निश्चय आहे. आरंभ नसून सूतक प्राप्त असेल तर प्रायश्चित्त सांगतो, मदनपारिजातांत विष्णुआरंभ झालेला नसून सूतक प्राप्त असेल तर शुद्धीसाठीं कूष्मांड मंत्रांनीं घृताचा होम करून गोदान करावे आणि पंचगव्य प्राशन करावे म्हणजे सूतकी शुद्ध होतो. नंतर चौल, उपनयन, विवाह, देवप्रतिष्ठा इत्यादि कार्ये करावी. मात्र ज्या दिवशी सूतक प्राप्त असेल त्याच दिवशीं वृद्धि श्राद्धादिक आभ्युदयिक कर्म करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP