रूप आईचे चांगले, माझ्या मनामध्ये भरले ॥धृ॥
अंगी चंदनाची उटी । भाळी कुंकू मळवटी काजल डोळियाचे कांठी । विडा रंगलेला ओठी । भांग मोतियाचे भरलेले । बिंदीमध्ये हिरे जडलेले ॥१॥
नेसू पैठणचीपैठणी । अंगी काचोळी देखणी । त्याचा रंग चिंतामणी, अंबा लावण्याची खाणी । तेज ओसूंडूनी चालले, चंद्र सूर्य दिपूनी गेले ॥२॥
तिचे वाहन केसरी, शंख त्रिशूल घे करी । बाळ गणेश शेजारी, वार्णिताती वेद चारी । पाया खाली दैत्य रगडिले, भक्तालागी निर्भय केले ॥३॥
नवरात्रीचा महिमा थोर, नंदादिप अष्टौप्रहर, माळ रूळे माथ्यावर, पुढे शोभला फुलोरा जपतप अहर्निश चाले, होम हवन अष्टमीस केले ॥४॥
ऐसी त्रैलोक्य जननी, जगदंबिका भवानी । हिम नगाची नंदिनी, सदाशिवाची स्वामिनी । उदाकारे प्रसन्न मन झालरे ॥५॥