मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
चांदणे काय सुंदर पडले । ...

लावणी - चांदणे काय सुंदर पडले । ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


चांदणे काय सुंदर पडले ।

त्यात तुम्हांसारिखे पाखरू अवचित सापडले ॥ध्रु०॥

लऊन किती पाया पडत्ये ।

काही करुणा येउद्या रात्री माशापरी तडफडत्ये ॥

एकांती दिसास चाल पडत्ये ।

तरी का बोलत नाही अशी कोठे तुम्हास आवडत्ये ॥

म्हणुन मी दैवाला रडत्ये ।

चैन पडेना जिवास चिंतानदीत नित बुडत्ये ॥चाल॥

पसरून पदर विषयाचे सौख्य मागत्ये ।

कोणी गाठ घालिना पलंगी उघड सांगत्ये ॥

चौघांची खुशामत करून व्यर्थ भागत्ये ॥चाल॥

सहजगती आज दर्शन घडले ।

समाधान पावले चित्त फारच स्वरुपी जडले ॥१॥

कीर्त ऐकुन खावंदांची ।

आरंभिली मग आशा स्वामिच्या पदारविंदांची ॥

घडी आली बनून आनंदाची ।

मुहुर्त साधा उठा नाही अडचण प्रतिबंधाची ॥

पुष्टता जशी गुलकंदाची ।

तशी काया समधात सुगंधिक अमोल फुंदाची ॥चाल॥

सोडित्ये गाठ कुचकंदुक सुंदर बघा ।

वर्तुळाकारति कठिण अहो जिवलगा ॥

घ्या मुके गोड कवटाळुन गळिच्या नगा ॥चाल॥

कोणाचे कार्य कोठे अडले ।

सिद्धिस न्यावे थोर जनांनी अनाथ अवघडले ॥२॥

त्रासला जीव घरच्या दुहिला ।

तशामध्ये पतिराज नित्य जातात उठुन कहिला ॥

आपण तरी भर भोगा पहिला ।

नाही मागत धन द्रव्य टाक नको लावाला वहिला ॥

द्यावे सुख ऋतुवंत्या महिला ।

लेख असा आहे पद्मपुराणी व्यासांनी लिहिला ॥चाल॥

असो पाप पुण्य सर्वही माझे मजकडे ।

तुम्ही अंगसंग देऊन व्हावे पलिकडे ॥

पुढे घडेल तसे घडो या लौकर अलिकडे ॥चाल॥

कठीण मन केले कोणी कडले ।

मघाच झाली तोफ सख्या वर आकाश गडगडले ॥३॥

स्वरुप लावण्य ह्रदई ठसले ।

पदकमळापासुन मुखापर्यंत जीवी बसले ॥

मुलायम चित्र कोठे असले ।

लिंबापरि तारुण्य विसा बाविसात मुसमुसले ॥

बहुत गोजिरवाणे दिसले ।

झडी पडुन भोगावे वाटते शरीर कसकसले ॥चाल॥

करू काय हाय का नये माझा कळवळा ।

आले नटुथटुनपोषाग करून पिवळा ॥

आली दया आलींगन देई प्रियकर सावळा ॥चाल॥

गंगु हैबतीस आवडले ।

महादेव गुणी प्रभाकर प्रारब्ध उघडले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP