मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
असे छळिले आम्ही काय तुला ...

लावणी - असे छळिले आम्ही काय तुला ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


असे छळिले आम्ही काय तुला ग ।

सांग पदरी धरुन मला ग ॥ध्रु०॥

भली भलाइ केलि पहिल्यापासुनी ।

दिला बेलभंडार पलंगी बसुनी ॥

आता उसन्यावाणि पुससी हसुनी ।

एकविचारे तू संगे असुनी ॥

प्रीतजळ अळवा वरले, तशी आलि दिसुनी ।

पहासी किती वर कांती कसुनी ॥मेळ॥

बरा ममतेचा वाण जिवा लाविला ग ॥१॥

डोंगरचे आवळे समुद्राचे मिठ ।

गोडि अकल्पित झाली अविट ॥

तसी तुझि आमची सखये पडयेली गाठ ।

सिद्धिस ने ही नव्हे नीट वाट ॥

खुडु नको प्रीतीचा नखलुन देट ।

गुप्तरुपे बांध रंगाची मोट ॥मेळ॥

करु नये तो पलंगी विलास केला ग ॥२॥

जेव्हा तुझे स्मरण होते तेव्हांच्या दुःखाने ।

मरण बरे काय सांगू मुखाने ॥

जिथे भोगिले ज्या पलंगी सुखाने ।

पहाता तिथे प्राण जाती विखाने ॥

दिसा दरोडा पडला बुडाली दुकाने ।

भरले रिते झाले जामदारखाने ॥मेळ॥

तसा सखे त्वा दिवस कसा दाविला ग ॥३॥

आता कशाला यावे तुझिया घराला ।

जावे उठुनया देशांतराला ॥

नये ममता दुसर्‍या नव्या पाखराला ।

तूच गडे गाठ दे पदराला ॥

म्हणे गंगु हैबती विषय कराला ।

समजून जा आपुल्या मंदिराला ॥मेळ॥

महादेव गुणी भरती रंग सभेला ।

गाई प्रभाकर तो रंगेला ग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP