प्रियकर गेलाग, परदेशी बाई आज मज टाकुनी ॥धृ०॥
कुठवर तरि सखे धीर धरूग । आठ आठवून किती मरणी मरूग ॥
सुखशयनीचे सुख काय स्मरूग । असा कसा माझा वेडा जीव झालाग ॥१॥
नवी तरणी तनु कोमल कांती । अशा समयी ग सखा नाही गुणशांती ॥
रुतु मदनाची घडि युगवत जाती । कोण्या सवतीने फितउन नेलाग ॥२॥
सख्याविण जाते मला वैरीण रात्रा । कशि ममता नये कोमल गात्रा ॥
कुठे राहिलासिरे राजीवनेत्रा । बरा काळजासी मारून भाला ग ॥३॥
म्हणे गंगु हैबती सुखरूप राही । फत्ते करुनिया घरि येइल शिपाइ ॥
महादेव गुणी करी कवन सफाई । प्रभाकर गाई छंद रशेलाग ॥४॥