इंदुवदन मीन चक्षू तळपती, कुरळ भृंग ज्यापरी।
रेखिली निढळी कुंकुमचिरी ॥धृ०॥
पीतकांति जेवि हेम झळाळित, कमलनाल मृदुजशी ।
ओतिली मुर्त ईश्वरे मुशी ॥
कुचयुग दोन्ही समान तीक्ष्ण पर्वतश्रृंगे जशी ।
बैसली भ्रमर पद्मिनीरसी ॥
पृष्ठभागि केशपाश शोभला, रत्न गुंफिले तिशी ।
नभींचे तारे निर्मळ निशी ॥चाल॥
धीर समीर गजगती हंसगती चाल ॥
गोरे तुंद मान हिल्लाल गुलाबी गाल ॥
मुखी दंतपंक्ती तेजाळ सुनंदा माळ ॥चाल॥
तरणितरुण वपू अरुण रंगला, वसन विजूचे परी ॥रेखिली०॥१॥
चिंचपानि शेलारी दुरंगी, सिंहकटी नेसली ।
किराशी नासिक लज्जा आली ॥
कमलदलाकृती आनन विकासित, जणु षटपद लुब्धली ।
किंकिणी मंजुळ नादावली ॥
कमालखानी हार गळ्यामधे, मुक्त घ्राण शोभली ।
पाचुवत हनु सूक्ष्म गोंदली ॥चाल॥
विडे पक त्रयोदशगुणी रंगले पहा ॥
नवरत्नमुद्रिका शोभल्या बोटी दहा ॥
अतिमंद हास्य नेत्रांची करडी जहा ॥चाल॥
बाळ्या बुगड्या कर्णताटके मुक्तहार नवसरी ॥रेखिली०॥२॥
गोठ हात-सर जवे खिजमत्य मिनेदार करी चुडे ।
चालता विचित्र दृष्टी पडे ॥
वाकड वेळा बाहुभूषणे बाजुबंद त्यापुढे ।
बोलता कोकिळ वृक्षी दडे ॥
चिंचपेट्या तन्मणी हिर्याचे छेदिव कोंदण खडे ।
तांदळीपोत दृष्टि ना पडे ॥चाल॥
पायी विरोद्या जोडवी अनवट बिचवे गेंद ॥
रुइफुली विरोद्या भारिनगांची चेंद ॥
जड जाले शरीर मदन तोरे धुंद ॥चाल॥
मधुर गीत अलापित स्वरुपरुपाची पुरी ॥रेखिली०॥३॥
रक्तोत्पलसम पाणिपद्म जे पादपद्म गोजिरे ।
शांतिचे उपमे नुरवी मुरे ॥
सुवास अंगिचा क्रोश एक जातसे वसंतमाधव मुरे ।
सुरारितात पुज्यरिपु झुरे ॥
धन्य धन्य जो इचा स्वामी, पुण्य आचरला बरे ।
तरिच त्याप्रती रत्न हे खरे ॥चाल॥
गुणवती सती पतिव्रता रीतिची खरी ॥
करू नये विषयपर कल्पना जरी ॥
कशी येइल हातामधे शोध करा अंतरी ॥चाल॥
ज्ञानी पहावे म्हणे प्रभाकर गंगाधर कवि करी ॥
परस्त्री विषाची सुरी ॥ रेखिली० ॥४॥