मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
कुणास दाऊ स्वरुप सख्याना ...

लावणी - कुणास दाऊ स्वरुप सख्याना ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


कुणास दाऊ स्वरुप सख्याना आता हे श्रृंगारुन ।

कुणास मी भोगू मिठी मारून ॥धृ०॥

कोण खबर प्रियकरास कळविल गंगातिरी जाउन ।

कोण घरी आणील समजाउन ॥

कोणतरी घडोघडी येइल मजकडे लक्ष लाउन ।

कोण दाविल गीत गाउन ॥

कोण दुःख दूर करिल जिवा सुव नित्य नवे दावुन ।

कोण पोटासी धरिल धाउन ॥चाल॥

कुणास धाडू अर्ज कराया त्वरित पदर पसरुन ॥१॥

कोण पदर पडल्यास जेविता कुच कोमल झाकिल ।

कोण पात्रात ग्रास फेकिल ॥

कोण बघुन देह उघडा पलंगी वर शेला टाकिल ।

कोण काळजी माझी घोकेल ॥

कोण सुरतसंग्रामी बळाने मदन शत्रु जिंकिल ।

कोण छातीवर गेंद झोकिल ॥चाल॥

कुणास करुनी नेत्रखुणा आणु घरात पाचारुन ॥२॥

कोण हस्तकी धरुन हवाशिर जागि मला फिरविल ।

कोण गुजगोष्टी गोड करविल ॥

कोण अमीरावाणी चरण मजकडुन स्तने चुरविल ।

कोण श्रम सार आता हरविल ॥

कोण जवळ बसवून प्रीतिने हस्तमुखे भरविल ।

कोण सुखसोहोळे सकल पुरविल ॥चाल॥

कोणास रिझऊ क्षणक्षणा रतिकाळी कमर चोरुन ॥३॥

कोण नग्न न्हाणील सभोवते खडे पहारे ठेउन ।

कोण सर्वांग पुशिल येवुन ॥

कोण वेणी विंचरून गुंफिल मंदिरात नेउन ।

कोण हरुषात बसेल घेउन ॥

कोण नेसविल होशिदार इच्छिली वस्त्रे देउन ।

कोण रस तृप्त होईल सेवुन ॥चाल॥

कुणास वाढू सुवर्णताटी पदार्थ विस्तारुन ॥४॥

कोण जीविचा जिवलग ऐसा विघ्न आल्या टळविल ।

कोण संशय सारा पळविल ॥

कोण करुन उपदेश सखा दळभारानिसी वळविल कोण सुखशयनी मन मिळविल ॥

कोण गंगु हैबनीस माझे वर्तमान कळविल ।

कोण महादेव गुणी आळविल ॥चाल॥

कोणास घालुन भार प्रभाकर देउ हाती आदरुन ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP