मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
मोहोनि जसी सुर सभेमधी अमृ...

लावणी - मोहोनि जसी सुर सभेमधी अमृ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


मोहोनि जसी सुर सभेमधी अमृत वाढी करी ।

तशी नार पंगतित आग्रह करी ॥धृ०॥

नटनाटक कलियुगात ही आली राधा दुसरी ।

सगुण संपन्न कळा कुसरी ॥

सुख सोहोळे दोहोकडे होती अति मोहर सासरी ।

हुकूम झेलिती किति एक पासरी ॥

मर्यादेने राहती उभे घडोघडिच्या अवसरी ।

मिटाईन आणि मुंग्यामिसरी ॥चा०॥

चौकेर मांडुन पंगती ।

वाढी सजुन सख्या संगती ॥

पाहुन प्राणी गुंगती ॥चा०॥

पदार्थ जे मागती मुखे पुरवी त्यास लौकरी ॥

तशी नार० ॥१॥

गर्भश्रीमंतिण सहज जिचा सर्वांवर वारसा ।

हलवी रूप सुंदर आरसा ॥

चतुर स्त्रीयांची धनीन जसी ऐन आली भर रसा ।

कुणासवे शब्द नकरी फारसा ॥

डौलामधी लाजवी सदा आणुन हरी सारसा ।

बनलि जणू हळदिचा नारसा ॥चा०॥

दुधी कांचन झार्‍या भरून ॥

घ्या घ्या म्हणे आदरे करून ॥

हावभाव दावी पदरावरून ॥चा०॥

धरून सितेचे स्वरुप वनी भुलवी राम शांकरी ॥

तशी नार० ॥२॥

ठाई ठाई ठेवि दागिने तळी लगबगीत नावरी ।

शरिर सुकुमार की गुलदावरी ॥

विशालनयना शुभाननी चाले ठमकत बावरी ।

कुण्यातरी अमिराची नोवरी ॥

पात्र पाहुन उभी राहुन जरा नजर करी ज्यावरी ।

उजेड पडे चपळेपरी त्यावरी ॥चा०॥

लोकांस चंद्री लागली ॥

नाही शुद्ध मागली ॥

असो फार सुगर चांगली ॥चा०॥

स्वच्छंदामधी घाली वनी गुंजारव मधुकरी ॥

तशी नार० ॥३॥

नभरंगाचे वसन कटी निरी चोपीव नाफुटे ।

पदर पल्लेदार माग सुटे ॥

सतेज सरी शोभतीवरी दाट जरीचे बुटे ।

चमक जणू नक्षत्रांची सुटे ॥

धन्य धन्य निर्मिता विधि नाही विसरला कुठे ।

केवळ धगधगित तारा तुटे ॥चा०॥

गंगु हैबती कवी गावन ॥

लाविती बिर्दैबावन ॥ झाले महादेव गुणी पावन ॥चा०॥

प्रभाकराची कवन कडी गुणि जनास प्रिय करी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP