चल पलंगी रात्र झाली, करी शरिरात मदन काहली ।
हाय रे ॥ध्रु०॥
मी नार नवी तरणी ज्वान, गोरी रे गोरी पान, शेंग चवळी ॥हाय रे ॥
करी फुर फुर सगळा उर, नको रे पळू दुर, बैस जवळी ॥हाय रे ॥
तनू नादर नाजुक कोम, आंगामधी जोम, नूतन कवळी ॥हाय रे ॥चाल॥
कितीक मजवर उड्या घालती ॥
सधन किती मर्जिनुरुप चालती ॥
फुकट कि रे निजते तुज खालती ॥चाल॥ रंग महाली ॥१॥
अतिशय सखू सुटला घाम, मघापुन काम, उगिच छळतो ॥
पाझरतो पर्वत जसा तसा रे पहा वसनांतरी गळतो ॥
सांग उपाय धीर धरु कसा, म्हणुन राजसा रे, जिव जळतो ॥चाल॥
घालसिल आज अडचण जेव्हढी ॥
पार पाडिन शर्थिने तेव्हढी ॥
व्यर्थ नको दवडू रात्र येव्हढी ॥चाल॥
आश रे राहली ॥२॥
किती उठुन मारू मिठी, किती रे हनवटी, धरुन आवळू ॥
मी अति चंचल बायको नको रे घडोघडी विषय खवळू ॥
नव्हे दुधाची उकळी, सख्या आला रे उत, पळी घालुन ढवळू ॥चाल॥
पहा रे पहा उभी कंचुकी फाटली ॥
पाठ खवे छातीमध्ये दाटली ॥
थंड नव्हे कुणी विस्तव वाटली ॥
नरम न पाहाली ॥३॥
केव्हढा वेळ धिर धरू सांग, शरीर सर्वांग, करी थररररर ॥
विषयाची रे मोठी आग, जसा कुणी नाग, चढे झररररर ॥
पडे पदर सुटे तळी निरी, खरिखुरीयेई गिरकी गररररर ॥चाल॥
गंगु हैबती महादेव मजविशी ॥
तिघे रे तुझी करती समजाविशी ॥
प्रभाकर म्हणे आम्ही येविशी ॥चाल॥
शपत वाहाली ॥४॥