अहो पंछी मुशाफर तुम्ही कोठिल रहिवासी ।
घरदार सोडुनी आला निघुन प्रवासी ॥ध्रु०॥
तुम्ही झुरे बावरे फंदी मुशाफर दिसता ।
नवी नवलपराई कोण्या ठिकाणी असता ॥
झरझरीत मुखासी लावून खुशालित बसता ।
आम्ही छेलछबेल्या स्त्रिया रोखिला रस्ता ॥
पुढे पंचहत्यारे करून कंबरबस्ता ।
भरजरी पठाणी साजणी साज बोलत असता ॥चाल॥
चौबंदि पायी त्याकडे बांधिला घोडा, जी जी ।
जिन साज सोनेरी वरी सजविला घोडा, जी जी ॥
बसणार छबेला बनसी असल थोडा जी जी ॥चाल॥
या लालबागेची लुटा बहार आज सारी ।
पहा स्वार होउनिया दिल्ली शहरची बारी ॥
तुम्ही छेलछबेले गडे देखणे भारी ॥मेळ॥
रहा ख्याली खुशाली मध्ये अशा नगरासी ॥
कर आठचार दिवस मुकाम मग जा देशी ॥ अहो पंछी ॥१॥
आम्ही शहर अवरंगाबाद येथिल रहाणार ।
आज राहुन दुरचे दुर निघुन जाणार ॥
यावे कशास शहरामध्ये दुरुन पहाणार ।
देखत लोक मुशाफर देश फिरणार ॥
आम्ही सेवक श्रीमंतांचे नाव करणार ।
नको आग्रहात पडू गडे नव्हेत फसणार ॥चाल॥
तुम्ही गरजवंत स्त्रिया म्हणुन करित जा अर्जी, जी जी ।
सात्विकपणे बोलुन रक्षिता मर्जी, जी जी ॥
हावभाव दावुन भोंदाल भोळवट फरजी, जी जी ॥चाल॥
लग्नाची त्यागिली सहज छबेले भार्या ।
सडे स्वार होउन निघालो ऐक हा पर्या ॥
रात्रींचा करुन दिवस जाणे धन्याच्या कार्या ॥मेळ॥
लागेना स्त्रियेचा अंत ब्रह्मदेवासी ॥
लावुन मदेचे बोट घात प्राणासी ॥ अहो पंछी ॥२॥
परमार्थ सांगते गोष्ट अहात नवे तरणे ।
नाही चाखुन कोणी पाहिले वृथा आट धरणे ॥
इंद्रास अहिल्येमुळे भगेंद्र भरणे ।
हे ब्रह्मलिखित होणार टळेना करणे ॥
ह्या काय कलहावाचुन कधी तरी मरणे ।
पाराशर पढले फार शास्त्र व्याकरणे ॥चाल॥
असे थोर थोर विषयास किती रत झाले, जी जी ॥
तेजस्वी सहस्त्रावधि यातना धाले, जी जी ।
किती शुद्ध फकीरी घेउनी भक्षिती पाने, जी जी ॥चाल॥
म्हणे पंचप्राण लावुन उभी सेवेसी ।
हाती धरा मला पहासी केवळ परदेशी ॥
बिलगुन निजावे वाटते मला शेजेसी ॥मेळ॥
परस्थळी सख्या पडला अहो गुणराशी ॥
दूरवर दृष्ट देउन चला सदनासी ॥ अहो पंछी ॥३॥
दहाशिरे वीस भुज एवढा रावणराजा ।
बुडाला दुसर्याची चोरुन आणिता भाजा ॥
घरी येउन तुजसंगे कशा कराव्या मौजा ।
वर्तावे पाणि पाजुन धन्याला पडल्या काजा ॥
बोभाट होईल दक्षिणेस उतरल्या फौजा ।
दुरुन बरा स्नेहसंगे सखे उठ जा जा ॥चाल॥
वारंवार नको करू मेजवानिची गर्दी, जी जी ॥
घरी दिली ईश्वरे भाकरी अर्धीमुर्धी, जी जी ॥चाल॥
हाक नाहक आशा अडचणी घोटिसी लाळ ।
कावळा पराचा करिती माजला काळ ॥
नये फिरुन उतरला उंच मोत्याचा ढाळ ॥मेळ॥
फुंकून पाय टाकितो भिऊन सकळासी ॥
एक वेळ डाग लागला कपाळासी ॥ अहो पंछी ॥४॥
तुम्ही बाळपणापासुन फिरस्ते प्राणी ।
मुळी फिरुन सर्व मुलूख जोखिले पाणी ॥
कधी प्रसन्नचित्ते कराल कराणी ।
झड घालुन करिते अर्ज दीनाचे वाणी ॥
आपले जिवास पाहुन गुणाची खाणी ।
लाडक्या बसुन चारिले सावलित लोणी ॥चाल॥
कर राजहंस पाखरा छातीचा कोट, जी जी ॥
इष्काची काळजामध्ये लागली चोट, जी जी ।
विहिरीत दृष्टि देखता हाताने लोट, जी जी ॥चाल॥
मग नौका तुम्ही कराल फिरुन माघारे ।
हा प्राण ठेविता आण तुला सखया रे ॥
हा कृतनिश्चय माझा हाच पहा रे ॥मेळ॥
पसरुन पदर मागते धरा ह्रदयासी ॥
द्या सोडून मनिंचा कल्प श्लेश गुण राशी ॥ अहो पंछी ॥५॥
हा जुलूम अम्हावर गडे नका करू व्यर्थ ।
येवढ्यात काय पाहिलास कैचा स्वार्थ ॥
घर-इष्क बुडाऊ प्रपंच ना परमार्थ ।
दशाहो होइल दोघांची हा उघडा अर्थ ॥
राहू दे दोन दिवस येथे धर्मार्थ ।
आम्ही कोठिल तू कोठिल सखे केलिस शर्थ ॥चाल॥
घे समाचार या स्थळी हस्ते परहस्ते, जी जी ।
शृंगार करुन प्रेम दाखविता नुसते, जी जी ।
पंजाबी फसाऊ पाणी येथिल दिसते, जी जी ॥चाल॥
पुढे गाठ पडली असेल दाणापाणी ।
कळल्यास शिक्षा होइल दोघांची धुळधाणी ॥
म्हणे उभयपक्षी पडूनये अशामध्ये कोणी ॥मेळ॥
अधी बोलुन चालुन आहेस सासुरवाशी ॥
कसे घ्यावे पदरात सांग भीतो अब्रूसी ॥अहोपंछी०॥६॥
गळी पडून म्हणे रडरडून नार मतवाली ।
मी येते अहो सुभेदार बसा तरी खाली ॥
इकडिल सृष्टी जरकरिता इकडे झाली ।
तरी धक्का लागणार नाही शपथ म्या वाहिली ॥
नये मनात आणु काही लुटावी लाली ।
नित्य पंचामृत जेवुन निजा रंगमहाली ॥चाल॥
व्हा स्वार चला सरदार घराकडे माझ्या, जी जी ॥
मी घार होउन फिरेन भोवताली तुझ्या किरे, जी जी ॥
घ्या घास मुहूर्त येथे वाढिते खाज्या, जी जी ॥चाल॥
हाती धरुन दिल्ली शहरास मुशाफर नेला ।
ठेविला राजमंदिरी शिपाई रंगेला ॥
जलदिने महाल रंगवून दुसरा केला ॥मेळ॥
चवरंग टाकुन उठविला सखा स्नानासी ॥
लावी सुगंध उटणे फार आणुन आंगासी ॥ अहो पंछी ॥७॥
अलंकार भूषणे अमोलिक घाला सगळी ।
केशरीगंध कस्तुरी टिळक वर भाळी ॥
पंचारती घेउन उभी नार सजुन करकमळी ।
राजसा राज अंबिरा प्रीतीने वोवाळी ॥
हस्तकी धरून लटपटीत कर्दळी कवळी ।
गेली घेउन प्राणप्रियकरासी तिसरे ताली ॥चाल॥
भोगिला भोग परनारी प्रियखुष वक्त, जी जी ॥
मनमर्जी मिळाली झाले भाग्य मोठे, जी जी ॥
पुणे शहर दक्षिणेमधे बाच्छाई तक्त, जी जी ॥चाल॥
वस्ताद गंगु हैबती तेथिल रहिवाशी ।
महादेव गुणीराज गुणाच्या राशी ॥
नवी नूतन गाती ख्याल रसिल रशिक हरभासी ।
कस्तुरी गाती वर केशर राजविलासी ॥
करी जडण घडण नवे नित्य प्रभाकर खासी ॥
अहो पंछी मुशाफर तुम्ही कोठिल रहिवासी ।
घरदार सोडुनी आला निघुन प्रवासी ॥८॥