भ्रतार नव्हे दुसमान पुरा ।
देउन मला विश्वास प्रवासी गेला निघुन चंडाळ खरा ॥ध्रु०॥
रंगित महाली शेज सुखाची पहाता रडु मजला येते ।
आठ आठवुन मनी दुःख तयाचे उर बडवुन आपला घेते ॥
कोण बहार भोगील प्रियकरा तुजवाचुन माझा येथे ॥चाल॥
तू मज निधानाच्या धना ॥ जाऊ धुंडित कोण्या वना ॥
सुवासिन शीतल चंदना ॥चाल॥
विचार नाही आता बरा ॥१॥
शुभ्र चांदिणे वसंत ऋतुचे, शुद्ध शशी भासे तरणी ।
तिंदा पहाते झरुका उघडुन, शब्द तसा पडता करणी ॥
तगमग तगमग लाही जिवाची, निघुन जाते ऋतु भरणी ॥चाल॥
जन सुकात दिस लोटती ॥ पतीराज कधी भेटती ॥ अष्टांगी रगा दाटती ॥चाल॥
प्राणसख्याची भेटकरा ॥२॥
कोण मांडिवर घेउन मला ग बाई, एकांती भरविल दुध मांडा ।
घालित होत्या झडा अगोदर, शहर पुण्याच्या नित रांडा ॥
बुद्धि पुरस्कर सखा फसविला दावुन द्रव्याचा हांडा ॥चाल॥
कसे फुटले जन्मांतर ॥ पडियेले गगन मजवर ॥
गेला प्रीतिचा प्रियकर ॥चाल॥
जाउन तयाचे पाय धरा ॥३॥
उडी घालुन धावण्या धावला, दौपदिचा जो कैवारी ।
शरीर सलामत राखुत प्रियेचे घरास आणिले घरबारी ॥
हर्ष माइना खुशाल झाल्या खेळगड्या सार्या नारी ॥चाल॥
एक रंग घेउनया हाती ॥ अनंदे करुन खेळती ॥
कविराज गंगु हैबती ॥चाल॥
महादेव करी ख्याल शिरा ।
प्रभाकराची जडण अमोलिक जसा शिरी शिरपेच तुरा ॥४॥