अरे बाळपणीच्या मित्रा ।
जाते तुजविण सुनी किरे रात्रा ॥ध्रु०॥
काय विकल्प मनी संचरला ।
म्हणुन मर्जिचा सहज कल फिरला ॥
तुज असा सखारे अंतरला ।
कोण्या सवतिच्या तरी भरी भरला ॥
आजवर धिर म्या धरला ।
नाही संगतिचा मनोरथ पुरला ॥चाल॥
एके ठाई धुळाक्षर लिहिले ॥
ते सर्व विसरला पहिले ॥
आले भाग्य तुम्हाला वहिले ॥चाल॥
म्हणुन त्यजिलेस परममित्रा ॥१॥
उपवर शरीर हे झाले ।
पहाशिल तरी दृष्टिभरुन म्हणुन बहाले ॥
फार फार दुःख म्या साहले ।
नाही विषयाचे सौख्य काही पहाले ॥
आला पुर वळवणी वहाले ।
तळचे जळ तसेच सख्या राहले ॥चाल॥
अशी दैव अभागिण पुरती ॥
जा आराधिली मुळी मूर्ति ॥
तिने केली जिवाचे परती ॥चाल॥
मग रहावे कुठे रे शुभनेत्रा ॥२॥
आधी अंकी घेउन बसा हो ।
पहिला मग वृत्तांत सर्व पुसा हो ॥
आला उलटा काळ कसा हो ।
झुरते आठआठवुन प्राणहंसा हो ॥
काय केला अपराध असा हो ।
ठरवुन तो तुम्ही सुखरूप रुसा हो ॥चाल॥
तुम्ही श्रीमंत पूर्ण कृपाळू ॥
मन शुद्ध ह्रदय कनवाळू ॥
पहिल्यापुन फार स्नेहाळू ॥चाल॥
निरसिल कसा रे मज चित्रा ॥३॥
काय घडली सांग अवज्ञा ।
पतिच्या परिस पाळली आज्ञा ॥
कानी पडता शब्द संज्ञा ।
धाउन घरि मी येत होते सुज्ञा ॥
तेव्हा नबती कुणाची प्राज्ञा ।
केलि काय अताच भीष्मप्रतिज्ञा ॥चाल॥
लय लक्ष सदा तुजपाशी ॥
भाळले मुळी मुख्य रूपासी ॥
श्रुत करुनी ज्ञान दीपासी ॥चाल॥
पसरिते पदर प्रिय पात्रा ॥४॥
तुझे माझे असे तिळ तुटले ।
दुस्मान मजवर कोण तरी उठले ॥
नवे मित्र मिळाले कुठले ।
कसे रे निर्जिवास अंकुर फुटले ॥
बाहेर रंग तुम्ही लुटले ।
पडदे मजविषयी भ्रांतिचे सुटले ॥चाल॥
घ्या करुन सर्व खुलासी मग निसुर चला महालासी ॥
गंगु हैबती पूर्ण विलासी ॥चाल॥
महादेव सगुण सुमित्रा ।
छाणुन कवी रसिक प्रभाकर अंत्रा ॥५॥