कायकरू, किती आवरू, भर नैतिम मी ।
पती वाचुन चालली सुनी नागपंचमी ॥ध्रु०॥
नित थाटमाट घरी करुन वाट पहाते ।
दार धरुन पदर सावरुन उभी ग रहाते ॥
येती लोटावर भर लोट दडपिते हाते ।
जीव अधीर होतो परी धीर देउन सहाते ॥
आठवुन पतिचे सगुणरूप विव्हळ होते ।
पडे भ्रांत सखा म्हणुन भलत्या प्रत बहाते ॥चाल॥
आलि सुदिन सण पंचमी श्रमी जिव रात्रंदिस झुरणी ।
येती सरीवर सरी सरसरून, गगन भरभरून, पडे धरणी ॥
होती धुंद दिशा चहुकडे, पडेना दृष्टि दिसा तरणी ॥चाल॥
टाकून गेले मागे कसे ते दीनासी ।
असे कोण्या सवतिने मोहुन मनासी ॥
फितवुन नेले आपुल्या तिने सदनासी ।
कोणीकडे जाउ ग धुंडित वनासी ॥
कुठवर आवरू बाई अशा यौवनासी ।
पाहिन केव्हा त्या निजघनासी ॥चाल॥
जा जा सख्यांनो मिळुनी ।
घ्या यश वळुनी ।
शोके देह सगळा गळुनी ।
गेला हाय जळुनी ।
जातो हा जिव कळवळुनी ।
केले कपट कळुनी ॥चाल॥
करकमळी धरून, आड पडून, फिरवा तुम्ही ।
गुणीजना बद्दल खातर गडे घेइन हमी ॥१॥
होते क्षणक्षणा मज प्राणपतिचे स्मरण ।
कधी पुण्यश्लोक पाहिन प्रभूचे चरण ॥
किती घालू धिराचे मनगंगेला धरण ।
अंतरली जसी कस्तुरि-मृगाला हरण ॥
आले अनन्य भावे सर्वत्राला शरण ।
या घेउन देश धुंडाळुन राजाकारण ॥चाल॥
करी मळमळ अंतःकरण, घरोघर वरण-पुरण सोहाळा ।
मी परदेशी पाखरु, काय करून द्रव्याचा कोहाळा ॥
झुरझुर जिव वैतागला, विषयाचा डोहाळा ॥चाल॥
पाहिन दृष्टि केव्हा प्राणविसावा ।
लगबग धाउनी सखये गवसावा ॥
मिठी गळा मारून सगळा वृत्तांत पुसावा ।
आला दिस संगतिचा विस्तार असावा ॥
घडोघडी वाटे पलंगी घेउन बसावा ।
उणेपणा किंचीत दोघात नसावा ॥चाल॥
गेला मज टाकुन कसारे । अरे राजसारे ।
आली भरज्वानी रसारे ।
आज प्राणहसारे । वाटे भय सदनी दिसारे ।
तुजवीण पसारे ॥चाल॥
आला वाणवसा करू कसा, म्हणुन जिव श्रमी ।
कुठे चैन पडेना ह्या निर्मळ आश्रमी ॥२॥
घरी फिरुन याहो लौकरी म्हणुन पती निरवला ।
बरे म्हणुन हात ह्या मुखावरुन फिरविला ॥
धीर देउन जिवाला आजवर मद जिखीला ।
काय करू आता ग धन मालाच्या चरवीला ॥
नऊ नाग कुले हौसेने भुजंग करवीला ।
वर तर्हे तर्हेचा रंग स्वता भरवीला ॥चाल॥
अति आनंद चित्ता पासुन, असुन काय पति वाचुन लटका ।
घेतली धाव कर्माने, जाती युगसमान मज घटका ॥
गेले लालुच दाउनी । लाउनी ममतेचा चटका ॥चाल॥
पहा पहा तरी बांधा, माझ्या बाई शरीराचा ।
कोण रस भोगिल आता या भरांचा ।
चहू कुन बनला तक्ता उभार उराचा ।
किती सरसाऊ सदा पदर चिराचा ।
जेव्हा घडेल संग्रह शयनी गुण गंभीरारा ।
तेव्हा नवस सये फेडिन हराचा ॥चाल॥
केवळ कौस्तुभ तो मनी ग ।
पुरुषात गुणी ग । ठिवला कुठे लपवुन कोणी ग ।
अशी नाही उणी ग । नव्हता कुणाचा ऋणी ग ।
द्रव्य घरी लुट ग ॥चाल॥
वडिलांची सबळ पुण्याई घरी काय कमी ।
मिळविल्या बक्षिसा महाल मुलुख धन भूमी ॥२॥
सांगती खबर किती सेवकजन नारिला ।
येतात धनी हे आज आपल्या नगरिला ॥
चौफेर चौक मधी साधुन श्रृंगारिला ।
पहाती छबेल्या उभ्या राहुन लहरिला ॥
पंचारती घेउन करी सर्व शोक सारिला ।
जाई नटुनथटुन सामोरी सुंदर स्वारिला ॥चाल॥
करी धरुन सखा प्रीति करुन उभयता गेली अंतरसदनी ।
कडकडून सुखे भेटली दाविली कंचुकी गुलबदनी ॥
विधियुक्त नाग मग पुजुन देति ते ग्रास रिझुन वदनी ॥चाल॥
लेवून वस्त्रे जरीची उभयता सुखात ।
विडे हाते घालिती स्वादिष्ट मुखात ॥
करमिले आजवर कुठे कोण्या मुलुखात ।
जिवावर कंथिले मागे मी दुःखात ॥
साधन सुत्रे अवधी तुझिया नखांत ।
सदा रहा गोडिने सख्या सलुखात ॥चाल॥
गंगु हैबती कवी पुरारे ।
म्हणे लाव तुरारे ।
रक्षी सज्जन जन मुरारे ।
दीन दास शुरारे ।
महादेव गुणी गंभीर नुरारे ।
करी सहज चुरारे ॥चाल॥
पती समुद्र केवळ सखी सुंदर गौतमी ।
मिसळली प्रभाकर म्हणे आज स्नेही संगमी ॥४॥