डुलत खुलत चाले, झुलत झुलत बोलता हले हलकडी ।
नूतन नारंगी, सजीव सारंगी, फिरवी गर गर गर गर नयन पटे फांकडी ॥धृ०॥
गंगा यमुना सरस्वती सीरशिखरी उगम दावती ।
मार्ग करुन पुढे पाठिपाठ धावती ॥
सरळ त्रिवेणिस गुंफुन गोंडे त्यावर फूल शेवंती ।
कुयरि सिताफळ आवळा ऐरावती ॥
मच्छ कुर्म आणि चोर बोरे चिमण्या मयूर झेपावती ।
नकळे भुजंगच बसोनि फोफावती ॥चाल॥
तायतांची जोडी करवंदे कळ्या सुघड ॥
खारका कळस इटस तोरणांचा घड ॥
मूद राखडी केकत चंद्रकोर दुघड ॥चाल॥
सुबक केवडा चंद्र सूर्य तळी बिंदि जडित वाकडी ॥१॥
शनी मंगळ शेजारी कपाळी सलक्षणीक असती ।
स्वच्छ हिर्याची ठिकली लावुन ठासती ॥
भृकुटी येक कोदंड येक गांडीव आवचित भासती ।
नयन पाहुन मृग सगळे ह्रदयी त्रासती ॥
साग्र सरळ नासाग्र विलोकुन शुक चुंचा घासती ।
इतर मिळुन द्विज पंगती दुरुन हासती ॥चाल॥
टवटवीत गाल नाहि पडली कुठे वलवटी ॥
स्वादिष्ट सुटे मकरंद मुखा तलवटी ॥
कोय आंब्र फळाची अति पातळ हनवटी ॥चाल॥
कर्णफुले चमकती कर्ण शेवटी बाळ्या साकडी ॥२॥
वज्रटिका पानड्या मधुन किरकोळ उड्या घालती ।
जडित झळाळित पेट्या नउ नालती ॥
चित्र विचित्रे मंगलसूत्रे रत्नखचित हालती ।
ठळक ठळक मोत्यांचे सर खालती ॥
तनमणी कंठा ताईत पाचूचे गमे गरुड चालती ।
चंद्रहार पुतळ्यांची माळ लाल ती ॥चाल॥
खुले बकुळ फुलांचा चंद्रहार सांखळी ॥
जवे चाफेकळ्यांची मोहनमाळ खळखळी ॥
नवरत्न मण्याचा कंठी हार मेखळी ॥चाल॥
पडलि असेल खळी खचित कुबेर भांडारी बरीच रोकडी ॥३॥
पीतवसन कटी कसून, चोळी वर नगनागिणी वाटल्या ।
लपुन येउन परिसाने वाकी चाटल्या ॥
दोरे गजरे गोट टिकांच्या पुढे कांकणे पाटल्या ।
झळक फळक दहा आंगठ्या खुब थाटल्या ॥
छंद बंद समशेरी जव्यांना घरी पुतळ्या आटल्या ।
अडस हिर्यांच्या पोहोंच्या मधि दाटल्या ॥चाल॥
रुळ गेंद जोडवी पायी पैंजण वाजती ॥
दर्शने सहज लावण्य स्त्रिया लाजती ॥
कवी गंगु हैबती दक्षणेत गाजती ॥चाल॥
महादेव गुणी गाति प्रभाकर कवी जरबेची कडी ॥४॥