युगायुगाची संगतिण सख्यारे नको विसंबू गुणिराया ।
सर्व गर्व सोडून लागले पदर घडोघडी पसराया ॥धृ०॥
धनुर्धारि वीर सर्व वधाया केलि प्रतिज्ञा निर्धारी ।
ब्रह्मचारि राहिला तशातच परशराम द्विज अवतारी ॥
तेव्हाच हरले यत्न सदोदित पाहुन व्रतस्थ भारी ।
कोण करिल अंगिकार माजा व्यर्थ येउन काय संसारी ॥
गहिवर सुटला अधिर मनातुन धावे धावण्या त्रिपुरारी ।
अक्षई मज सौभाग्य शिवाकर वर दे रेणुका कैवारी ॥चाल॥
म्हणून तपश्चर्येस प्रथम यौवनी ।
बैसले उपोशित धन कानन भुवनी ॥
पाहे वाट जशी गौतम कांतावनी ॥चाल॥
मग दर्शन देउनी मला तुम्ही तप सांगितले आचराया ।
नृप औतारी वरीन येइन पहा फिरुन असुर संहाराया ॥१॥
रामरूप अहो धरुन अगोदर सुशील अहिल्या उद्धरली ।
यज्ञयाग रक्षून परस्पर जनक नंदिनी कसी वरली ॥
सकल राज्य लोभास अपेक्षुन केवळ कैकई बावरली ।
वनांतरी दवडून त्रिवर्गा दुष्ट वासना मनि धरली ॥
सेतु समंधी अहंपणाने खरिच जळाची वृत्ति फिरली ।
अहंकार परिहार करून लंकेत वानरे मग शिरली ॥चाल॥
पाडून पाताळी भुयार अहि रावणे ॥ नेऊन करी भगवतीस बलि दावणे ॥
हनुमंते मांडिले पाठोपाथ धावणे ॥चाल॥
कार्य साधुनी भ्रमर संकटी लावी पलंग उकराया ।
शापित असता लीलावतारी वरीन बोलला रघुराया ॥२॥
बहुत कृष्ण अवतारी सुशोभित तरुण अंगना भोगुनिया ।
दाहे दुध भक्षुन नवनीत उतरा गड्यांसहित नित जागुनिया ॥
असाध्य हरी तू असुन रणांगणी नर हुकुमाने वागुनिया ।
जरासंध रिपू समरी पळविला मागे माधवा लागुनया ॥
मुठभर पोहे घेसी ब्राह्मणाजवळुन स्नेहाने मागुनया ।
अमरपुरीहुन अमोल दिधले नगर शिल्पिका सांगुनया ॥चाल॥
शिशुपाल वधुन युद्धाची शपथ वाहिली ॥
फार फार वाट द्वारकेपसुन पाहिली ॥
तुज असा पुरुष भोगाची अशा राहिली ॥चाल॥
आकाश वाणी जहालि अकल्पित येइन जगाला अवराया ।
तेव्हा तुझे पुरवीन नवस कलियुगात सुखे जा विचराया ॥३॥
पूर्व निरूपण स्मरुन विचारित त्यजुन निघाले गृह धरणी ।
तीर्थवासि सांगता ऐकिली सुमित्र तुमची आदकरणी ॥
लगबग शरीर थरारित निघाले धाव घेतली मृगचरणी ।
श्रम हरले आज युगायुगांचे अनंदमय अंतःकरणी ॥
अता बसुन व मांकी विलोकिन स्वरूप रुपाची मद भरणी ।
भाग्य उदेले माझे अकल्पित धन्य स्त्रिया मी शशि किरणी ॥चाल॥
म्हणे गंगु हैबती अजिंक्य हा भूपती ॥
पाहुनी शुचिर्भुत आलि विघ्ने कापती ॥
चिरकाल मस्तकी जरि छत्रे तळपती ॥चाल॥
महादेव गुणिराज लाविती इतर कवींना सुधराया ।
प्रभाकराचे कवन ऐकता उदित किती तुरे उतराया ॥४॥