मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
भीमककुमारी घेउन गेला द्वा...

लावणी - भीमककुमारी घेउन गेला द्वा...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


भीमककुमारी घेउन गेला द्वापारिंच यदुपती ।

कलिमधे हा कोण तरी दंपती ॥धृ०॥

घडघडाट अति श्रवणी रथांचा बाई अवाज ऐकुनी ।

मी झाले खरी जागी डचकुनी ॥

वसन कंचुकी आवरुन मागे पदर तंग ठाकुनी ।

राहिले उभी खिडकित चमकुनी ॥

समाधान पावले शरीर, नर सभाग्य अवलोकुनी ।

सलज्जित मुख किंचित झांकुनी ॥चाल॥

चहु खांबी चार हाटकी ॥

गांडीव त्रिंबक नेटकी ॥

कोद्ड शारंग थेटकी ॥चाल॥

भरजरिच्या गवसण्या तूणीर तिरसहित संच तळपती ॥१॥

शिरी पगडी झगमगीत वरी शिरपेच जडित भरणीचा ।

चिरंजीव जणू जगोद्धरणीचा ॥

कृत्तिकेचा काय घोस तुरा नव पदरी सरस वैरणीचा ।

चौकडा सुढाळ नग करणीचा ॥

वेदशास्त्रसंपन्न क्षमाशिल मऊ अंतःकरणींचा ।

गुमस्ता गमे केवळ तरणीचा ॥चाल॥

लाल निटिली टिळक सुरखा ॥ आंगी आगाबानी अंगरखा ॥

चहूंकडून डौल सारखा ॥चाल॥

रत्‍नखचित हार कंठी न पुरे तुळणेस कुबेर संपती ॥२॥

गौरवर्णी सती सुशिल निरंतर अति सेवेस सादरी ।

विषयी मन प्रसन्न पति आदरी ॥

स्वहित संबंधी बोध करायास योग्य मंदोदरी ।

लपति हरी कुरंग गिरिकंदरी ॥

अलंकारभूषणी सुशोभित पतिव्रता सुंदरी ।

खरीच नीलकंठ सांबसहोदरी ॥चाल॥

कटी कसुन भडक भरजरी ॥

मंडित चिन्ही साजरी ॥

दिसे भाग्यवान गोजरी ॥चाल॥

इतर नारी ह्या चंद्रकळेपुढे सहज सुरुप लोपती ॥३॥

तुडुम नौबती तंबूर बिनीवर मेघापरी गाजती ।

सजेले रथ भवते साजती ॥

कडी-कंठ्यांचे स्वार पदाती उदंड ते विराजती ।

पाहुन नृप मांडलिक लाजती ॥

बहुत दुतर्फा घण घण नादे गजघंटा वाजती ।

कितीक भालदर भाट गर्जती ॥चाल॥

बाई घटाव खुब स्वारिचा ॥

चाले गोल थटुन बाहारिचा ॥

पडे प्रकाश अंबारिचा ॥चाल॥

छत्र-चामरे ढळती ज्यावर कनक ओपा ओपती ॥४॥

सुपुत्र पुतळा सुरुप सबल बळी सुमुहुर्ती मावली ।

धन्य ती जननी परिस प्रसवली ॥

सुज्ञ सुशिल सुत सुजाण जाणे सवाई ध्वजा लावली ।

सकल करतळांत क्षिती आवली ॥

होऊन चरण संपुष्ट पडावे सगुणांचे पावली ।

करिल कल्याण खचित सावली ॥चाल॥

गंगु हैबती कवी सागर ॥

करण्याचे सुफळ आगर ॥

चाहती किती नट नागर ॥चा०॥

महादेव गुणी म्हणे प्रभाकर निधान हा भूपती ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP